बारमाही पीकपद्धतीच्या नियोजनातून आर्थिक घडी केली सक्षम

बारमाही पीकपद्धतीच्या नियोजनातून आर्थिक घडी केली सक्षम

यवतमाळ जिल्ह्यात वटफळी (ता. नेर) येथील सचिन देशमुख यांच्याकडे बारा एकर वडिलोपार्जीत शेती आहे. आपल्या भागातील हवामान त्याचबरोबर बाजारपेठा, कोणत्या हंगामात काय दर मिळतील यांचा सर्वंकष अभ्यास त्यांनी केला. त्यातून स्वतःची अशी पीकपद्धती त्यांनी विकसित केली आहे. मुख्य म्हणजे वर्षातील तीनही हंगामात त्यांना त्यापासून उत्पन्न मिळत असते.

व्यावसायिक शेतीचा आदर्श 
देशमुख खरिपात सोयाबीन घेतात. साधारण ऑक्‍टोंबरच्या अखेरीपर्यंत सोयाबीनची काढणी होते. रोटाव्हेटरच्या माध्यमातून मशागत करून त्यानंतर कांदा लावला जातो. हा कांदा एप्रिलमध्ये निघून जातो. त्यानंततर पंधरा एप्रिलच्या दरम्यान काकडी लागवड केली जाते. साधारण जूनपर्यंत हे पीक चालते. त्यानंतर पुन्हा सोयाबीनचा क्रमांक लागतो. वर्षभर ही पीकसाखळी अशी सुरू राहते. 

पीक पद्धतीतील ठळक बाबी  
देशमुख मुख्य बाजारपेठेसोबतच भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी अनौपचारिक चर्चा करतात. यातून बाजारपेठ व पिकांचा काय कल आहे ते समजते. 

पीकपद्धती  
सोयाबीनचे एकरी साडेसात क्विंटलपर्यंत तर कांद्याचे १०० ते ११० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. एका एकरातून काकडीचे सरासरी ६० ते ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. दर किलोला १० ते १५ रुपये असाच राहतो. मात्र काही वेळा चढ्या दरांचाही म्हणजे किलोला ४० रुपयांच्या वरही दरांचा चांगला अनुभव त्यांनी घेतला आहे. यंदा जून-जुलै महिन्यात किलोला ४० रुपये दर त्यांनी मिळवला. काकडीचे दर दहा रुपयांपर्यंत खाली घसरले तरी हे पीक फायदेशीर ठरते. कारण काकडी वजनदार असल्याने किलोत माल कमी बसतो असे नफ्याचे गणीत देशमुख मांडतात.  

पांढरा आणि लाल कांदा  
रब्बीत एका एकरात पांढरा व लाल असे दोन्ही प्रकारचे कांदे घेण्यावर भर राहतो. कांद्याच्या एकरी उत्पादकतेवर बियाणे दरातील चढउतार हा घटक मोठा प्रभाव करणारा ठरतो. या वर्षी कांदा बियाणे २०० रुपये प्रति किलो असताना देखील त्याला मागणी नव्हती. त्याच्या आदल्या वर्षी २४०० रुपये असा दर असताना देखील बियाणे मिळणे दुरापास्त झाले होते. अशा प्रकारची स्थिती उद्‍भवत असल्याने कांद्यावरील एकरी खर्चाचा ठोस अंदाज काढता येत नाही. तरी सरासरीचा विचार करता लागवड ते काढणीपर्यंत किमान २० ते २५ हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. यंदा २८०० रुपये प्रति क्‍विंटल मिळाला. नेर (यवतमाळ) बाजारपेठेत कांदा विकला जातो.  

