जिद्दीला सलाम!

जिद्दीला सलाम!

अपंगत्वावर मात करीत दुग्ध व्यवसायात यश 
सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथील अण्णासाहेब कोले या तरुणाने अपंगत्वावर मात करीत दुग्ध व्यवसायातून घरच्या अर्थव्यवस्थेला सक्षमता मिळवून दिली आहे. दोन्ही पाय अपंग असूनही धारा काढणे, वैरण काढणे व दूध घालणे अशी कामे ते लीलया हाताळतात. प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी केलेली कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सांगली जिल्हा परिषदेने नुकताच आदर्श गोपालक पुरस्कार देऊन त्यांच्या जिद्दीला सलाम केला आहे. 
शामराव गावडे 

सांगली जिल्ह्यातील दुधगाव (ता. मिरज) येथे कोले यांचे कुटुंब राहते. आई- वडील, सागर व वैभव हे भाऊ व स्वतः थोरले अण्णासाहेब असा पाच जणांचा हा परिवार आहे. अण्णासाहेब अपंग आहेत. केवळ पहिलीपर्यंत शाळेत चालत गेलेले त्यांना आठवते. त्यानंतर आलेल्या आजारपणात कमरेपासून खालील भाग लुळा पडला. दोन्ही पायांना अपंगत्व आले. मात्र हिम्मत न हरता, जराही न खचता त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. 

म्हैस बनली कुटुंबाचा आधार 
अण्णासाहेबांच्या वडिलांची ५ एकर बागायती जमीन; परंतु एका पाणीपुरवठा संस्थेच्या कर्जासाठी तारण दिली. पुढे कर्ज फिटेना. खऱ्या अर्थाने कोले कुटुंबाची फरपट सुरू झाली. तोपर्यंत अण्णासाहेबांचे बीएच्या पदवीपर्यंत शिक्षण झाले होते. नोकरीसाठी काही ठिकाणी प्रयत्न केले; परंतु यश आले नाही. मग घरची शेती पाहण्याचे ठरवले. 

गोठ्यातच जनावरांची पैदास 
दुग्ध व्यवसायावर भर दिला, त्यासाठी जनावरे विकत घेऊन वाढवणे सुरवातीच्या काळात परवडणारे नव्हते. मग गोठ्यातच पैदास करण्यावर भर दिला. हळूहळू जनावरांच्या संख्येत वाढ झाली. काही जनावरे वेळोवेळी विकलीही. एक गाय व एका म्हशीपासून सुरवात झाली होती. आजच्या घडीला लहान-मोठी धरून सुमारे २५ जनावरे आहेत. त्यात एचएफ (होल्स्टिन फ्रिजीयन) व मुऱ्हा म्हशींचा समावेश आहे. दररोजचे दूध संकलन ९० लिटरपासून ते कमाल १५० लिटरपर्यंत होते. गायीच्या दुधाला लिटरला २५ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ३५ रुपये दर मिळतो. 

अानुवांशिक सुधारणा कार्यक्रम - 
कोले कुटुंबाचे व्यवसायातील कष्ट पाहून पशुसंवर्धन विभागाने त्यांच्या गोठ्यावर अानुवांशिक सुधारणा कार्यक्रम राबविला. यामध्ये उच्च वंशावळीचे कृत्रिम रेतन केले. यात दररोज २० लिटरच्या पुढे दूध देणारी संकरित गाय व १० लिटरच्या पुढे दूध देणारी म्हैस निवडली गेली. त्याद्वारे होणारी संतती अधिक दूध देणारी निपजते. या जनावरांचे संगोपन पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

खाद्य व चारा व्यवस्थापन 
दिवसातून दोन वेळा चारा दिला जातो. यात २५ किलो हिरवा व सहा किलो सुका चारा प्रति जनावराला दिला जातो. हिरव्या चाऱ्यात ऊस, हत्तीगवत, मका यांचा समावेश असतो; तर सुक्‍या चाऱ्यात तूर, सोयाबीन, हरभरा, गहू भुसा आदींचा वापर होतो. सरकी पेंड, मिनरल मिक्श्चर आदींचाही वापर होतो. 

