जमिनीतील ओलाव्यानुसार करता येईल मोबाईलद्वारे सिंचनाचे व्यवस्थापन

संतोष मुंढे 
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

जमिनीतील पाण्याचे नेमके प्रमाण मोजून वातावरणातील तापमान व सापेक्ष आर्द्रता यांचा अंदाज घेत पिकांच्या सिंचनाचे व्यवस्थापन मोबाईल ॲपवरून करणारी प्रणाली औरंगाबाद येथील एमआयटीमधील कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केली आहे. यामुळे नियंत्रित शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करणे शक्य होणार आहे. 

शेतीमध्ये सिंचनासाठी स्वयंचलित यंत्रणा आली असली, तरी त्यासाठी जमिनीतील पाण्याचे प्रमाण, तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यांच्याकडे शेतकऱ्यांना सातत्याने लक्ष ठेवावे लागते. अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये अडचणी येतात. यावर मात करण्यासाठी औरंगाबादमधील एमआयटीच्या कृषी अभियांत्रिकी विभागाच्या माधुरी कांबळे, धनंजय वाटपाडे, सुवर्णमाला पगारे या विद्यार्थ्यांनी मोबाईलद्वारे सिंचनाच्या नियंत्रणाची प्रणाली विकसित केली आहे. यात स्मार्ट मोबाईलवर जमिनीतील ओलाव्याचे नेमके प्रमाण, शेडनेटमधील तापमान, सापेक्ष आर्द्रता यांची माहिती मेसेजद्वारे पुरविले जाते. त्याच प्रमाणे यात मोबाईलमधील ॲपद्वारे ठिबक, फॉगर यंत्रणा सुरू किंवा बंद करणे शक्य होते. 

सध्या या तंत्राच्या चाचण्या महाविद्यालयाच्या छतावरील चार गुंठ्यांच्या शेतीमध्ये घेण्यात येत आहेत. यामध्ये अँड्रॉइड मोबाईलसह कंट्रोलर, तापमान आणि ओलावा मोजणाऱ्या सेन्सरचा वापर केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर प्रणालीनिर्मितीसाठी सुमारे १२ हजार रुपयांचा खर्च आला. प्रणाली विषयी माहिती देताना विद्यार्थी धनंजय वाटपाडे व सुवर्णमाला पगारे यांनी सांगितले, की सध्या सापेक्ष आर्द्रता, तापमान, जमिनीतील ओलावा यांची माहिती मोबाईलवर उपलब्ध होत आहे. त्यानुसार सिंचनाचे नियंत्रण करता येते. याच ॲपममध्ये सिंचनासाठी आवश्यक वीज, पाणी यांच्या उपलब्धता कळण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
प्रणाली निर्मिती व चाचण्यादरम्यान प्रा. सुरेखा दाभाडे, प्राचार्य डॉ. संतोष भोसले, कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एच. पी. बोबडे, प्रा. डी. टी. बोरनारे, प्रा. व्ही. जी. जाधव यांचे मार्गदर्शन लाभल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. 

वापरलेली साधने 
- ट्रान्स्फॉर्मर - स्टेप डाउन २३० -१२ व्होल्ट 
- मायक्रोकंट्रोलर - यामध्ये सिंचन व्यवस्थानाचा संपूर्ण प्रोग्रॅम केलेला असतो. थोडक्यात, प्रणालीमध्ये हा मेंदूचे काम करतो 
- रिले - मोटारपंपाला ऑन ऑफ करण्यासाठी (३० ॲम्पिअरचा) 
- सोलेनाईड वॉल - हा दोन इंचाचा असून, विद्युत यांत्रिकी पद्धतीने चालतो. त्यासाठी वेगळा २३० व्होल्ट विद्युत पुरवठा व एक न्यूट्रल दिला आहे. 
- सेन्सर - मातीतील ओलावा, तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यांचे मापन करणारे सेन्सर. (प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी एक.) 
- जीएसएम मॉड्यूल - सर्किटमध्ये वापरलेल्या मॉड्यूलमध्ये जीएसएस सिम वापरले आहे. त्यामुळे सेन्सरद्वारे घेतलेल्या नोंदी मेसेजद्वारे मोबाईलवर पाठवले जातात. 
- अँड्रॉईड - ई क्‍लिप्स सॉफ्टवेअर वापरून जावा या संगणकीय भाषेमध्ये ॲप्लिकेशन तयार केले. तंत्रात वापरलेल्या मोबाईलची आवृत्ती ६.० मार्शमिलो आहे. सर्किटसाठी ‘सी लॅंग्वेज’ वापरली. 

या जलसिंचन प्रणालीचे फायदे - 
१) जमिनीतील ओलावा व वातावरणातील बदलाच्या नोंदी मोबाईलवर उपलब्ध होतात. 
२) सिंचन यंत्रणा मोबाईलद्वारे कोठूनही हाताळता येते. 
३) सूचनामध्ये स्पष्टता असल्याने निरक्षर किंवा कमी शिकलेला माणूसही थोड्याच प्रयत्नात सहजतेने हाताळू शकतो. 
४) मनुष्यबळ, पाणी यामध्ये बचत. 
५) स्वस्त प्रणाली. (प्रायोगिक तत्त्वावरील प्रणालीसाठी १२ हजार खर्च आला.) 

चार गुंठे क्षेत्रातील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. अधिक क्षेत्रावर चाचण्या घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अधिक क्षेत्रासाठी प्रणाली वापरल्यास तुलनेने खर्चात कपात होऊ शकते. विद्यार्थ्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्‍त आहे. 
- प्रा. सुरेखा दाभाडे 
(एमआयटी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद) 

अॅग्रो

कागदी लिंबाला माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे. त्यामुळे झाड आणि फळांची योग्य वाढ होते. ठिबक सिंचन केले असल्यास...

10.30 AM

पीक अवशेषांचा अधिकाधिक वापर व शेतीतील खर्च कमी करणारे तंत्रज्ञान ही दोन उद्दिष्टे ठेवून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध...

10.27 AM

आंब्याच्या तीस वाणांची विविधता  समाधान मानून व विचारपूर्वक केल्यास शेती समृद्धीचे साधन होऊ शकते हे बीड जिल्ह्यातील वांगी...

10.09 AM