राज्यात कृषी हवामान संशोधन केंद्र उभारणार

Weather agricultural research center set up in the state
Weather agricultural research center set up in the state

कृषिमंत्री फुंडकर - पाच गावांसाठी एक माती परीक्षण प्रयोग शाळा

अकोला - बदलत्या हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना मिळावा या उद्देशाने राज्यातील शेतीच्या विकासासाठी कृषी हवामान संशोधन केंद्र स्थापन करणार असल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अाणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘ऍग्रोटेक २०१६’ या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. येत्या काळात प्रत्येक पाच गावांसाठी एक माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणार असून, यासाठी २८०० तपासणी मशिन खरेदी करणार असल्याचेही फुंडकरांनी सांगितले.

या उद्घाटन कार्यक्रमाला अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोदे, खासदार संजय धोत्रे, महापौर उज्वलाताई देशमुख, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, हैदराबाद येथील अटारी या संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे, डॉ. बथकल अादी उपस्थित होते.

श्री. फुंडकर म्हणाले, की गेली अनेक वर्षे ‍विदर्भात कृषी पंपाच्या दहा हजार वीज जोडण्या प्रलंबित होत्या. त्या जोडण्या पूर्ण केल्या. जलयुक्त शिवार अभियानातून २८ टीएमसी एवढे पाणी महाराष्ट्रात थांबविले. त्यामुळे हजारो हेक्टर जमिनीवरील पिकाला या संरक्षित सिंचनाचा लाभ झाला. विदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी विविध योजना शासन आखत असून खारपाण पट्ट्यासाठी चार हजार कोटी रुपयांच्या सुधारणा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर करार झाला आहे. येत्या तीन - चार वर्षांत खारपाण पट्टा सधन होईल, अशी ग्वाही कृषिमंत्र्यांनी या वेळी दिली.

डॉ. पाटील म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे असून, पहिल्यांदाच प्रधानमंत्री पीक विमा योजना या वर्षीपासून सरकारने सुरू केली, त्याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. सात-बारा दाखवून आता राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या सहा बॅरेजेसचे काम येत्या एक ते दोन वर्षांत पूर्ण होईल, त्यातून मोठ्या प्रमाणात सिंचन वाढेल. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावेल. या वेळी खासदार धोत्रे, डॉ. मायंदे, डॉ. प्रसाद यांनी या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कुलगुरू डॉ. दाणी यांनी कृषी विद्यापीठातील संशोधन,ऍग्रोटेक मागची भूमिका मांडली.

दीड वर्षात मोन्सॅन्टोला हद्दपार
माेन्सॅन्टो कंपनीसोबत केलेला करार, बीटी कापूस बियाण्याचे अपयश, वारंवार बदलणारी धोरणे याबाबत फुंडकरांनी टीका करीत येत्या दोन वर्षांत मोन्सॅन्टोची बीटी वापरणार नसल्याचे सांगितले. अाजवर या कंपनीने शेतकऱ्यांची लूट केल्याचे सांगत अाता केवळ ३५० रुपयांचे पाकिट ७५० ते ८०० ला विकल्याचे म्हटले. दीड वर्षात मोन्सॅन्टोला हद्दपार करणार असल्याची घोषणा केली.

विद्यापीठांतर्गत रिक्त पदे भरणार
राज्यातील चारही कृषी विद्यापीठामध्ये वर्षानुवर्षे पदभरती रखडलेली अाहे. पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्यांदा ही पदे भरण्याचे निर्देश दिले. अातापर्यंत काही पदे भरलीही गेली. प्रक्रिया सुरू झाली. रिक्तपदांमुळे संशोधन रखडले. त्यामुळे रिक्त असलेली चार हजार पदे लवकर भरणार असल्याचेही कृषिमंत्री म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com