फूल सजावटीतील ‘फीलर्स’नी पाटील यांचे आयुष्यही सजवले

राजकुमार चौगुले
सोमवार, 20 मार्च 2017

रुकडी (जि. कोल्हापूर) येथील शीतल ऊर्फ अप्पासो बाबासो पाटील हे दूरदृष्टीचे शेतकरी म्हणावे लागतील. सुमारे १६ वर्षांपूर्वी उसाच्या पट्ट्यात पॉलिहाउसचा प्रयोग करणारे पाटील पुढे फुलांच्या डेकोरेशनला लागणाऱ्या फीलर्स वनस्पतींच्या शेतीकडे वळले. त्यात आज सतरा वर्षांचा गाढा अनुभव त्यांनी मिळवला आहे. बदलता काळ, मार्केट यांचा अभ्यास करणाऱ्या पाटील यांचे शेत म्हणजे विविध प्रयोगांची जणू प्रयोगशाळाच झाली आहे. 

रुकडी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे सधन गाव. येथील प्रयोगशील शेतकरी शीतल ऊर्फ अप्पासो पाटील यांची २१ एकर शेती आहे. त्यातील रुकडी येथे १५ एकर, तर कर्नाटकात पाच ते सहा एकर शेती आहे. विविध प्रयोग करण्याचे बाळकडू त्यांना वडील बाबासाहेब यांच्याकडूनच मिळाले. वडिलांनी त्यांच्या काळात संकरित ज्वारी उत्पादनात राज्यात पहिला क्रमांक मिळविला होता. 

दूरदृष्टीचे शीतल  
एकीकडे ऊस शेती करताना १९९८ च्या सुमारास शीतल यांनी कोल्हापूर जिल्ह्यात नवखा असलेला पॉलिहाउसमधील जरबेरा शेतीचा प्रयोग केला. त्यात ते यशस्वीही झाले. पुढे परिसरात इतर शेतकरी यात उतरले. पॉलिहाउसेसची संख्या वाढू लागली. मग मात्र काळाची पाऊले अोळखत प्रयोगांची दिशा बदलण्याचे त्यांनी ठरवले. फूलशेतीचा अनुभव असल्याने फुलांच्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या फीलर्स वनस्पतींच्या रूपाने वेगळी वाट सापडली.  

कुटुंब राबते शेतीत  
पाटील यांच्या गैरहजेरीत पत्नी माधुरी या शेतीचे व्यवस्थापन पाहतात. मुलगा प्रणोत सध्या काजू प्रक्रिया कारखाना सांभाळतो. त्याची अभियंता पत्नी पारुल यादेखील शेतीत सर्वतोपरी मदत करतात.  शेतात सात ते आठ मजूर कायम असतात. त्यांच्या निवासाची, मुलांच्या शिक्षणाची, आधार कार्ड अशी सगळी सोय करून दिल्याने मजुरांसोबत जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. त्यामुळे मजूरटंचाई कधीही जाणवत नाही. या कामगारांना डेकोरेशनचे प्रशिक्षणही दिले आहे. यामुळे सोहळ्याच्या ठिकाणी ते स्वत: जाऊनही डेकोरेशन करतात. 

फीलर्सची शेती अन् मार्केटिंगही 
प्रत्येकी २५ गुंठ्यांत कामिनी व ॲस्परॅगस या फीलर्स वनस्पतींची लागवड सन २००० च्या दरम्यान केली. पुण्याहून रोपे आणली. त्या काळात या पिकांबाबत व्यापाऱ्यांनादेखील फार माहिती नव्हती. त्यामुळे कोल्हापूर, बंगळूर, कोकण, गोवा आदी ठिकाणी व्यापारी, फुले डेकोरेशन व्यावसायिक यांच्या दारात जाऊन मार्केट तयार करावे लागले. त्या वेळी जे अथक कष्ट घेतले त्याची फळे शीतल यांना आज मिळू लागली आहेत.  

