सतत फोन वापरल्याने मुलांवर होतील असे परिणाम

नमिता धुरी

मुंबई : सोफ्यावर बसून व्हिडिओ गेम खेळणारी किशोरवयीन किंवा त्यापेक्षाही लहान वयाची मुले घराघरांत दिसतात. पालकही ऑफीसच्या कामात व्यग्र असल्याने त्यांनाही मुलांच्या कटकट नको असते. अशावेळी व्हिडिओ गेम खेळणारी मुलं पालकांसाठी सोयीची ठरतात. त्यामुळे पालक मुलांना अशा गोष्टींपासून परावृत्त करत नाहीत. तसेच मुलांना फोनमधलं आपल्यापेक्षा जास्त कळतं याचंही पालकांना कौतुक असतं; मात्र सतत मोबाईल वापरण्याचे परिणाम काय असतात याबाबतही पालकांनी जागरूक असणं आवश्यक आहे.

google

मुले अबोल बनतात

सतत फोन वापरण्याच्या सवयीमुळे मुलांचा वास्तव जगाशी संपर्क तुटतो. भोवतालच्या माणसांमध्ये मुले मिसळेनाशी होतात. त्यामुळे संवाद साधण्याची त्यांची इच्छाशक्ती कमी होते व मुले अबोल बनतात.

google

रागीटपणा

सततच्या फोन वापरामुळे मुलांच्या वर्तणुकीत झालेला विचित्र बदल पालकांच्या फार उशिरा लक्षात येतो. अशावेळी ती मुलांना फोन न वापरण्याविषयी दटावतात. इतके दिवस लाड करणारे पालक अचानक रागवू लागले की मुलांची चिडचिड होते. तसेच फोनवर हिंसक गोष्टी पाहूनही मुलांमध्ये हिंसक वृत्ती वाढीस लागते.

google

निद्रानाश

फोन वापरामुळे डोळे कोरडे पडतात. तसेच निद्रानाशाची समस्या जाणवते. त्यामुळे मुलांचं दैनंदिन कामांचं वेळापत्रक बिघडतं.

google

अभ्यासावर परिणाम

सतत होणारी चिडचिड, भंग झालेली एकाग्रता, उडालेली झोप यांचा परिणाम मुलांच्या अभ्यासावरही होतो. अभ्यास करण्याची इच्छा उडते. केलेला अभ्यास लक्षात राहात नाही. परिणामी परीक्षेतील गुण कमी होतात.

google

आहारावर परिणाम

एकूणच जीवनशैली बिघडल्याचा परिणाम मुलांच्या आहारावर होतो. जेवतानाही फोन वापरण्याची सवय असल्याने जेवण्याचे भान राहात नाही. जेवण कमी झाल्यामुळे शारीरिकदृष्ट्या मुले कमकुवत बनतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

google