अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्यांचे बीजोत्पादनात प्रावीण्य

datta-shetewad
datta-shetewad

नांदेड जिल्ह्यातील मौजे मांजरमवाडी हे आदिवासी बहुल गाव आहे. येथील दत्ता केरबा शेटेवाड यांची केवळ २० गुंठे म्हणजे अर्धा एकर शेती आहे. गेल्या सुमारे १२ वर्षांपासून ते कापसाचे बीजोत्पादन घेतात; परंतु या वर्षी त्यांनी प्रथमच कारल्याचे बीजोत्पादन घेतले. कारल्याचे १० गुंठे तर कापसाचे ५ गुंठे क्षेत्र यंदा बीजोत्पादनाखाली आहे. यातील कौशल्यामुळे व अपार मेहनतीमुळे त्यांच्या कुटुंबाचा गाडा सुरळीत चालू आहे. त्यांची जमीन अत्यंत खडकाळ, गावाजवळच्या उंच डोंगरावर आहे. दत्ता यांच्या आजोबांना गायरानातील ही जमीन पूर्वी मिळाली आहे. तेथे बैलगाडीही जात नाही. डोक्यावर वाहून नेऊनच मालाची वाहतूक करावी लागते.

बटईपासून सुरवात 
दत्ता यांच्या शेतात पूर्वी पाण्याची सोय नव्हती. पावसाच्या भरवशावरच खरिपातील पीक यायचे. मांजरमवाडीमध्ये १९८७ पासून कापूस बीजोत्पादन घेतले जाते. यासाठी पाण्याची व्यवस्था आवश्यक असते. दत्ता पूर्वी कापूस बीजोत्पादन बटईने करायचे. यातून वर्षाला ४० ते ५० हजार रुपये मिळायचे. बीजोत्पादनानंतर ते अन्य ठिकाणी मजुरीला जायचे. हाती थोडे फार पैसे जमा झाल्यानंतर २०१४ मध्ये स्वतःच्या शेतामध्ये ३०० फूट खोलीचे बोअर घेतले. त्यास पाणी लागले. त्यामुळे आपल्या शेतात त्यांना बीजोत्पादन घेता येऊ लागले. कापसाच्या बीजोत्पादनामध्ये हे जोडपे आता तरबेज झाले आहे. सुमारे १० गुंठ्यांत ३ ते पावणेचार- चार क्विंटलपर्यंत बीजोत्पादन ते घेतात. 

बीजोत्पादनातील बाबी 
बोअरला पाणी लागल्यामुळे १० गुंठ्यांत कमी खर्चाचे ठिबक बसवले आहे. त्यावर कारल्याचे बीजोत्पादन सुरू आहे. ५ फुटी बेट पाडून त्यावर मल्चिंग अंथरले आहे. २६५० रुपयांचे मल्चिंग संबंधित बीजोत्पादक कंपनीने पुरवले. त्याचे पैसे बीजोत्पादनातून कंपनी वळते करून घेईल. कारले लागवड १० जून २०१६ ला केली. कंपनीकडून १५० ग्रॅम मादी व ५० ग्रॅम नर बियाणे मिळाले. त्यातून मादी वाणाच्या १६ ओळी (३२० बुड) व नराच्या २ ओळी लावल्या. बियाणे लावल्यानंतर साधारणतः ५० दिवसांनी परागीभवनाचे काम सुरू होते. नंतर ते ३० ते ४० दिवस अविरत चालते. रोजच्या रोज डोळ्यांत तेल घालून हे काम अत्यंत कौशल्याने करावे लागते. 

फळाची काढणी 
परागसिंचन झाल्यानंतर साधारणतः २०-२५ दिवसांनी कारल्याचे फळ पिकते. पिकलेली फळे दररोज वेलीवरून काढून त्यातून बी अलग केले जाते. त्यानंतर बी स्वच्छ पाण्याने धुऊन सुती कपड्याने पुसून कोरडे केले जाते. यानंतर त्याला २ ते ३ दिवस ऊन दिले जाते. वाळलेले बी कलतानी पोत्यात भरून कंपनीला पाठवले जाते. 

