‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची दिशा

महिला बचत गटांचा मेळावा.
महिला बचत गटांचा मेळावा.

औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था राज्यभरातील विविध गावांमध्ये जल-मृद संधारण, वाडी प्रकल्प आणि शेतकरी प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविते. संस्थेने ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांचे संघटन केले आहे. संस्थेने ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची सुरवात केली आहे.

शाश्वत ग्रामीण विकासाचे स्वप्न सत्त्यामध्ये उतरविण्यासाठी गेली पंचवीस वर्षे औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. मानसशास्त्र विषयाचे अध्यापन करणाऱ्या डॉ. अनघा पाटील या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा असून, ग्रामविकासाच्या अनेक प्रकल्पांमध्ये त्या सक्रीय आहेत. अभियंता असलेल्या श्रीमती वैशाली खाडिलकर संस्थेच्या उपाध्यक्ष असून, पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाचे नियोजन पाहतात. ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे हे संस्थेचे सचिव आहेत.

दिलासा संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त महिला असून, संस्थेच्या बहुतांश कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांच्या ११० तालुक्यांतील ५,५५८ खेड्यांपर्यंत संस्था विविध योजनांच्या माध्यमातून पोहाेचली आहे.मूल्यमापन आणि संनियंत्रणाचे काम करणाऱ्या मोजक्याच संस्थांपैकी दिलासा ही संस्था आहे. संस्था राज्य पातळीवर प्रकल्प संयोजन, मूल्यमापन आणि संनियंत्रणाचे काम करते. 

महिला बचत गटांचे संघटन 
ग्रामीण भागातील कष्टकरी महिला दिलासा संस्थेच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. गावातील महिलांना लघू उद्योगातून आर्थिक मिळकत होण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबविते. संस्थेने विविध गावांतील अडीच हजारांपेक्षा जास्त महिला बचत गटांचे संघटन केले. या बचत गटातील महिलांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या अर्थसाहाय्यातून महिलांनी कटलरी दुकान, साडी व्यवसाय, झेरॉक्स सेंटर, इत्यादी व्यवसाय सुरू केले आहेत. आज अनेक महिला या व्यवसायाद्वारे स्वावलंबी झाल्या आहेत.

महिला गटांनी तयार केलेले पापड, कुरडया, खारोड्या यांसारख्या पदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी संस्थेतर्फे प्रदर्शनांचे आयोजन. 

दुर्गम भागात महिलांच्यासाठी संस्थेतर्फे आरोग्य शिबिरांचे आयोजन. उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम, किशोरी विकास प्रकल्प, महिलांचे श्रम कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे ग्रामीण महिलांचे स्थान उंचावण्याचे प्रयत्न.

महिला बचत गटांचे कार्य आणि आर्थिक उलाढालीची ॲपद्वारे नोंद. 

शाडूच्या मूर्ती प्रशिक्षणाद्वारे पर्यावरण संरक्षण, कापडी पिशव्यांद्वारे प्लॅस्टिक हटाव जाणीव जागृती, सुधारित चुली, कृषी तंत्रज्ञान, यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन.

वाडी प्रकल्पातून समुद्धी
संस्था आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी वाडी प्रकल्प राबविते. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील बारा गावे तसेच अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात दहा गावांच्यामध्ये फळपिकांच्या लागवडीचा वाडी प्रकल्प राबविला जातो. संस्थेने शेतकऱ्यांच्या सहभागातून सुमारे दोन हजार फळझाडांच्या वाड्यांची निर्मिती केली आहे. फळबागेमुळे शेतकऱ्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले. 

विविध संस्थांना प्रशिक्षण
वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रमासाठी संसाधन संस्था म्हणून दिलासा संस्था कार्यरत आहे. यामध्ये पाणलोट क्षेत्र अंमलबजावणीचे कार्य करणाऱ्या गावस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्यांचे बळकटीकरण करण्याचे काम प्रशिक्षणाच्या माध्यमातून केले जाते. यशदा या राज्य पातळीवरील प्रशिक्षण संस्थेअंतर्गत  विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी संस्थेतर्फे केली जाते. 

