दुष्काळी भागात रुजतंय ‘क्विनोआ’ पीक

quinoa-plant
quinoa-plant

नगर - राज्यातील शेतकरी कंपनीच्या माध्यमातून अकरा जिल्ह्यांमध्ये ‘क्विनोआ’ हे परदेशी पीक रुजत आहे. यंदा पहिल्यांदाच राज्यभरात चारशे बारा एकर क्षेत्रावर या पिकाची लागवड झाली आहे. राजगिऱ्यासारखे असणाऱ्या या पिकाची काही शेतकऱ्यांनी काढणी केलेली असून, एकरी सात ते दहा क्विंटल उत्पादन मिळाले आहे. साधारण सरासरी दहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. मात्र, या पिकाला बाजारात स्वतंत्र मार्केट नसून, शेतकरी कंपन्यांनी दिल्लीतील एका ट्रस्टशी खरेदी करार केला अाहे. 

चीन, जपान, इटली, ऑस्ट्रेलियात येणाऱ्या क्विनोआ पिकाची यंदा भारतातही लागवड होत आहे. यंदा नगर, उस्मानाबाद, 
औरंगाबाद, सोलापूर, बुलडाणा, यवतमाळ, जालना, परभणी, धुळे, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये २४ शेतकरी कंपन्यांच्या पुढाकारातून चारशे बारा एकर क्षेत्रावर क्विनोआची लागवड झाली आहे. या उपक्रमासाठी नगर जिल्ह्यामधील वांबोरी (ता. राहुरी) येथील गर्भगिरी शेतकरी कंपनी समन्वयक म्हणून काम करत आहे. 

इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्चात येणाऱ्या या पिकाला कमी पाणी लागते. एकरी सात ते दहा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळाले असल्याचे चिंचोडी (ता. नगर) येथील उद्धवराव जगताप या शेतकऱ्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यात क्विनोआची साठ एकरांवर पेरणी झाली आहे. 

शंभर रुपये किलोनुसार करार
शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सरवतीदेवी मेमोरियल ट्रस्ट या दिल्लीतील संस्थेशी प्रतिकिलो शंभर रुपये या दराने विक्री करार केला आहे. क्विनोआपासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार केले जातात. क्विनोआपासून ब्रेड, बेबी फूड, सूप, मिश्रधान्य, बिस्किटे, केक आदी उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांना देशात व देशाबाहेरही मागणी आहे. करार केलेली संस्था थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून खरेदी करते.

असे आहे क्विनोआ पीक
राजगिऱ्यासारखे दिसणारे आणि त्याच पद्धतीने उत्पादन घेता येणारे क्विनोआ हे पीक प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील आहे. रब्बी हंगामातील हे पीक साधारणपणे नव्वद दिवसांत तयार होते. काळी, चुनखडीयुक्त जमीन, मुरमाड जमिनीवर या पिकाची लागवड करता येते. लागवड केलेल्या जमिनीतून निचरा होणे गरजेचे असते. लागवडीसाठी एकरी एक किलो बियाणे लागते. इतर पिकांच्या तुलनेत या पिकाला खर्चही कमी येतो, अशी माहिती प्रा. गंगाधर चिंधे यांनी दिली.

परभणीत क्विनोआची प्रायोगिक लागवड
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या चिकलठाणा (ता. सेलू) येथील जिवाजी महाराज अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ब्राह्मणगाव, म्हाळसापूर, कुंडी, चिकलठाणा या गावांतील शेतकऱ्यांनी दहा एकरांवर क्विनोआची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे. क्विनोआ खरेदीसाठी दिल्ली येथील खासगी कंपनीशी करार करण्यात आलेला आहे.

वांबोरी (ता. राहुरी) येथे यंदा पहिल्यांदाच लागवड केलेल्या क्विनोआ पिकाची मी पाहणी केली होती. कृषी विद्यापीठ स्तरावर या पिकाबाबत अजून संशोधन झालेले नाही. यंदा बऱ्याच ठिकाणी या पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. या पिकास बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र, या पिकापासून किती उत्पादन मिळते, दर कसा मिळतो, हे कळल्यानंतरच हे पीक किती फायदेशीर आहे, हे स्पष्ट होईल.
- डॉ. संतोष कुलकर्णी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 

महाराष्ट्रात पहिल्यांदाच क्विनोआ पिकाची लागवड झालेली आहे. आम्ही शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून राज्यभर चारशे बारा एकरांवर पेरणी केली आहे. हे कमी पाण्याचे पीक असल्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना फायदेशीरच ठरेल.
- प्रा. गंगाधर चिंधे, अध्यक्ष, नगर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी संघ, नगर

किनोआ उत्पादनाला खर्चही फारसा लागत नाही. देशासह जगभरात त्यापासून तयार केलेल्या उत्पादनाला मागणी असल्याने दरही चांगला मिळतो. पुढील वर्षापासून अजून क्षेत्रवाढ होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- भाऊसाहेब बऱ्हाटे, प्रकल्प संचालक, आत्मा, नगर 

 अकरा जिल्ह्यांमध्ये ४१२ एकरांवर लागवड
 चोवीस शेतकरी कंपन्यांचा पुढाकार
 महाराष्ट्रात पिकाबाबत अभ्यास नाही : तज्ज्ञ
 स्वतंत्र मार्केट नाही; ट्रस्टशी कंपन्यांचा करार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com