किटकनाशकाबाबत हवी जागृती

विष्णू मोहिते
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

अप्रमाणित कीटकनाशक किंवा दोन रसायनांचे मिश्रण करणे यातून धोके मोठे आहेत. कृषी विभागाकडून याची जागृती गावापर्यंत पोचत नाही. तसेच जिथे बोगस आणि अप्रमाणित उत्पादने विक्री होत आहेत, तेथे कडक कारवाई अपेक्षितपणे होत नाही. यामुळेच शेतीतला हा विषप्रयोग धोकादायक पातळीवर आहे.  

यवतमाळ जिल्ह्यात पिकांना रोगांपासून वाचवतानाच्या कीटकनाशक फवारणीत ५७ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे बळी गेलेत. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाल्यासाठी कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय. जिल्ह्यात मल्लेवाडी (ता. मिरज) आणि उंटवाडी (ता. जत) येथेही कीटकनाशक फवारणीवेळी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. अर्थात त्यांच्या मृत्यूपश्‍चात वैद्यकीय तपासणी अहवालात वेगळी कारणे समोर आली आहेत. अप्रमाणित कीटकनाशक किंवा दोन रसायनांचे मिश्रण करणे यातून धोके मोठे आहेत. कृषी विभागाकडून याची जागृती गावापर्यंत पोचत नाही. तसेच जिथे बोगस आणि अप्रमाणित उत्पादने विक्री होत आहेत, तेथे कडक कारवाई अपेक्षितपणे होत नाही. यामुळेच शेतीतला हा विषप्रयोग धोकादायक पातळीवर आहे.  

‘विषाची परीक्षा घेऊ नका’, अशी मराठीत म्हण आहे. नेमके तेच सध्या शेतीच्या क्षेत्रात सुरू आहे. अधिक मोहासाठी शेतकरीबांधव विषाची परीक्षा घेतो आहे. नाशिकपाठोपाठ सांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांची  संख्या मोठी आहे. शिराळा तालुक्‍यात भात, तर आटपाडी, जतसह माण, सांगोला भागात डाळिंबांसह कापूस उत्पादन घेतले जाते. बागायती क्षेत्रात उसासह भाजीपाला उत्पादनासाठी कीटकनाशकाचा वापर अनिवार्य आहे. मात्र, रोगांपासून बचावासाठी विषाचा वापर कसा आणि किती करावा, हे शास्त्रोक्तरीत्या समजावून घेणेच महत्त्वाचे आहे. पिकांचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात शेतकरी कीटकनाशकांबाबत घ्यावयाची काळजी पूर्णपणे विसरून जाताहेत. भविष्यात तरी शेतकऱ्यांनी पिकांचे रक्षण करताना स्वतःचे आणि ते उत्पादन जे लोक अन्न म्हणून खाणार आहेत त्या सर्वांची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

कीटकनाशकांचा अमर्याद वापर केल्याने संपूर्ण मानवी आरोग्यच धोक्‍यात आले आहे. जगभरात सेंद्रिय शेतीला महत्त्व आले आहे; पण आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या काही पिकांबाबत रसायनांच्या माऱ्याशिवाय पर्यायच दिसत नाही. कीटकनाशके मारणारा आणि ते पदार्थ खाणारा हे दोघेही धोक्‍यात आहेत. 

जिल्ह्यात द्राक्षाचे सुमारे सव्वा लाख एकर, डाळिंबाचे सुमारे १२ हजार एकर, केळी सुमारे चार हजार एकर, कापसाचे चार हजार एकर आणि विक्रीसाठी निव्वळ भाजीपाल्यांचे क्षेत्र किमान २० हजार एकरांवर आहे. चांगल्या उत्पादनासाठी कीटकनाशक फवारणी ठरलेलीच असते. जिल्ह्यात द्राक्ष हंगामातच किमान ५००० कोटी रुपयांवर कीटकनाशकांची विक्री होते. ऊस आणि अन्य पिकांवरही आता कीटकनाशकांचा वापर सुरू झाला आहे. शिराळा तालुक्‍यातील भात पिकावर पडलेला तांबेरा रोग, टोळधाडीने नुकसान होते. त्यावर नियंत्रणासाठी औषधांची फवारणी होतेच. यवतमाळ जिल्ह्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यात कीटकनाशक फवारताना शेतकऱ्यांचा मृत्यू सार्वत्रिक चर्चेचा विषय झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी काय दक्षता घ्यावी, याबाबत जागृती महत्त्वाची आहे. 

कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी कोणती दक्षता घ्यावी, यासाठी चार हजार पत्रके छापून ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचवली जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकऱ्यांना हातमोजे, बुट, गॉगल, टोपी, मास्कचे वाटप करणार असून, जनजागृतीसाठी दोन मोबाईल (चित्ररथ) व्हॅन फिरत आहेत. शेतकरी गट, बाजाराच्या ठिकाणी माहिती दिली जात आहे. ‘झेडपी’चा कृषी विभागही मदतीला आहे. जिल्ह्यात मल्लेवाडीतील शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर उंटवाडीच्या शेतकऱ्याचा न्यूमोनियाने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
- राजेंद्र साबळे, 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

शेतीमाल विशेषतः द्राक्षे, डाळिंब आदीचा दर्जा,  मालाचा आकार, रंग, चव, गोडीसाठी अशी पीकवाढ  संजीवके, भूसुधारके, जैविक तसेच सेंद्रिय शेती औषधे अत्यंत गरजेची आहेत. त्यांच्या विक्रीवर बंदी घालणे म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासारखेच आहे. आज ही उत्पादने सर्वच पिकांकरिता वापरली जात आहेत. त्यामुळे सर्व पिकांमध्ये दर्जेदार माल तयार होत आहे.
 - संजय वजरीणकर, 
माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा ॲग्रो इनपुटस्‌ असोसिएशन.

शेतकरी तत्काळ रिझल्टसाठी कीटकनाशकांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करतात. जुन्या औषधांचाही वापर केल्याचे स्पष्ट होते. औषधे फवारताना दक्षता घ्यावयाला हवीच. स्वसंरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. औषध घातकच आहे. ते वापरताना शेतकऱ्यांनी गांभीर्यानेच घेतले पाहिजे. 
 - दीपक राजमाने, 
ऑरबिट क्रॉप सायन्सेस अँड केमिकल्स्‌ प्रा. लि. सांगली

पिकांवर कीटकनाशक फवारणीवेळी घ्यावयाची दक्षता...
- आजारी व्यक्तीने कीटकनाशकांची फवारणी करूच नये
 (उदा. रक्तदाब, हृदयरोग, अशक्त, १८ वर्षांआतील बालक, अगदी न्यूमोनिया, ताप आलेल्या व्यक्तीसुद्धा) 
- उपाशीपोटी कीटकनाशक फवारणीवेळी अनेकांना धोक्‍याचा संभव 
 - हवेतून कीटकनाशकांचा शरीरात सहज प्रवेश शक्‍य 
- कीटकनाशक फवारताना वाऱ्याची दिशा समजून विरुद्ध दिशेने फवारणी टाळावी
- कीटकनाशक फवारणी करताना तोंडाला कापड बांधावे 
 - योग्य प्रमाणानुसारच कीटकनाशकांचा वापर करावा
 - तत्काळ रिझल्टसाठी दोन किंवा अधिक कीटकनाशके एकत्र करून फवारली जाणे धोक्‍याचेच
 - फवारणी करताना शरीर संपूर्ण झाकावे
 - फवारणी झाल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवावेत 
 - कीटकनाशके लहान मुलांपासून दूर ठेवावीत 
  - पॅकेटवर खबरदारी घेण्याविषयी माहिती दिली जाते त्याप्रमाणे दक्षता घ्यावी 
- फवारणी करताना हातात हातमोजे घालावेत 
 - उपाशीपोटी फवारणी करतानाही रिॲक्‍शन होऊ शकते
 - मद्यपान केले असल्यास मोठी रिॲक्‍शन होऊ शकते
 - सध्या ऑक्‍टोबर हीट असल्याने सकाळी किंवा सायंकाळीच फवारणी करा
 कीटकनाशक फवारताना मदतीसाठी व्यक्ती असावी

कंपन्यांचा दावा
राज्य शासनाने ३ ऑक्‍टोबर २०१७ रोजी एका अध्यादेशाद्वारे सरसकट सर्व बिगर नोंदणीकृत शेती औषधे, संजीवके, भूसुधारके, जैविक, सेंद्रिय शेती औषधे आदीवर शासन मान्यताप्राप्त कीटकनाशके, खते परवानाधारक दुकानामध्ये विक्रीस बंदी घातली. यामागे महाराष्ट्रात अलीकडेच घडलेल्या काही दुर्घटनांची पार्श्‍वभूमी असेलही; परंतु या निर्णयाने मुख्यतः शेतीचे नुकसान होणार आहे, असा कीटकनाशक उत्पादक कंपन्यांचा दावा आहे.