विविध उपक्रमांना सहकार्य
सामाजिक दायित्व निधीअंतर्गत संस्था वैविध्यपूर्ण उपक्रम राबविते. यामध्ये पाणी साठवण टाक्यांची बांधणी, सिमेंट नाला बांध, जलस्राेतांचे बळकटीकरण, जुन्या जलस्राेतांचे नूतनीकरण, पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, दुष्काळपीडित गावांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरे, पशुधन आरोग्य शिबिरे, ग्रामपंचायतींचे बळकटीकरण, शाळांसाठी पायाभूत सोयी-सुविधांची उपलब्धता, किशोरी विकास कार्यक्रमांचा समावेश आहे. 

पुरस्कारांनी गौरव  
भूमिजल संवर्धन पुरस्कार, जलसंधारण पुरस्कार, वनश्री, सिंचन मित्र, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, युनेस्कोचा वॉटर डायजेस्ट पुरस्कार आदी राष्ट्रीय, राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान.
 रॉकफेलर ही अत्यंत प्रतिष्ठेची संशोधन स्कॉलरशिप मिळवणारी दिलासा ही एकमेव स्ववंसेवी संस्था.
 पारदर्शकता, सुशासन, काटेकोर प्रकल्प अंमलबजावणीसाठी आयआयसीए, क्रिसील, गाईडस्टार इंडिया मानांकने प्राप्त.

जल-मृद संधारणावर भर 
राज्यभरातील खेडेगावांच्यामध्ये पाणलोट क्षेत्र विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विकासासाठी संस्थेने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला. माथा ते पायथा या तत्त्वाच्या आधारे दुर्गम भागातील गावांमध्ये संस्थेच्या विविध उपक्रमातून पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले. विविध गावांमध्ये पाणलोट क्षेत्रासाठी दिलासा संस्था ही संसाधन संस्था म्हणून काम करते. विविध संस्थांच्या सहकार्यातून संस्थेने सुमारे सहा लाख हेक्टर क्षेत्रावर पाणलोट विकासासाठी विविध उपचार पद्धतींचा अवलंब केला आहे.

कृषी तंत्रज्ञान प्रसार 
परिणामकारक कृषी विकासातूनच शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकते, या विचारातून संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन मोठ्या प्रमाणावर केले. दरवर्षी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यामध्ये नवे तंत्रज्ञान पोहोचविले जाते.  

औरंगाबाद जिल्ह्यातील तीस गावांमध्ये सुमारे दोन हजार शेतकऱ्यांपर्यंत ठिबक सिंचनाचे तंत्र पोहोचविण्यात संस्थेला यश. हे शेतकरी आता कापूस आणि फळबागांमध्ये ठिबक सिंचनाचा वापर करतात. नवीन तंत्रज्ञानाचा पीक उत्पादनवाढीसाठी अवलंब.

संस्थेने पर्यावरणस्नेही पद्धतीने कापूस लागवडीसाठी सात हजार शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना प्रशिक्षित केले. यामुळे कीडनाशकांच्या फवारणी खर्चात बचत झाली. योग्य वेळी कीड नियंत्रण, शिफारशीनुसार खत वापरावर भर. यामुळे पीक उत्पादनात वाढ.

संस्थेने राज्यातील अकरा जिल्ह्यांत १७५ शेतकरी कंपन्यांची स्थापना केली आहे. या कंपन्यांच्या माध्यामातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळाली, आर्थिक उत्पन्नवाढीसाठी मदत झाली. या कंपन्यांमुळे गावांमध्ये तूर, सोयाबीन प्रतवारी, खत विक्री अशा विविध उद्योगांच्या उभारणीला सुरवात. 

तीन वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नाकर बॅंकेच्या सहयोगाने संस्थेतर्फे दीडशे गावांमध्ये चार हजार शेतकऱ्यांपर्यंत भात पीक उत्पादनवाढीसाठी ‘एसआरआय` पद्धतीचा प्रसार. यामुळे भात उत्पादनामध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा दुपटीने वाढ. खत, पाणी आणि वेळेची बचत. तांदळाच्या गुणवत्तेत सुधारणा. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात ४० टक्के बचत.

गेल्या वर्षीपासून औरंगाबाद जिल्ह्याच्या पाच गावांतील शंभर शेतकऱ्यांनी संस्थेच्या सहकार्याने पाषाण भेद, कवच बीज, अश्वगंधा या औषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com