राहुरी : पोलिस उपनिरीक्षकावर वार

राहुरीत चार गुन्हेगार जेरबंद; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त
 पोलिस उपनिरीक्षकावर वार
पोलिस उपनिरीक्षकावर वारsakal

राहुरी : शहरात सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीला पकडताना थरारनाट्य घडले. पाठलाग करणारे पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील यांच्यावर सत्तूरचा वार झाला. पाचपैकी सराईत चार गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एक जण फरार झाला. दरोड्याच्या साहित्यासह एक लाख ८३ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. हा प्रकार आज (शनिवारी) पहाटे घडला.

शहरातील मल्हारवाडी रस्त्यावर सातपीर बाबा दर्ग्याजवळ चोरट्यांची टोळी आल्याची खबर राहुरी पोलिस ठाण्यात मिळाली. रात्रीच्या गस्ती पथकातील पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील, पोलिस कॉन्स्टेबल नदीम शेख, महेश शेळके, जालिंदर साखरे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच दरोडेखोर पळू लागले. त्यांचा पाठलाग करून मयूर राजू ढगे (वय २१), ईश्वर अशोक मोरे (वय २०, दोघेही रा. निफाड, नाशिक) यांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, झटापटीत आरोपी ढगे याने पोलिस उपनिरीक्षक बोकील यांच्या डाव्या हातावर सत्तूरचा वार करून त्यांना जखमी केले. तीन आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. राहुरी फॅक्टरी येथे तिसरा आरोपी राहुल रमेश वाकोडे (रा. निफाड) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी रणजित केशव कांबळे (रा. निफाड) याला शिर्डी ताब्यात घेण्यात आले. राहुरीत पकडलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी अजय पवार गावठी पिस्तुलासह फरार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा करीत आहेत.

सुरक्षारक्षकास मारहाण

या टोळीने मध्यरात्री दीड वाजता मल्हारवाडी रस्त्यावरील खासगी सुरक्षारक्षक प्रवीण अर्जुन धनवडे (रा. बारागाव नांदूर) यांच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून जबर मारहाण केली. त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून घराच्या बाहेरील खुर्चीला दोरीने बांधून ठेवले. प्रमोद रत्नाकर भागवत (रा. मल्हारवाडी रस्ता, राहुरी) यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून ४२ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरली.

सराईत गुन्हेगार

पोलिस उपनिरीक्षकावर सत्तूरने हल्ला करणारा आरोपी ढगे याच्यावर नाशिक जिल्ह्यातील निफाड, घोटी, अंबड, भद्रकाली पोलिस ठाण्यांत दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com