मातीखालच्या बिया

मातीखालच्या बिया

‘बाई, ह्या म्हातारीचा काही बंदोबस्त करावा लागंल, कार्यक्रमाच्या दिवशीच नाहीतर येईल मधेच, ख्वॉऽऽक ख्वॉऽऽक करीत ! करील रंगाचा बेरंग !’
सुभाणराव अंगावर कोट चढवत होते. त्यांना एकतर उशीर झाला होता. सुभाणरावांना आमदाराच्या आईच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला जायचं होतं. ते पत्नी सुंदराबाईला म्हणाले, ‘सुंदरा, म्हातारीची खाट गाईच्या गोठ्यात जाऊ द्यायची. तिला खायला प्यायला तिथंच द्यायचं. वाटल्यास दत्तूला त्यादिवशी दारातच बसून ठेवायचं. म्हणजे म्हातारी येऊन गडबड करणार नाही !’
‘ऐकलं का तुमच्या या एकसष्टीच्या कार्यक्रमात तुम्ही मला हिऱ्याची अंगठी भेट देणार आहात ते तुमच्या लक्ष्यात आहे नं पण !’
‘सुंदरा, मी कसं विसरेल? आणि म्हातारीचं बघा, व्हायपी लोक येणारयत आपल्याकडं !’
म्हातारी म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही. सुभाणरावांची बय. म्हणजे आई. ती काठी टेकत टेकत काहीतरी सांगायला आली होती. पण आडभिंतीला येताच तिच्या कानावर लेकासुनाचं बोलणं पडलं अन काठी न वाजता आल्या पावली निघून गेली. ज्या लेकाला ती हिरा समजली होती. तो तर गारगोटी निघाला होता. बयीच्या डोळ्याला पाणी आलं. माती उकारावी तसं ती तिचंच काळीज उकरू लागली. काही दिवस तिच्या हाताला लागले. जेव्हा सुभणराव तिच्या गर्भात होता. नवऱ्यानं अन त्यानं ठेवलेल्या बाईनं बयीचं जगणं मुश्किल केलं होतं. तिचं जगणं सळो की पळो करून सोडलं होतं. तरी बय पोटातल्या गर्भासाठी लापटाचं जिणं घेऊन त्या घरात राहत होती. तो दिवस मात्र हट्टाला पेटल्यासारख्या तिच्या मुळावर येऊन बसला होता. नवऱ्याने मारायला सुरवात केली. ती विनवण्या करू लागली.


‘मला नका काढू घराबाहेर ! मी कुठे जाऊ? राहील कोपऱ्याला पडून !’
मात्र नवऱ्यानं ठेवलेली बाई ऐकायला तयार नाही. ती म्हणाली,
‘ही जर ह्या घरात ऱ्हायली तर तुम्हाला मला मुकावं लागेल !’
नवरा पक्का त्या बाईच्या आहारी गेलेला. त्याला तिला मुकायचं नव्हतं. त्यानं त्या दोन जीवशी बयीला झिट्या धरून घराबाहेर काढू लागला.
‘दोन जीवशी हाये मी तुमचा अंकुर वाढतोय माझ्या गर्भात ! त्याचा तरी विचार करा !’
‘तुझी गरज नाहीये मला !’
‘माझं ऐका हे मूल जन्माला येऊद्या मी स्वतःहून घरातून निघून जाईन !’
नवरा तिचं काहीच ऐकायला तयार होईना. ती ऐकेना म्हणून त्यानं थेट तिच्या गर्भावरच लाथ मारली. ती अशी कळवळून पडली की सारी पृथ्वीच तिच्याभोवती गरगरली. शुद्ध हरपली. शुद्धीवर आली तेव्हा तिनं दरवाजावर थाप दिली नाही. ती कळून चुकली होती की या घराचं दार आपल्यासाठी कायमचं बंद झालं आहे म्हणून तिनं माहेरचा रस्ता धरला. माहेरात होतं तरी जीवाचं कोण? आई-वडील लहानपणीच वारून गेलेले. एका खट्याळ भावजय अन तिच्या शब्दाबाहेर नसलेला पाठचा भाऊ. त्यांनीही तिला थारा दिला नाही. मग डोक्यावरचं आभाळ अन पायाखालची जमीन एवढंच होतं तिचं. ती चालत राहिली. चालता चालता भोवळ येऊन जिथे पडली; तिथे पाटलाचं घर होतं. तिच्या कपाळावर जे काही चांगलं लिहिलं होतं. ते घडायचं होतं. पाटील अन पाटलीणबाई तिला घरात घेऊन जातात. पाटलाला तसंकाही पोरसोर नव्हतं. तिची कहाणी ऐकून पाटलीणबाईचे डोळे भरून आले. त्यांनी तिला एका रात्रीचा आसरा दिला. त्या रात्री पाटलाच्या घरावर दरोडा पडला. लुटालूट सुरू केली. बय घाबरून गेली की ही कुठली वेळ आपण या घरात घेऊन आलो. पाटलाच्या डोक्यात पहारीचा वार, एक दरोडेखोर करणार; तोच बयने त्याच्या डोक्यात मोगरीनं वार केला. अन गल्लीत ओरडत तिनं गाव जागं केलं. दरोडेखोर घाबरून पळून गेले. पाटलाचा जीव वाचला. त्याला माया दाटून आली.


