फवारणीसाठी वापरा योग्य ‘पीएच’चे पाणी

tusharsinchan
tusharsinchan

फवारणीद्वारे वापरलेली कीडनाशके, खते यांचे पिकामध्ये योग्य शोषण झाल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात. मात्र, बहुतांश शेतकरी फवारणीसाठीच्या पाण्याच्या दर्जाकडे लक्ष देत नाहीत. पाण्याच्या स्रोतामध्ये औद्योगिक रसायने, शहरातील प्रदूषित पाणी आदी घटक मिसळले गेल्याने ते वापरण्यायोग्य राहत नाहीत. त्याचा सामू (पीएच) ७ पेक्षा अधिक (८ ते १० पर्यंत) असतो. अशा पाण्यामध्ये मिसळलेल्या घटकाचे विघटन लवकर होते. या प्रक्रियेला ‘अल्कलाइन हायड्राॅलिसीस’ म्हणतात. सामू ८ ते ९ च्या दरम्यान असलेल्या द्रावणामध्ये ही क्रिया जलद घडते. अशा द्रावणाचे शोषण पिकांकडून कमी प्रमाणात होते. अपेक्षित परिणामही मिळत नाहीत, त्यामुळे फवारणीसाठी वापरलेल्या पाण्याचा पीएच योग्य म्हणजे ६ ते ६.५ च्या दरम्यान असावा म्हणजे या द्रावणाचे पिकाकडून चांगले शोषण होते. 
 
अल्कलाइन हायड्राॅलिसीस या क्रियेचा वेग हा क्रियाशील घटकाची पाण्यात विरघळण्याची क्षमता, तापमान, आर्द्रता व त्यासोबत मिसळल्या गेलेले बुरशीनाशक, विद्राव्य खत, वाढ संप्रेरक यावर ठरतो. विशेषतः कीटकनाशकामध्ये ही क्रिया जलद व जास्त घडते. ही विघटन क्रिया मोजण्यासाठी त्या कीटकनाशकाची कार्यक्षमता अर्ध्यापर्यंत किती वेळात घटते हे मोजले जाते. 

उदा. - एखाद्या कीटकनाशकाची अर्धी कार्यक्षमता १ तास असल्यास, त्यातील क्रियाशील घटक एक तासामध्ये ५० टक्के कमी होतो. पुढील एक तासात २५ टक्के, नंतरच्या एक तासात १२.५ टक्के अशा प्रमाणे संपूर्ण द्रावण ठराविक वेळेनुसार अकार्यक्षम बनते. 

पीएच म्हणजे काय? 
फवारणीपूर्वी आपण वापरत असलेल्या पाण्याचा पीएच माहीत करून घेणे आवश्यक आहे. पाण्याचा पीएच हा नेहमी १ ते १४ या अंकापर्यंत मोजला जातो. पाण्याचा पीएच तपासण्यासाठी लिटमस पेपरचा वापर केला जातो. मात्र त्यामुळे पाण्याचा नक्की सामू समजत नाही. बाजारात डिजीटल पीएच मीटर उपलब्ध अाहे. त्याचा वापर केल्यास नेमका पीएच कळतो. 
- पाण्याचा पीएच त्यातील धन भार किंवा ऋण भारीत आयनांच्या प्रमाणावरून ठरतो. 
- ज्या पाण्यामध्ये धन भाराचे प्रमाण अधिक असते ते पाणी आम्लधर्मीय असते. १ ते ७ अंकापर्यंतचा पीएच हा आम्लधर्मीय असतो. 
- ज्या पाण्यात ऋण आयनांचे प्रमाण अधिक असते, ते पाणी अल्कधर्मीय असते. ७ पासून पुढे १४ पर्यंतचा पीएच हा अल्कधर्मीय समजतात. 
- ७ अंक दर्शविणारा पीएच हा उदासीन समजतात. 
- दोन अंकांमधील पीएच १० पट जास्त असतो. यावरून आपणास पीएचची तीव्रता समजून येईल. 

फवारणीवेळी याकडे लक्ष द्या... 
- फवारणीसाठी पाण्याचा सामू हा ५ ते ६.५ या दरम्यान असावा. पाण्याचा सामू योग्य पातळीपर्यंत कमी करण्यासाठी सायट्रिक ॲसिड किंवा लिंबाच्या रसाचा वापर करतात. मात्र पाण्याचा पीएच स्थिर अधिक काळ ठेवू शकत नाही. अधिक स्थिरतेसाठी सध्या बाजारातील काही द्रावणे उपयुक्त ठरू शकतात. परिणामी फवारणीतील घटक दीर्घकाळ व पूर्ण क्षमतेने क्रियाशील राहून, योग्य तो परिणाम मिळतो. 
- द्रावणाचा पीएच नियंत्रित करण्यासाठी फार खर्च येत नाही. कारण पीएच नियंत्रक घटकांचे प्रति १०० लिटरसाठी प्रमाण ३० ते ४० मिलिपर्यंत असते. तुलनेने फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांची किंमत अधिक असते. क्रियाशीलता कमी झाल्याने अपेक्षित परिणाम न मिळाल्यास अधिक नुकसान होऊ शकते, हे लक्षात ठेवावे. 
- फवारणी सकाळी किंवा दुपारनंतर केल्यास याचा जास्त फायदा होतो. सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण कमी असते. तसेच या वेळी पानावरील छिद्रे (स्टोमॅटा) जास्त प्रमाणात उघडलेली असतात. त्याद्वारे फवारणीचे द्रावण जास्त प्रमाणात शोषले जाते. 

तणनाशकाची फवारणीवेळी... 
बहुतेक तणनाशके ही विम्लधर्मीय (अल्कलाइन) असतात. त्याच वेळी पाण्याचा सामूही विम्लधर्मीय असल्यास तणनाशकाची अर्धी कार्यक्षमता लवकर संपते. त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा वेळी तणनाशकालाच दोष दिला जातो. 

उदा. अमेरिकेत फ्लोरिडा विद्यापीठामध्ये रुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या एका तणनाशकांसंदर्भात प्रयोग करण्यात आला होता. हे तणनाशक अल्कलाइन हायड्राॅलिसीस या क्रियेस लवकर बळी पडते. द्रावणाचा सामू ९ असताना त्याती अर्धी कार्यक्षमता १५ मिनिटांतच संपते. सात असताना अर्धी कार्यक्षमता २४ तासांत संपते. मात्र द्रावणाचा पीएच ५ असताना हे तणनाशक कित्येक दिवसांपर्यंत क्रियाशील राहते. 

संपर्क- शिवाजी थोरात, ९८५००८५८११ 
(लेखक पुणे स्थित पीक अन्नद्रव्य व्यवस्थापनातील तज्ज्ञ आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com