वसीम चौधरी प्रकरणावरून खडाजंगी!

प्रशासन-नेते आमने-सामने; पालकमंत्र्यांनी दिले खुलासा सादर करण्याचे आदेश
Akola Collectore office
Akola Collectore officeSakal

अकोला - अल्पवयिन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्यामुळे सध्या वादात सापडलेले चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांच्या कोचिंग क्लास संदर्भात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रशासनाने झुकते माप दिल्यामुळे सदर विषय सोमवारी (ता. ६) आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेत चांगलाच गाजला. याविषयी प्रशासनाच्या भूमिकेवर आमदार नितीन देशमुख, आमदार रणधीर सावरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या विषयावर जिल्हाधिकारी यांनी स्पष्टीकरण न दिल्याने सभेत आमदार नितीन देशमुख व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यात खडाजंगी झाली. शेवटी पालकमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणी प्रशासनाने खुलासा सादर करावा, असे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी (ता. ६) दुपारी नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू होते. त्यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतीभा भोजने, आ. नितीन देशमुख, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल, आ. डॉ. रणजित पाटील, आ. गोवर्धन शर्मा, शिक्षक आमदार सरनाईक, जिल्हा नियोजन समितीच्या पदसिद्ध सचिव तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीष शास्त्री यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. सभेत जिल्ह्यातील विकास कामांसह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित आमदार व नियोजन समितीच्या सदस्यांनी समस्या उपस्थित केल्यामुळे त्यावर चर्चा करण्यात आली. सभेत पालकमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींद्वारे उपस्थित प्रश्न व समस्या सोडवण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

निलंबित ग्रामसेवकांच्या मुद्द्यावर आमदार आक्रमक

डीपीसीच्या सभेत आमदार नितीन देशमुख यांनी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा ईगो दुखावल्यामुळे दोन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बोटे यांनी नियमानुसार कारवाई झाल्याचे सांगितले. परंतु रितसर बीडीओंकडून प्रस्ताव न येताच प्रशासनाने कारवाई केल्यामुळे ग्रामसेवकांवर एकतरफा कारवाई करण्यात आल्याचे आमदार म्हणाले. सीईओ कटियार यांनी ग्रामसेवकांचे विविध योजनेतील कामांचे स्टेटस शून्य असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. परंतु सदर उत्तर समाधानकारक नसल्याचे म्हणत पालकमंत्री बच्चू कडू यांनी ग्रामसेवक निलंबनाचे प्रस्ताव त्यांच्याकडे सादर करण्याचे सांगितले.

इतर मुद्द्यांवरही वादळी चर्चा

आमदार डॉ. रणजीत पाटील यांनी सर्वोपचार रुग्‍णालयातील ऑक्सिजन प्लांटची मॉक ड्रील घेण्याची, लेडी हार्डींगमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे १५० कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमधील घोळ, १०८ रुग्णवाहिकेचा ढेपाळलेला कारभार, जिल्हा परिषदेच्या शाळांची वीज बिल थकबाकी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यावर आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत १२ जून रोजी आयोजित बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.

आमदार अमोल मिटकरी यांनी पिककर्जासाठी शेतकऱ्यांकडून बॅंका नो-ड्यूज प्रमाणपत्रांची मागणी करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यासोबत बियाणे-खतांची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी गठित पथकाची कामगिरी, जनावरांच्या चाऱ्याचा मुद्दा व मॉन्सून पूर्व कामांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. आमदार भारसाकळे यांनी पाणी टंचाईचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुर न केल्याच्या मुद्द्यासह अकोट-तेल्हारा तालुक्यातील अपूर्ण पाणंद रस्त्यांच्या मुद्द्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले.

जिल्हाधिकारी म्हणाल्या माझी चौकशी करा...

वसीम चौधरी कोचिंग क्लासचा संचालक वसीम चौधरी याने अल्पवयिन विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे पडसाद सोमवारी (ता. ६) आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत सुद्धा पाहायला मिळाले. वसीम चौधरीच्या खासगी कोचिंग क्लासमध्ये सूपर ७५ कार्यक्रमाअंतर्गत प्रशासनाने विद्यार्थ्यांना प्रवेशाचे आवाहन केले होते.

सदर आवाहन प्रशासनाने मागे घ्यावे अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांनी केली. त्यावर आमदार नितीन देशमुख, आमदार रणधीर सावरकर यांनी सुद्धा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. यावर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी बोलण्यास सुरुवात करताच सभेत आमदार देशमुख व जिल्हाधिकारी यांच्यात खडाजंगी झाली. जिल्हाधिकारी अरोरा यांनी या प्रकरणी माझी चौकशी करा, असे म्हटले. सदर प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी केली. शेवटी पालकमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणी प्रशासनाने खुलासा सादर करावा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com