तिहेरी पूरक व्यवसायांमधून शेतीचा साधला विस्तार

तिहेरी पूरक व्यवसायांमधून शेतीचा साधला विस्तार

दुर्गम भंडारा जिल्ह्यात विविध पिके घेण्यावर आणि पर्यायाने उत्पन्नावर मर्यादा येतात. मात्र सोनपुरी (साकोली) येथील कठाणे भावंडांनी शेतीला डेअरी, शेळीपालन व पोल्ट्री या तिघेही पूरक व्यवसायांची जोड दिली आहे. त्याद्वारे उत्पन्नाचे अधिक स्रोत निर्माण करीत आर्थिक उत्कर्ष साधला. धान उत्पादक जिल्ह्यात त्यांची ही प्रयोगशीलता शेतकऱ्यांसाठी निश्‍चीतच नवा आशावाद निर्माण करणारी आहे. 

सोनपूरी (ता. साकोली, जि. भंडारा) येथील जगन कठाणे यांची पूर्वी जेमतेम साडेतीन एकर शेती होती. आशिक (वय २८) व निताराम (वय २६) ही त्यांची मुले. गेल्या सात-आठ वर्षांपासून हीच भावंडे शेतीची बहुतांश जबाबदारी सांभाळत आहेत. एकतर अल्प क्षेत्र आणि भात (धान) हेच या भागातील मुख्य पीक. तेवढ्यावर संपूर्ण वर्षाची आर्थिक बेगमी होणार नव्हती.

उत्पन्नाचे वाढवले स्रोत 

शेतीला पूरक व्यवसायांची जोड देणे गरजेचे होते. सन २००६ मध्ये एका शेळीच्या माध्यमातून त्याची सुरवात करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संख्येत वाढ केली. आज सुमारे ५० शेळ्यांचे संगोपन केले जाते. त्यानंतर सन २००८ च्या सुमारास शेळी व्यवसायाद्वारे गाठीशी जुळलेल्या पैशांचा वापर करीत जर्सी गाईची व पुढे एचएफ गायीची खरेदी केली. या व्यवसायातही टप्प्याटप्प्याने वाढीचे उद्दिष्ट साधले. आज मोठ्या जर्सी गायींची संख्या दहावर पोचली आहे. जोडीला दोन मुऱ्हा म्हशी आहेत. डेअरीची जबाबदारी आशिक यांच्यावर असते. घरच्या जनावरांपासून सरासरी एकूण ५० लिटरपर्यंत दुधाचे संकलन होते. लिटरला २४ रुपयांप्रमाणे गावातील खासगी दूध कंपनीच्या संकलन केंद्रावर दुधाचा पुरवठा होतो. शेळीपालनातून वर्षाला सुमारे दोन लाख रुपयांचे सरासरी उत्पन्न मिळते.  

शेतीचे नियोजन 

धाकटे बंधू निताराम यांच्याकडे शेतीची व पोल्ट्रीची जबाबदारी असते. धान हे केवळ खरिपातच नव्हे, तर उन्हाळ्यातही पाण्याच्या उपलब्धतेनुसार घेतले जाते. सिंचनासाठी बोअरवेलचा पर्याय आहे. शेतालगत असलेल्या गावतलावातील पाण्याचाही उपयोग होतो. उन्हाळ्यात भाजीपाला पिकांसाठी या जलस्रोतांचा वापर होतो. पूरक व्यवसायातून आलेल्या उत्पन्नाच्या जोरावर कठाणे यांनी शेतीला शेती जोडली. त्यामुळे साडेतीन एकरांवरून शेतीक्षेत्र आज पाच एकरांवर पोचले. त्यासोबतच पाच एकर शेती साडेतीन हजार रुपये प्रति एकर प्रति वर्ष या दराने शेती करारावर केली जाते. उन्हाळ्यात भेंडी, कारली, चवळी असा भाजीपाला असतो. त्याचबरोबर हरभरा, गहू, जवस आदी पिकांचीही साथ असते. 

साकोली हे तालुक्याचे ठिकाण विक्रीसाठी महत्त्वाचे मार्केट आहे. भाजीपाल्यामुळे दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशांची सोय होते. हंगामात या पिकांतून सुमारे ४० ते ५० हजार रुपये उत्पन्न जमा होते. 

भाताचे एकरी २५ ते ३० क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळते. क्विंटलला १४७० रुपये दर यंदा मिळाला आहे. पुढील काळात सर्व पूरक व्यवसायांच्या जोडीला मत्स्य व्यवसाय सुरू करण्याचा मानस असल्याचे कठाणे यांनी सांगितले. उत्पन्न किंवा स्रोतांची फार उपलब्धता नसल्याचे कारण सांगत हातावर हात धरून बसणाऱ्यांसमोर त्यांनी एकात्मिक शेती पद्धतीतून आदर्श निर्माण केला आहे. 

चाऱ्याची उपलब्धता

दुधाळ जनावराच्या संगोपनात चारा हा घटक महत्त्वाचा ठरतो. हमखास पाऊसमानाचा प्रदेश असलेल्या या भागात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता मुबलक राहते. साहजिकच बरसीम किंवा अन्य चारा पिकेही घेतली जातात. काही प्रमाणात धानाचे तनीस चारा म्हणून दिले जाते. प्रति जनावरावर दररोज चाऱ्यापोटी ६० रुपयांचा सरासरी खर्च होतो. 

कुक्‍कुटपालनात भरारी

सन २०१४ मध्ये शेळीपालन, दुग्धोत्पादनाच्या जोडीला कठाणे बंधूंनी कुक्‍कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला ७०० पक्षी नागपूर येथील व्यावसायिकाकडून खरेदी केले. 

साधारण १०० ते १२५ रुपये प्रति किलो दराप्रमाणे जागेवरूनच विक्री होते. गोंदिया, नागपूर, आमगाव परिसरातील खरेदीदारांकडून कोंबड्यांना मागणी राहते, असे आशिक यांनी सांगितले. एक बॅच घेतल्यानंतर महिनाभर विश्रांती घेतली जाते. या कालावधीत जागेचे निर्जतुकीकरण केल्यानंतर दुसऱ्या बॅचची तयारी होते. आज सुमारे २५०० पक्षी संगोपनाची पोल्ट्रीची क्षमता आहे. सध्या सुमारे बाराशे पक्षी आहेत. या व्यवसायातून सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. 

पोल्ट्री शेडचा आकार १३० बाय २० फूट आहे. शेडचा विस्तार टप्प्याटप्प्याने पैशांच्या उपलब्धतेनुसार करण्यात आला. त्यामुळे कोणतेही कर्ज घेण्याची गरज भासली नाही. पोल्ट्रीखत तसेच जनावरांपासून मिळणाऱ्या शेणाचा वापर शेतीत केला जातो.  

: आशिक कठाणे- ९८२३२४५१०३  
: नीताराम कठाणे- ९७६५६६३१३६

  कठाणे भावंडाच्या शेतीची वैशिष्ट्ये 
     शेतीला कुक्‍कुटपालन, शेळीपालन व दुग्ध व्यवसायाची जोड.
     दहा दुधाळ गाई, दोन मुऱ्हा म्हशी.
     मांसल कोंबड्याचे संगोपन. मार्केट आहे खात्रीशीर
     पूरक व्यवसायातील उत्पन्नातून दीड एकर शेतीची खरेदी.
    पाच एकरांवर शेती करारावर
    धानासोबतच भेंडी, कारली, चवळीसारख्या भाजीपाला पिकावर भर.
    डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत साकोली कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार यांचे तांत्रिक मार्गदर्शन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com