‘पोरी, आयुष्यभर मी नुसतंच कमावलं पण आज मला कळलंय जीवनाचं सत्य. खरं तर लेकी माझे डोळे उघडले. ही जमीन तुला दान.’
चाळीस एकर जमीन बयीला दान करून पाटील अन पाटलीणबाई तीर्थयात्रेला निघून गेले. पण त्यांना निघताना बय म्हणाली.
‘मला माझ्या जवळच्या माणसांनी हुसकून दिलं. तुम्ही मात्र माझे मायबाप झालात ही तुमची लेक तुमची वाट पाहीन. तिलाही तुमची सेवा करण्याचं पुण्य लाभू द्या !’
ते पुण्यही तिच्या पदरात पडलं. त्यांची लेक होऊन त्यांना मरेपर्यंत सांभाळलं. बय ही गावासाठी एक आदर्श ठरली. आज मात्र तिच्या लेकाने तिच्या मातृहृदयाला डागण्या दिल्या. लेकाने वरकरणी जो मातृप्रेमाचा बुरखा पांघरला होता. तो टराटरा फाटत गेला. त्याचं खरं रूप समोर आलं.
सुभणरावांचं आईवरचं प्रेम सर्वश्रृत होतं. त्यांना पंचक्रोशीतच नव्हे, तर दूरदूरच्या तालुक्यांतून आईवर व्याख्यान देण्यासाठी बोलावलं जातं. ते अनेकांची कानउघाडणी करत डोळ्यात झणझणीत अंजण घालत; त्यांच्या व्याख्यानाचा विषयच ‘आईची महती’. व्याख्यानाची सुरवातच मी आज जो काही घडलो आहे त्याच्या मागे माझी आई आहे. असं सांगत असे. त्यांच्या रसाळवाणीवर श्रोते लुब्ध होतात. एक उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. आमदार खासदार त्यांना सन्मानाने कार्यक्रमास बोलवत. समाजात प्रचंड आदरभाव त्यांना दिला जात होता. कितीतरी जण येऊन त्यांना सांगत की तुमचं व्याख्यान ऐकलं अन आमचे डोळे उघडले. आम्हाला आमची चूक उमगली. तुमचे थोर उपकार आहे आमच्यावर. अशा सुभणरावांनी आईच्या गर्भा वरच सणसणीत लाथ हाणावी हे मात्र वाईट!
बयीचं काळीज चिरत गेलं. ज्या पोरासाठी संपूर्ण उमर जाळली. तोपोरगा आपल्याला गोठ्यात ठेवण्याची भाषा करतोय. पाटलांसारखं आपण निपुत्रिकच असायला हवं होतं. असा लेक आपल्या पदरी पडला याचं बयीला वाईट वाटलं.
शुभणरावांच्या एकसष्टीचा कार्यक्रम जोरात सुरू असतो. सुभाणरावांना आईविषयी विचारलं जातं. पण ते तिची तब्बेत बरी नसल्याचं कारण देऊन त्यातून सुटका करून घेतात. तेवढ्यात बय व्यासपीठावर येते. अन माईकच ताब्यात घेते.
‘... माझ्या लेकाचं भाषण तुम्ही ऐकलंच. असा लेक होणे नाही ! तो त्याच्या आईला कित्ती मानतो हे सर्वांना ज्ञात आहे. आईवर व्याख्यान देऊन खूप पुण्य त्याच्या पदरी गोळा झालं आहे. आईची महती जेव्हा तो सांगतो तेव्हा प्राणाचे कान करून आपण ऐकत राहतो. माझं दर्शन घेतल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही ! मला विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही. असा मुलगा जगातल्या साऱ्याच आयांना लाभावा. कालच त्यानं माझ्याजवळ येऊन कळकळ व्यक्त केली. की त्याला माहीतयं जमाना बदलत चाललाय. म्हाताऱ्या आई-वडिलांना घरातल्या केरकचऱ्यात लोक घराबाहेर काढून देऊ लागलेय. मला म्हणाला बय ‘आपली चाळीस एकर जमीन आपण वृद्धाश्रमासाठी दान करू ! म्हणजे कुठल्याच आईला गाईच्या गोठ्यात राहण्याची वेळ येणार नाही !’
लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सुभणरावांचा जयजयकार केला. सुभणरावांच्या काळजावर त्या टाळ्यांचे घाव उमटले होते. त्यांच्या सणसणीत मुस्काटात बसल्यासारखी झाली होती. त्याचं मरून पाणी तर झालंच पण एवढं खजिल झाले की ते खजिलपण त्यांना चेहऱ्यावर दाखवताही येईना ! बयीचं भाषण संपलं. ती व्यासपीठावरून उतरून सरळ गाईच्या गोठ्यात जाऊन बसली.
सुभाणरावाना आपली चूक कळली. त्यांनी बयीचे पाय धरले. पण बय मात्र समजून चुकली होती. ती म्हणाली.


‘लेका, तू माझे नाही पाय धरलेत ! तू तर चाळीस एकर जमिनीचे पाय धरले ! तू रोज माझ्या पाया पडून दिवसाची सुरवात करायचा. पण आज कळलं की तू चाळीस एकराच्या जमिनीच्या पाया पडायचं माझ्या नाही ! ती जमीन मलाही दानातंच मिळलीय. म्हणून मी हा निर्णय घेतला.’
सुभणराव निघून गेला. गाईचा गोठा मात्र हंबरून आला होता. जसे त्याला हात फुटले होते. तो बयीचे अश्रू पुसत होता. बयीच्या डोळ्यात वृद्धाश्रमाची उंचच उंच इमारत उभी राहिली होती.
(लेखक साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते साहित्यिक अाहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com