अंजीरबागांना पाणीटंचाईचा फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

खेड शिवापूर, जि. पुणे  - पाणीटंचाई आणि उन्हाच्या चटक्‍यामुळे वेळू (ता. भोर) येथील अनेक अंजिराच्या बागा जळून गेल्या आहेत. अंजिराचा ऐन हंगाम सुरू असताना हे नुकसान झाल्याने येथील अंजीर उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

खेड शिवापूर, जि. पुणे  - पाणीटंचाई आणि उन्हाच्या चटक्‍यामुळे वेळू (ता. भोर) येथील अनेक अंजिराच्या बागा जळून गेल्या आहेत. अंजिराचा ऐन हंगाम सुरू असताना हे नुकसान झाल्याने येथील अंजीर उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

वेळू गावात मोठ्या प्रमाणावर अंजिराचे उत्पादन घेतले जाते. जवळपास घरटी अंजिराची झाडे असल्याने येथील शेतकऱ्यांची वर्षभराची आर्थिक गणिते अंजीर पिकाच्या उत्पन्नावर अवलंबून असतात; परंतु या वर्षी मात्र पाणीटंचाई आणि उन्हाचा वाढलेला कडाका याचा फटका येथील अंजिराच्या पिकाला बसला. अंजिराचा ऐन हंगाम सुरू असताना पाणीटंचाई निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर झाडांची फळे आणि पानगळती झाली. पाने गळाल्याने फळांवर उन्हाने चट्टे पडत आहेत. पाणी नसल्याने सुकवा फळांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अंजिराच्या बागा सोडून दिल्या आहेत. 

सध्या अंजिराचा महिनाभर हंगाम शिल्लक आहे. त्यामुळे अजूनही झाडांना मोठ्या प्रमाणात माल शिल्लक आहे. मात्र, ऊन आणि पाणीटंचाईमुळे अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. अनेक अंजीर उत्पादक शेतकऱ्यांचे भांडवल कसेबसे वसूल झाले आहे; तर अनेक शेतकऱ्यांचे भांडवलही वसूल झालेले नाही. अंजिराच्या झाडाला खते, फवारणी आदींसाठी झालेला खर्चही वसूल झालेला नाही. पाणीटंचाई आणि त्यात या वर्षी उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने अंजिराला फटका बसला आहे. या वर्षी सुमारे दोनशे अंजिराच्या झाडांचे पूर्ण उत्पन्न हातून गेल्याने पुढच्या हंगामासाठी भांडवलही उरले नसल्याचे निवृत्ती वाडकर यांनी सांगितले.