जतमधील शेतकऱ्यांसाठी चिंच ठरणार आंबट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

झाडांना चिंचा कमी, उत्पादनात घट होणार 

सांगली - प्रतिकूल हवामान, कमी प्रमाणात झालेला पाऊस यामुळे जत तालुक्‍यातील देवस्थानासह शेतकऱ्यांच्या बांधावर असणाऱ्या चिंचेच्या झाडांना चिंचा कमी प्रमाणात लागल्या आहेत, त्यामुळे यंदा चिंचेच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे. 

झाडांना चिंचा कमी, उत्पादनात घट होणार 

सांगली - प्रतिकूल हवामान, कमी प्रमाणात झालेला पाऊस यामुळे जत तालुक्‍यातील देवस्थानासह शेतकऱ्यांच्या बांधावर असणाऱ्या चिंचेच्या झाडांना चिंचा कमी प्रमाणात लागल्या आहेत, त्यामुळे यंदा चिंचेच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे. 

जत तालुक्‍यात अनेक देवस्थानच्या शेतीजागेवर चिंचेची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. त्याचप्रमाणे तालुक्‍यातील शेतीच्या बांधावर, पाटालगत, ओढ्यालत निसर्गतः चिंचेची लागवड पाहायला मिळत आहे. शासनाकडून आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून चिंचेच्या लागवडीसाठी प्राधान्य दिले जाते. यामुळे देवस्थानच्या परिसरात चिंचेची लागवड फार पूर्वीपासून वाढली आणि वाढते आहे. त्यामुळे देवस्थानला चिंचेच्या विक्रीतूनच आर्थिक फायदा होऊन परिसर आणि इतर कामे करण्यासाठी याची मोठी मदत होते; परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे दर वर्षी उत्पादनात घट होते आहे. यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. याचा परिणाम शेतकरी आणि देवस्थानांवर होऊ लागला आहे. 

या वर्षी तालुक्‍यात जुलै महिन्यापासून सप्टेंबरअखेर पाऊस झाला नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरवली. कमी पावसामुळे हवामान पूर्णतः कोरडे होते. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण खूपच कमी होते. तामपानही जास्त होते. यामुळे जुलै महिन्यात चिंचेला फुलोरा आला नाही. काही प्रमाणात आलेला फुरोलाही प्रतिकूल हवामानामुळे गळून गेला. त्यामुळे झाडावर चिंचेचे प्रमाण खूपच कमी असल्याचे चित्र आहे, त्यामुळे यंदा चिंचेच्या उत्पादनात घट होणार आहे. 

दर वधारतील? 
जत तालुका पहिल्यापासूनच दुष्काळी तालुका आहे. या भागात निसर्गाच्या साथीने बांधावर, ओढ्यावर तसेच देवस्थानच्या शेतीत चिंचेची लागवड आहे. त्यामुळे इतर पिकांचे नुकसान झाले तरी चिंचेची विक्री केल्यानंतर शेतकऱ्याला चार पैसे मिळतात; परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ही परिस्थिती बदलू लागली आहे, त्यामुळे चिंचेच्या पिकांपासूनही आर्थिक फटका बसू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. उत्पादन कमी झाल्यास दर तरी वधारले पाहिजे, अशी अाशा शेतकरी करीत आहेत. 

Web Title: tamarind business farmers