टोकण पद्धतीने करा बागायती सूर्यफूल पेरणी 

टोकण पद्धतीने करा बागायती सूर्यफूल पेरणी 

रब्बी हंगामातील बागायती सूर्यफूलाची लागवड टोकण पद्धतीने करावी. बीजप्रक्रीया करुनच लागवड केल्याने बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांपासून बचाव तर होतोच तसेच लागवडीपासून पहिल्या महिन्यात पिकाची जोमदार वाढ होते. 
रब्बी हंगामातील वातावरण सुर्यफुल पिकासाठी अत्यंत पोषक असते. त्यामुळे सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब उत्पादनात मोठी वाढ करु शकतो. 

जमीन ः पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. 
पूर्वमशागत ः जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या-आडव्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या (१० ते १२ टन) शेणखत घालावे. 

पेरणीची वेळ ः बागायती रब्बी सूर्यफुलाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी. 

पेरणीचे अंतर ः 
मध्यम जमीन - ४५ सें.मी. x ३० सें.मी. 
भारी जमीन - ६० सें.मी. x ३० सें.मी. 

पेरणीची पद्धत ः 
बागायती सूर्यफुलाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी. 

बियाण्याचे प्रमाण ः 
सुधारित वाणाचे ८-१० किलो तर संकरित वाणाचे ५-६ किलो बियाणे प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. 

- बीजप्रक्रिया : प्रति किलो बियाणे (चोळावे) 
१) मर रोगप्रतिबंध : थायरम २ ते २.५ ग्रॅम. 
२) केवडा रोगप्रतिबंध : मेटॅलॅक्झील (३५ एस.डी.) ६ ग्रॅम. 
३) विषाणूजन्य (नॅक्रॉसिस) रोगप्रतिबंध : इमिडाक्लोप्रिड (७० टक्के विद्राव्य) ५ ग्रॅम. 
वरील प्रकारे बीजप्रक्रिया केल्यानंतर ॲझोटोबॅक्टर व पीएसबी (स्फुरद विरघळवणारे जिवाणू) प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे. 

बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी : 
- प्रथमतः बुरशीनाशक/ कीटकनाशकांची बीजप्रक्रिया करून शेवटी जिवाणूखतांची बीजप्रक्रिया करावी. 
- बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवावे. 
- बुरशीनाशके/ कीटकनाशके जीवाणू खतात एकत्र मिसळू नयेत. 
- बीजप्रक्रिया केलेले बियाणे त्याच दिवशी पेरावे. 
- बीजप्रक्रिया करताना बियाणाची साल/ टरफल निघणार नाही याची काळजी घ्यावी. 

सूर्यफूल पिकाचे सुधारित व संकरित वाण ः 

आंतरपीक : रब्बी हंगामात आंतरपीक पद्धतीत भुईमूग + सूर्यफूल (६:२ किंवा ३ः१) या प्रमाणात पेरणी केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. 

रासायनिक खते ः 
कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत द्यावे. रासायनिक खतमात्रांत ५० : २५ : २५ किलो प्रतिहेक्टरी याप्रमाणात अनुक्रमे नत्र, स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळेस द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० : ३० : ३० किलो अनुक्रमे नत्र, स्फुरद, पालाश द्यावे. त्यापैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. नत्राची उर्वरित ३० किलो मात्रा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावी. गंधकाची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे. 

आंतरमशागत ः 
पेरणीनंतर १५-२० दिवसांनी दोन रोपांतील अंतर ३० सें.मी. ठेवून विरळणी करावी. त्यानंतर एक खुरपणी व दोन कोळपणीच्या पाळ्या द्याव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी. 

रासायनिक तणनियंत्रण : 
मजुरांची उपलब्धता नसल्यास रासायनिक तणनियंत्रण करावे. पेरणीनंतर, परंतु पीक व तणे उगवणीपूर्वी प्रति हेक्टरी पेंडीमिथॅलीन (३० टक्के ई.सी.) १ ते १.५ लिटर प्रति ६००-७०० लिटर पाणी याप्रमाणात जमिनीवर फवारणी करावी. 

पाणी व्यवस्थापन ः 
जमिनीच्या मगदुरानुसार १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पिकाच्या खालील संवेदनक्षम अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. 
- रोप अवस्था : १५-२० दिवसांनी. 
- फुलकळी अवस्था : १५-४० दिवसांनी. 
- फुलोऱ्याची अवस्था : ५०-६० दिवसांनी . 
- दाणे भरण्याची अवस्था : ७०-८० दिवसांनी 

एकच पाणी देणे शक्य असेल तर ते पीक कळीच्या अवस्थेत असताना द्यावे. दोन पाणी देणे शक्य असेल तर पहिले पाणी कळीचे अवस्थेत व दुसरे पाणी दाणे भरण्याचे अवस्थेत दिले असता, उत्पादनात घट न येता ते ५० ते ६० टक्के वाढते. 
रामभाऊ हरीभाऊ हंकारे, 
सहायक प्राध्यापक (कृषी विभाग) विभागीय विस्तार केंद्र, कृ.म.वि., पुणे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com