श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला

श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला

जळगाव - जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले आहेत. उत्तरेकडील श्रावणमास अंतिम टप्प्यात आहे. यातच पश्‍चिमेकडे (महाराष्ट्र, गुजरात) श्रावण मास सुरू झाल्याने मागणी वधारली आहे. ठाणे, कल्याण (लोकल) येथून दुय्यम दर्जाच्या व क्रेटमधील केळीला चांगली मागणी आहे. यामुळे केळीचे दर ९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत टिकून आहेत. ऑन व जाहीर दर मिळून १०५० रुपये प्रतिक्विंटलचे दर दर्जेदार केळीसंबंधी मिळाले. दुय्यम दर्जाच्या केळीलाही ७०० रुपये क्विंटलचे दर आहेत. 

चोपडा, जळगाव येथून केळीचा पुरवठा वाढला आहे. रावेरातील बड्या व्यापाऱ्यांनी चोपडा, जळगावातून मागील शनिवारी सुमारे २०० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन) काश्‍मीर, पंजाब येथे बॉक्‍समध्ये पॅकिंग करून पाठविली. जळगाव तालुक्‍यातील किनोद, गाढोदा, कठोरा, आमोदा बुद्रूक भागातून अर्ली कांदेबाग केळीची चांगली कापणी झाली. तर चोपडा तालुक्‍यातील विटनेर, खेडीभोकरी, गोरगावले बुद्रुक, अजंतीसीम, माचले, खरद भागातही कमी अधिक स्वरूपात अर्ली कांदेबाग केळीची कापणी झाली.

रावेर, यावल व मुक्ताईनगरातील पिलबाग केळीची कापणी जवळपास आटोपली आहे. रावेरातील केऱ्हाळे, कर्जोद, निंभोरा, चिनावल, रसलपूर भागात काही प्रमाणात पिलबाग केळी आहे. यावलमधील साकळी, वढोदा, किनगाव, सांगवी बुद्रुक, भालोद, न्हावी प्र. चा. यावल भागातही केळी उपलब्ध होत आहे. पिलबाग केळीलाही ७४० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाले. पंजाब, दिल्ली व काश्‍मिरात दर्जेदार केळीची मागणी असल्याने अशा केळीसाठी ऑनचे दर द्यावे लागले.  कांदेबाग केळीची आवक वाढली असली तरी कांदेबाग केळीचे स्वतंत्र दर रावेर बाजार समिती जाहीर करीत नसल्याने नवती केळीच्या दरातच कांदेबाग केळीची विक्री झाली. गत आठवड्यात जिल्ह्यातून प्रतिदिन ३०० ट्रक केळीची पाठवणूक उत्तरेसह ठाणे, कल्याण भागात झाली. जळगाव, पाचोरा येथून ठाणे, कल्याणकडे केळीची पाठवणूक झाली. 

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही मुक्ताईनगर, रावेरातील काही गावांमधून केळीची काहीशी आवक झाली. तेथेही ७०० ते १०५० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. तेथेही दरात घसरण झाली नाही.

गव्हाची बुंदेलखंडमधून आवक
जळगाव येथील बाजारात मध्य प्रदेशातील बुंदेलखंड भागातून (हरदा, सागर) गव्हाची आवक झाली. ही आवक दाणाबाजारातील घाऊक व्यापाऱ्यांकडेही झाली. तेथील मोठ्या व्यापाऱ्यांकडून गव्हाची मागणी येथील व्यापाऱ्यांनी करून घेतली. लोकवन प्रकारच्या गव्हाला २००० रुपयांपासून दर होते. बाजार समितीत प्रतिदिन १०० क्विंटल आवक राहिली. मध्यंतरी दोन दिवस आवक झाली नाही. इतर धान्याची मात्र फारशी आवक नव्हती. 

बटाटा, गवारला बऱ्यापैकी दर
बटाट्याचे दर स्थिर राहिले. प्रतिदिन ३०० क्विंटल आवक झाली. १००० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलचे दर बटाट्याला मिळाले. तर गवारलाही १६०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. चवळीला प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपयांपर्यंतचे दर राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com