कापूस बीजोत्पादन 
यंदा कारल्याचे बीजोत्पादन घेतल्यामुळे व बाहेरील मजूर वापरण्याची क्षमता नसल्यामुळे यंदा केवळ ५ गुंठ्यांत कापूस बीजोत्पादन घेतले. कापूस लावण ६ x ६ फुटांवर आहे. टोकण करताना एका जागी त्रिकोणामध्ये तीन बियांची टोकण केली आहे. या तीन रोपांना एक बुड समजले जाते. अशी त्यांच्याकडे १७९ बुड आहेत. सध्या बोंडे वेचण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. प्रति बुड साधारणतः १ किलो सरकीचे उत्पादन अपेक्षित आहे.

अपार मेहनती कुटुंब 
जेव्हा १० गुंठ्यांचा कापसाचा बीजोत्पादन प्लॉट घेतला जातो, तेव्हा परागीभवनाच्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये सतत ३-४ मजूर लागतात. सध्या १५ गुंठ्यांवरील दोन्ही पिकांतील बीजोत्पादनाचे काम शेटेवाड दांपत्यच पाहते. दिवस उजाडल्यापासून अंधार पडेपर्यंत हे कुटुंब शेतातच कार्यरत असते. वर्षांतील ४ महिने हे दांपत्य शेतातच मुक्कामाला असते. दगडावर दगड रचून चार पत्र्याची कामचलाऊ खोली शेतात बनवली आहे. त्यातच संसार चालतो. दिवसाचा एक क्षणही ते वाया घालवत नाहीत. एरवी एक मजूर दिवसाला साधारणतः १५०० कापसाच्या कळ्या सोलतो; परंतु दत्ता यांच्या पत्नी मनकर्णाबाई दिवसाला २००० कळ्या सोलतात. शेत जंगली परिसरात असल्यामुळे तेथे हरीण, माकड, डुकरे आदींचा पिकांना मोठा त्रास आहे, त्यामुळे शेतावरच राहणे ते पसंत करतात. 

उत्पादन 
कारल्याच्या १० गुंठ्यांपासून पहिल्या फ्लशचे जवळपास एक क्विंटल बियाणे उत्पादन मिळाले. ते संबंधित कंपनीस पाठवले आहे. एका फळातून साधारणतः ४ ते ५ ग्रॅम बियाणे मिळते. पहिल्या फ्लशची फळे आकाराने मोठी असतात. दुसऱ्या फ्लशची फळे आकाराने लहान असली तरी संख्या मात्र जास्त असते. अशा रितीने पहिला फ्लश १०० ते ११० दिवस व दुसरा फ्लश ९० ते १०० दिवसांत पूर्ण होतो. बियाण्यांची कंपनीकडून उगवण चाचणी व क्षेत्र चाचणी घेतल्यानंतर कंपनी पैसे देणार आहे. कारल्याच्या बियाण्याचा भाव प्रति किलो एक हजार रुपयांच्या दरम्यान तर कापसाच्या बियाण्याचा प्रति क्विंटल भाव ५५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. 
 :  दत्ता शेटेवाड - ७०६६८१६३४८
(लेखक नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

बीजोत्पादनावर अर्थव्यवस्था
मौजे मांजमरवाडी हे आदिवासी बहुल गाव आहे. गावात सुमारे ११० उंबरे आहेत. गावाची अर्थव्यवस्था बहुतांशी बीजोत्पादनावर अवलंबून आहे. गावात १९८७ पासून कापसाचे बीजोत्पादन घेतले जाते. बहुतेक जणांना एक एकरच्या खालीच जमीन आहे, त्यामुळे इथले शेतकरी बीजोत्पादनाकडे वळले. आता तेथे कारले, भेंडी, दुधी भोपळा अशा भाजीपाल्यांचे बीजोत्पादन सुरू झाले आहे. या शेतीत मजुरांची गरज जास्त असते; परंतु आर्थिक ऐपत नसल्याने येथील शेतकरी घरच्या घरी अपार मेहनत करून बीजोत्पादनातील श्रम करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com