‘काँग्निजंट’ सहा हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार?

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

कंपनीचा तंत्रज्ञानावरील खर्च वाढला असून ऑटोमेशनमुळे मनुष्यबळाची आवश्यकतादेखील कमी झाली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारातील तफावत हेदेखील यामागचे एक प्रमुख कारण आहे

बंगळुरू: आयटी क्षेत्रातील 'काँग्निजंट' कंपनीतील सहा हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला जाण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कर्मचाऱ्यांना या नोकरी गमवावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही कर्मचारी कपात कंपनीच्या एकूण मनुष्यबळाच्या 2.3 टक्के इतकी आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या आयटी क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. तसेच नवीन डिजिटल सर्व्हिसेसमुळे कंपन्यांना आधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो आहे. यामुळे कंपनीचा तंत्रज्ञानावरील खर्च वाढला असून ऑटोमेशनमुळे मनुष्यबळाची आवश्यकतादेखील कमी झाली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारातील तफावत हेदेखील यामागचे एक प्रमुख कारण आहे.

गेल्यावर्षी काँग्निजंटने 1 टक्का कर्मचारी कपात केली होती. तर त्याआधीच्या वर्षी 1 ते 2 टक्के लोकांना कामावरुन कमी करण्यात आले होते. प्रत्येक कंपनीमध्ये कामाचे वार्षिक मूल्यांकन केले जात असते. त्यावेळी, कार्य व्यवस्थित न केलेल्या
कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाते. ही प्रक्रिया दरवर्षी अंमलात आणली जाते. यंदा मात्र काँग्निजंट अधिक लोकांना कामावरुन कमी करण्याची शक्यता वाढली आहे.

31 डिसेंबर 2016 च्या प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, काँग्निजंटमध्ये जगभरात 2 लाख 60 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी 1 लाख 88 हजार म्हणजेच एकूण मनुष्यबळाच्या 72 टक्के कर्मचारी भारतात काम करतात.