लिंबू बागेचा आदर्श 
हुशारीने बसवलेल्या पीक पद्धतीतून वर्षाला सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळते. या व्यतिरिक्त नियमित उत्पन्न मिळावे म्हणून पाच एकरावर कागदी लिंबाचे पीक निवडले आहे. आता लिंबाची बाग सुमारे १६ ते १७ वर्षांची झाली आहे. कृषी विभागाच्या योजनेतून त्यास शंभर टक्‍के अनुदान मिळाले. खरं तर देशमुख यांच्याकडे अनेक वर्षांपूर्वीची संत्रा लागवड होती. साधारण वीस वर्षे झाडे चांगली राहिली. त्यानंतर मात्र अपेक्षीत उत्पादकता मिळेनाशी झाली. त्यामुळे पर्यायी पिकाकडे वळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लिंबू हे पीक नजरेसमोर आले. या पिकाला पक्षी व जनावरांचा त्रासही होत नाही. या पिकाचे किमान तीन बहार तरी ते घेतात. बारमाही लिंबूला मागणी राहते ही बाब त्यांनी हेरली. 

लिंबांचे किफायतशीर पीक  
लागवडीनंतर सुमारे सात वर्षांनी लिंबू मिळण्यास सुरवात झाली. संत्र्याप्रमाणेच या पिकाच्या व्यवस्थापनावर भर दिला. जून महिन्यात मशागत करुन  मृग बहार घेतला जातो. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये लिंबू सुरू होतात. हस्त बहार व आंबिया बहारही बाजारपेठेतील मागणीनुसार घेतला जातो. 
मे अखेर ते जून अखेरपर्यंत या मधल्या काळातील रोहिणी नक्षत्रात फुटणारा रोहीणी बहारही घेण्याचा प्रयत्न असतो. याची फळे सप्टेंबर महिन्यात मिळतात. परंतु त्याची उत्पादकता कमी असल्याने हा बहार घेण्यावर शेतकऱ्यांचा भर कमी राहतो. सद्यस्थितीत या बहारातील लिंबूला ४० ते ४५ रुपये प्रति किलोचा कमाल दर मिळत आहे. एकरती सरासरी शंभर झाडांपासून ४५० ते ५०० पोती (२० किलोचे  पोते) याप्रमाणे उत्पादन मिळते. 

लिंबाला मार्केट  
नियमित उत्पन्नासाठी देशमुख यांनी नेरचे मार्केट पसंत केले आहे. तेथे हंगामात दररोज दोन हजार ते अडीच हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. दररोज बाराशे ते तेराशे लिंबे मार्केटला नेली जातात.  

बागेचे क्षेत्र जास्त असल्याने व्यापारी, मध्यस्थ थेट बागेतही येऊ लागले. त्यांच्या माध्यमातून जबलपूर (मध्यप्रदेश) येथे लिंबूची मोठी बाजारपेठ असल्याचे त्यांना कळाले. तेथील व्यापाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळविले. जबलपूर व दिल्ली या दोन्ही बाजारपेठांचा अभ्यास त्यांनी केला आहे.

जबलपूर व दिल्ली मार्केट  
जबलपूरला १५ किलोच्या कट्ट्याद्वारे माल पाठवला जातो. तर दिल्ली मार्केटला २० किलोच्या कट्ट्यातून खरेदी होते. आजच्या घडीला आर्थिक व्यवहार सुलभ झाले आहेत. व्यापारी शेतकऱ्याच्या खात्यात किंवा शेतकऱ्याची मागणी असल्यास रोखही पैसे देतात. साधारण ३५ रुपये प्रति कट्टा याप्रमाणे जबलपूरला लिंबू नेण्याचा खर्च होतो. अमरावती येथून खासगी ट्रॅव्हल्स दुपारी दोन वाजता सुटते. दुसऱ्या दिवशी पहाटे ती जबलपूरला पोचते. त्या माध्यमातून लिंबांची वाहतूक होते. दिल्ली मार्केटमध्ये लिंबू पाठवायचा तर दिल्लीवरून बटाटा अमरावतीत येतो. त्यामुळे दिल्लीस परत जाताना वाहतुकदाराशी चर्चा करून लिंबे पाठवली जातात. कट्ट्याला सरासरी ५०० रूपये रूपये दर मिळतो. अर्थात तो सतत बदलतही राहतो. या पिकातून वर्षाला सुमारे १२ ते १३ लाख रूपयांचे उत्पन्न हाती पडते.  

सचिन देशमुख,  ९४२३४२५६५४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com