तूरही घसरली...

Toor-Dal
Toor-Dal

-किमती गेल्या हमीभावाच्या खाली 
-उत्पादकांना १००० रुपयांपर्यंत फटका 


अकोला - गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच शेतीमालाचे दर घसरत आहेत. सोयाबीननंतर अाता तूर उत्पादकांपुढीलही अडचणी यामुळे वाढल्या अाहेत. हंगामात लागवड झालेली तूर जानेवारीत बाजारात विक्रीसाठी येताच बाजारातील दर ४००० पर्यंत खाली अाला अाहे. केंद्र शासनाने या हंगामासाठी ५०५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला अाहे. किमतीतील हा फरक लक्षात घेतल्यास तूर उत्पादकांना ५०० ते १००० रुपयांनी फटका बसत अाहे. 

मागील वर्षात तुरीला चांगला दर मिळाल्याने तुरीचे क्षेत्र सर्वत्र वाढले. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची लागवड झाली. मोसमात चांगला पाऊस; तसेच परतीचा पाऊसही जोरदार बरसल्याने तुरीच्या पिकाला मोठा फायदा झाला. यामुळे तुरीचे घसघशीत पीक येऊन सोयाबीन, मूग, उडदाने दिलेला तोटा भरून निघेल अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा होती; परंतु सध्या बाजार ज्या पद्धतीने घसरत अाहे ते पाहता तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा फोल ठरण्याचीच भीती अधिक वाढली अाहे. 
अकोला हे तुरीसाठी महत्त्वाचे केंद्र मानले जाते. महाराष्ट्रात जे बाजार प्रसिद्ध अाहेत, त्यात अकोला बाजारपेठ तुरीच्या खरेदी विक्रीसाठी महत्त्वाची समजली जाते. या बाजारपेठेत जून २०१६ या महिन्यापासून तुरीचे दर बघितले, तर किमान ४००० ते ४५०० रुपयांपर्यंत सरळसरळ घट दिसून येत अाहे. 

जून महिन्यात २५ तारखेला ८२०० ते ८९०० रुपये तुरीला दर मिळाला. २६ जुलैला ७५०० ते ८२०० दर होता. २६ सप्टेंबरला ५२०० ते ५९०० पर्यंत तूर विकली. २५ अाॅक्टोबरला तूर ६१०० ते ७२०० रुपये क्विंटलने विकली गेली. पुढे २५ नोव्हेंबरला तूर ५००० ते ५८५० पर्यंत विकल्या गेली. अाता या महिन्यात मंगळवारी (ता.२०) अकोला बाजारात तुरीचा दर ४००० ते ४४०० मिळाला. दरांचा हा अालेख सातत्याने खाली उतरता अाहे. अद्याप या मोसमातील तूर विक्रीला अालेली नाही. जानेवारीच्या दुसऱ्या अाठवड्यापासून तुरीची अावक सुरू होईल. त्या वेळी हा दर कुठपर्यंत टिकतो, याचीच चिंता अधिक अाहे. 

शासकीय खरेदी केंद्रांची मागणी 
या हंगामात मूग, उडीद, ज्वारी या तीनही धान्यांची काढणी सुरू झाल्यानंतर भाव घसरले. शेतकऱ्यांमधून अोरड झाल्यानंतर विलंबाने शासनाने निर्णय घेत खरेदी केंद्र सुरू केले. आता हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने अागामी तूर बाजारात येण्यापूर्वी शासकीय खरेदीची तयारी केली, तर भावावर नियंत्रण ठेवता येईल, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत अाहेत. अाता किमान तुरीच्या वेळेस तरी विलंब होऊ नये, यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com