अकोला : 'बीएसएनएल' ची संपत्ती बेवारस

अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा; लाखोंच्या संपत्तीची ऐसीतैसी
Akola BSNL telephone pole
Akola BSNL telephone polesakal

मंगरुळपीर : मोबाईल येण्याअगोदर लोकांच्या घरात टेलिफोन कार्यरत होते, परंतु मोबाईलने जसजसे आपले जाळे पसरून ग्राहकांना आकर्षित केले तसतसे ग्राहक टेलिफोन पासून दुरावले. परिणामी ग्राहकांच्या सुविधेकरिता जागोजागी उभारण्यात आलेले टेलिफोन खांब आता बेवारस स्तिथीत उभे असून याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे. तर केंद्र सरकारच्या मालमत्तेचे तीन तीनतेरा वाजत आहे. याबाबत येथील बीएसएनएल च्या जवाबदार अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांचेकडून बेजवाबदारीचे उत्तर दिल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे.

जुन्या काळात नातेवाईकांसह इतरही कामामध्ये संपर्क साधण्यासाठी पोस्ट कार्यालयाअंतर्गत पत्रव्यवहार होत असे आणि खूपच महत्त्वाच्या कामाकरिता तार संदेशवहनाचा उपयोग होत होता, या करिता दररोज पोस्टमॅनची वाट जणू देवा सारखी नागरिक त्याकाळी पाहत होते. परंतु काळ बदलत गेला आणि विज्ञानाच्या सहाय्याने माणसाने दिवसेंदिवस प्रगतीपथावर आपले पाऊले टाकले. त्यानंतर थेट संवाद करण्यासाठी टेलिफोनचे उपकरण आले.

परंतु काही व्यापारी, राजकारणी व गर्भ श्रीमंत वगळता टेलिफोन सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होता. त्यांनतर जवळपास १९९६-९७ मध्ये केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने एसटीडीची सुविधा कमी दरामध्ये सुरू केल्याने जो-तो ग्राहक या सेवेकडे आकर्षित झाला आणि शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा टेलिफोनच्या ग्राहकांची संख्या वाढली. बीएसएनएल ला अच्छे दिन आले.

ग्राहकांच्या संख्येत वाढ बघता बीएसएनएल ने ग्राहकांना त्यांच्या निवासस्थानापर्यंत सेवा देण्याकरिता गल्लोगल्ली बीएसएनएल चे खांब उभारले. मंगरुळपीर शहर व ग्रामीण भागात हजारो बीएसएनएल चे खांब आजही उभे आहेत. परत काळ बदलला मग मोबाईल आला. यामध्ये बीएसएनएल सह खाजगी कंपन्या बाजारात उतरल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली.

२००५ मध्ये तत्कालीन दूरसंचार मंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांनी इन्कमिंग सेवा निशुल्क केल्याने ग्राहकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आणि सर्वसामान्य ग्राहकांपासून तर अगदी गोरगरीब ग्राहकांना आकर्षित करण्यात बीएसएनएल सह सर्व खाजगी कंपन्यामध्ये चढाओढ सुरू झाली.जवळपास सर्वांकडे मोबाईल आहेत. त्यामुळे ग्राहकांनी टेलिफोनकडे पाठ फिरविली असून बोटावर मोजण्या इतपतच ग्राहक उरले आहे. त्यामुळे बीएसएनएल ने शहरी भागासह ग्रामीणभागात उभे केलेले खांब आज रोजी जैसे थे स्थितीत उभे असून अनेक खांब चोरट्यांनी काढून नेले आहेत.

सध्या अस्तित्वात असलेले खांबही काही लोकांनी खाजगी वापरात घेतले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. याबाबत येथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उद्धट व बेजबाबदारपणाचे उत्तर दिले. त्यांच्या वागण्या व बोलण्यावरून त्यांना त्यांच्या विभागाच्या मालमत्तेची अजिबात चिंता नसल्याचे दिसून येत आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com