आरोग्याची काळजी - 
जनावरांच्या आरोग्याबाबत कोले नेहमी दक्ष असतात. वेळापत्रकानुसार लसीकरण होते. खाद्यातून लोखंडी खिळे व अन्य वस्तू पोटात जाऊन जनावरे दगावण्याची शक्‍यता असते, यासाठी खाद्य पाटीत काढल्यावर जनावरांपुढे ठेवण्यापूर्वी त्यातून ‘मॅग्नेट’ फिरवले जाते. थोडीशी काळजी घेतली तर हानी टाळता येते, असे कोले यांचे मत आहे. 

दुग्ध व्यवसायातून उभारलेले कुटुंब 
दुग्ध व्यवसायामुळे कोले कुटुंबाला जगण्याची नवी उमेद मिळाली. आर्थिक प्रगती साधली. तारण असलेली पाच एकर जमीन सोडवून घेतली. आठ लाख रुपये खर्च करून शेतातच ‘हेड टू हेड’ असा प्रशस्त गोठा बांधला. ‘चाफ कटर’ची सोय केली. पाइपलाइन करून शेती ओलिताखाली आणली. कुटुंबाची एकूण पाच एकर जमीन असून त्यात केळी, ऊस, चारा आदी पिके आहेत. 

दररोज १८ किलोमीटरवर कष्टदायी प्रवास 
अपंग आहोत म्हणून कोणतीही सहानुभूती न मिळवता अण्णासाहेबांनी दुग्ध व्यवसायातून स्वतःला उभे केले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी गावापासून सुमारे ९ किलोमीटरवर असलेल्या आष्टा येथे जावे लागे. तीनचाकी सायकलवरून दररोज १८ किलोमीटरचा कष्टदायी प्रवास घडे. पण, परिस्थितीपुढे न नमता 
त्यांनी शिक्षण पूर्ण केलेच. 
 

अपंगत्वावर मात
कमरेपासून खालील भाग लुळा पडल्यासारखा. उभेही राहता येत नाही. पाय काम देत नसले तरी प्रचंड इच्छाशक्ती अण्णासाहेबांकडे आहे. दोन्ही हात जमिनीवर टेकून ते चालतात. गोठ्यातील शेण काढणे, धारा काढणे, खाद्य देणे ही सर्व कामे ते करतात. गावातील दूध संस्थेला दूध घालण्यासाठी ते तीनचाकी गाडीवरून जातात. शेतातील वैरण काढतात. त्यांना आई- वडिलांसह दोन्ही भावांची मोठी मदत होते. हा व्यवसाय सांभाळून गावातील आपला इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्तीचा व्यवसायही तितक्याच जोमाने सांभाळतात. अपंग असूनही ते कोणावर बोजा बनले नाहीत, उलट मोठ्या कुटुंबाचे तारणहार बनले. त्यांच्या कामाची दखल घेत सांगली जिल्हा परिषदेने यंदाच्या जानेवारीत आदर्श गोपालक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. 

वजन वाढवा, अनुदान मिळवा 
जनावरांसाठी अानुवांशिक सुधारणा ही योजना पशुसंवर्धन विभागाने २०१३ मध्ये सुरू केली आहे. यात अधिक दूध देण्याची क्षमता असलेल्या गायी- म्हशी तयार करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमामुळे दररोज किमान दोन लिटरची वाढ नक्कीच होऊ शकते. या योजनेअंतर्गत जे पशुपालक सहा महिन्यांच्या कालवडीचे वजन १०० किलोपर्यंत नेऊ शकतील त्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाण्याची सोय आहे, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी प्रदीप गौरवाडकर यांनी दिली. त्यांचेच मार्गदर्शन अण्णासाहेबांना मिळते. 

अण्णासाहेब कोले - ७०५८९३९१९७ 
प्रदीप गौरवाडकर - ७५८८६२१२२७ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com