मार्केट व दर 
पूर्वीच्या काळात दररोज सर्वत्र फिरून मार्केटमध्ये फीलर्सला नाव मिळवून दिले. आज हे फीलर्स कोल्हापूर, मुंबई, गोवा व कोकणातही जातात. लग्नसराई, डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ विक्रीसाठी सर्वांत महत्त्वाचा असतो. या काळात कमाल दर मिळतात. प्रति बंडल (१० काडींचे) ८ पासून ते १२, १५ रुपयांपर्यंत कामिनीला दर मिळतो. तर ॲस्परॅगसला प्रति बंडल (३० ते ४० काडीचे) १८ ते २५ रुपये दर मिळतो. पावसाळा हा दरांच्या दृष्टीने तसा ‘स्लॅक’ हंगाम राहतो. हिवाळ्यातही मालाची आवक कमी असते. वर्षभराचा विचार केला, तर या व्यवसायातून सुमारे ४० टक्के नफा मिळतो, असे पाटील यांनी सांगितले. 

मुंबईच्या बाजारपेठेत खास ओळख
सतरा वर्षांच्या अनुभवात पाटील यांना अनेक व्यापारी वैयक्तिक ओळखतात. दर्जा उत्तम असल्याने त्यांच्या फीलर्स मालाला नियमित मागणी असते. कोल्हापूरसे आनेवाला पाटील का कामिनी, ॲस्प्रा चाहिये अशी आग्रही मागणी व्यापारी व ग्राहकांकडून मुंबईच्या मार्केटला कायम होते. 
फीलर्सची अत्यंत काळजीपूर्वक शेती

पाटील म्हणतात, की फीलर्स म्हणजेच फुलांच्या डेकोरेशनमध्ये वापरली जाणारी पाने असल्याने ती कायम हिरवी, तजेलदार ठेवावी लागतात. त्यावरच त्यांचा दर असतो. त्यामुळे त्यांचे उत्पादनही तसेच काटेकोर पद्धतीने घ्यावे लागते. वर्षभर शेतीकडे काळजीपूर्वक पाहावे लागते. पूर्वी प्रत्येकी २५ गुंठ्यांचे जे प्लॉट होते ते आजही तसेच उत्तम प्रकारे ठेवले आहेत, असे पाटील यांनी सांगितले. 

कॅलेंडर पाहून व्यवस्थापन 
पाटील म्हणाले, की कॅलेंडर समोर ठेवूनच आम्हाला फीलर्स शेतीचे नियोजन करावे लागते. फेब्रुवारीत लग्नाचे मोठे मुहूर्त कोणते आहेत? त्यातही रविवार किती येतात? व्हॅलेंटाइन डे असे विविध ‘इव्हेंट’ साधावे लागतात. त्या दिवशी फीलर्स बाजारात उपलब्ध करणे गरजेचे असते. त्यामुळे फीलर्सची शेती म्हणजे कौशल्याचे काम आहे. म्हणजेच उन्हाळ्यातील विक्रीचे नियोजन करण्यासाठी शेतीचे नियोजन सप्टेंबर आॅक्टोबरमध्येच सुरू होते.  

आनंद हिरवाईचा...
बारमाही हिरवाई पाहायची असेल तर पाटील यांच्या शेतात चला, अशी धारणा परिसरातील शाळांची झालेली आहे. या हिरवाईचा आनंद लुटण्यासाठी परिसरातील शाळांच्या सहली त्यांच्या शेतावर येतात. त्यांचे शेतातील कार्यालय एखाद्या फार्महाउससारखे आहे. विविध फळांची झाडे सभोवताली आहेत.  

पूर्वी उसाचे उत्पादन एकरी ४० टनांच्या आसपास होते. आता ते ८० ते ११२ टनांच्या आसपास गेल्याचे पाटील म्हणाले. यापूर्वी ग्लॅडिअोलस फुलांची शेतीही करण्याचा प्रयोग केला. मात्र मार्केटिंगच्या दृष्टीने तो तितकासा यशस्वी झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांपासून काजू प्रक्रियेतही हे कुटुंब उतरले आहे. 
: शीतल पाटील, ९७६५६१८४६१