प्रयोगांचा वेड असलेला पासष्टीतील ‘तरुण’

प्रदीप अजमेरा 
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

श्रीधर विश्वनाथ भुतेकर. वय वर्षे फक्त ६५. मात्र शेतीतील उत्साह आणि प्रयोगशील वृत्ती आजच्या पिढीलाही लाजवणारी. पत्नी विमला यांच्या साथीने या वयातही २४ एकरांतील शेती ते मोठ्या हिंमतीने सांभाळतात. रोप पद्धतीच्या ऊसशेतीतून त्यांनी एकरी २० टनांनी उत्पादन वाढवत एकरी १० हजार रुपयांची बचत साधली आहे. शेतीची त्यांची प्रयोगशाळा नव्या पिढीने जरूर अनुभवावी अशीच आहे

जालना जिल्ह्यातील शिंदे वडगाव (ता. घनसावंगी) तसे अडवळणीचे गाव. पाण्याची बऱ्यापैकी सोय. त्यामुळे बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात. गावातील प्रयोगशील शेतकरी म्हणून श्रीधर भुतेकर यांची अोळख. पण २०१२ पासून सततच्या दुष्काळामुळे तेही हैराण झाले. सुमारे २४ एकरांतील ८ एकर ऊस आणि ४ एकर मोसंबी मोडावी लागली. पण हिम्मत सोडली नाही. त्यांना थांबणे माहीतच नसते. नवे प्रयोग करीत ते पुढे जातच असतात. 

भुतेकरांचे स्मार्ट पीक नियोजन 
- शेतीचे क्षेत्र - २४ एकर 
- ऊस सुमारे ८ ते १० एकर- अनेक वर्षांचा या पिकातील अनुभव. सोयाबीन, कापूस व हरभरा ही अन्य पिके.. 
- पूर्वहंगामी ऊस- त्यानंतर खोडवा- तो तुटून गेल्यानंतर त्या जागेवर सोयाबीन वा कापूस- त्यानंतर हरभरा. नियोजनात पाणी, जागा, पिकांप्रमाणे थोडा बदल. 

उसाची सुधारित शेती 
पूर्वी भुतेकर ऊसशेती पारंपरिक पद्धतीने करायचे. चार पाच वर्षांपासून त्यांनी रोपनिर्मिती करून 
ऊसशेती सुरू केली आहे. 
वाण - फुले २६५ 

रोपे तयार करण्याचा निर्णय 
पूर्वी कापूस पीक उभे असल्याने ऊस लागवडीसाठी क्षेत्र शिल्लक नव्हते. वेळेची बचत आणि कापसाचे नुकसान टाळता यावे म्हणून उसाची रोपे तयार करून लागवड करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी एकदा या पद्धतीने उसाचे ६० टनांपेक्षा (एकरी) उत्पादन मिळाले होते. मात्र पाण्याअभावी ऊस मोडून टाकावा लागला होता. 

अलीकडील प्रयोग 
१) बेणे घरचेच - बेणेमळ्याचे व्यवस्थापन करून त्यातूनच उसाची निवड करून रोपे तयार केली. 
२) रोपे तयार करण्याची पद्धत- (त्यासाठी क्षेत्र- सात गुंठे) 
- चांगल्या उसाची निवड करून डोळा काढणी यंत्राच्या साह्याने डोळा काढला. 
- कार्बेनडाझीम व क्लोरपायरिफॉसच्या द्रावणात ५ मिनिटे बुडविले. त्यानंतर अॅसिटोबॅक्टरचे संस्करण 
- त्यानंतर उसाचे डोळे कोकोपीट भरलेल्या ट्रे मध्ये भरून शेडनेटमध्ये सर्व ट्रे एकावर एक रचून ठेवले. त्यावर ८ दिवसांसाठी ताडपत्री झाकली. मध्यंतरी थंडी वाढल्याने ताडपत्री ४ दिवस जास्त झाकावी लागली. ताडपत्रीमुळे आतील तापमान वाढून उगवण चांगल्या प्रकारे झाली. 

३) पुनर्लागवड- सुमारे दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत रोपे लागवडीसाठी तयार झाली. 
लागवडीचे अंतर- ४ बाय २ फूट. एकरी सुमारे ५३०० रोपे बसवली. 

रोपनिर्मितीचे झालेले फायदे- 
१) पारंपरिक पद्धतीत एकरी तीन टन बेणे लागते. रोपपद्धतीत हेच काम साडे १२ क्विंटल बेण्यामध्ये झाला. बेणेखर्चात बचत झाली. 
२) सर्व रोपे दीड महिना कालावधीसाठी एकाच ठिकाणी असल्याने त्यांची देखभाल करणे सोयीचे झाले. 
३) पुनर्लागवडीच्या शेतात पिके उभी असताना रोपे नर्सरीत तयार करता येतात. त्यामुळे पूर्वीच्या पिकाचे उत्पादन पूर्ण क्षमतेने घेणे शक्य होते. 
४) रोपे वापरल्याने उसाचा प्रत्यक्ष कालावधी दीड महिन्यापर्यंत कमी होतो. पक्वतेसाठी लागणारा कालावधी पूर्ण मिळतो. 
५) रोपनिर्मितीचा खर्च थोडा वाढतो. मात्र पुनर्लागवडीच्या शेतात दोन खुरपणी व दोन पाणी यांचा खर्च कमी होतो. 
६) रोपांची वाढ एकसमान पद्धतीने करता येते. 

पूर्वीचे उत्पादन- एकरी ४० टनांपर्यंत 
सुधारित पद्धतीत उत्पादन- एकरी ६० टनांपर्यंत 

खर्च कमी झाला 
भुतेकर म्हणाले, की रोपनिर्मिती पद्धतीत सर्व मिळून एकरी १० हजार रुपयांपर्यंत बचत होते. शिवाय एकरी उत्पादनातही वाढ झाली आहे. एरवी ऊसशेतीत उत्पादन खर्च सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत येतो. आता रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यामुळे खर्चात बचत झाली आहे. 

भुतेकरांच्या शेतीतील उल्लेखनीय 
१) घरी ४० गायी आहेत. त्यांच्यापासून वार्षिक १०० ट्रॉलीपर्यंत खत मिळते. 
२) शेतातील काडीकचरा कधीच जाळला जात नाही. ऊस पाचटाचे नित्य आच्छादन. 
३) पीक फेरपालट सातत्याने. त्यामुळे जमिनीचा पोत चांगला सुधारला आहे. गोमूत्राचा वापरही केला जातो. 
४) पूर्वी रासायनिक खतांवरील खर्च ५० ते ६० हजारांपेक्षाही जास्त व्हायचा. आता सेंद्रिय पद्धतीतून तो कमी केला आहे. 
५) सुमारे तीन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे. त्यामुळे दुष्काळात सुमारे २४ एकरांसाठी सिंचन करण्याची सोय. केवळ पाचटाचे आच्छादन केल्यामुळेच मागील दुष्काळातही उसाचे एकरी २५ टन उत्पादन घेता आले. हरभऱ्याला तुषार सिंचन. 
६) कृषी विभागाच्या विविध अधिकाऱ्यांचे सतत मार्गदर्शन. 

सोलर संचाचा वापर 
ग्रामीण भागात विजेचा फार मोठा प्रश्न आहे. मात्र भुतेकर यांनी ५ एचपी क्षमतेचा सोलर संच बसवून हा प्रश्न सोडविला आहे. त्यासाठी फक्त ३५ हजार म्हणजे ५ टक्के रक्कम भरावी लागली. बाकी बँक व अनुदान यांचा आधार झाला. 

काबुली हरभऱ्याची शेती 
भुतेकर यांच्याकडे दरवर्षी ७ ते १० एकरांवर काबुली हरभरा असतो. बेसल तसेच दोन वेळेस फावरणीतून खते दिली जातात. एखादी कीडनाशकाची फवारणी, दोन वेळेस निंदणी अथवा खुरपणी एवढाच काय तो खर्च. उत्पादन १० ते १२ क्विंटल मिळते. दर ५ हजारांपासून ते सहा, आठ हजार तर मागील वर्षी १० ते १५ हजार रुपयांपर्यंत मिळाला होता. सोयाबीनचेही एकरी १२ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. यंदा ४ एकर मोसंबी व ३ एकर द्राक्षे लावण्याचे नियोजन अाहे. 

पहाटेच शेतावरी 
भुतेकर आज पाचष्टीतही पहाटे साडेपाच- सहाच्या सुमारास शेतात जातात. संध्याकाळपर्यंत ते शिवारातच असतात. पत्नी सौ. विमलबाई या देखील त्यांच्या साथीने शेतात न थकता कष्ट करतात. 
सोबत पुतण्याही शेतात राबतो. जास्तीतजास्त स्वतःच काम करायचे व कमीतकमी मजूर कामांसाठी ठेवायचे अशी त्यांची पद्धत असते. त्यामुळे मजुरीवरील खर्च खूपच कमी असतो. 

आजही विद्यार्थीच 
परिसरातील कोणतेही कृषी प्रदर्शन, मेळावा, चर्चासत्र किंवा प्रशिक्षण असो भुतेकर यांची तेथे उपस्थिती असतेच असते. ॲग्रोवनचे अंक त्यांच्या संग्रही आहेत. शिवाय कृषीविषयक साहित्य, मासिके यांचेही वाचन करून आपले ज्ञान अद्ययावत करण्याचे त्यांचे काम सतत चालूच असते. 

(लेखक अंबड, जि. जालना येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.) 
संपर्क : श्रीधर भुतेकर - ९४२०३३६१९९