पैसा झाला छोटा; 'बिटकॉइन' झाला मोठा 

Marathi News_India warns on Bitcoin_Investors_Alert
Marathi News_India warns on Bitcoin_Investors_Alert

'वॉन्नाक्राय' या 'रॅन्समवेअर'मुळे काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेला बिटकॉइन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण बिटकॉइनने 16 हजार दोनशे अमेरिकी डॉलरची उच्चांकी पातळी गाठत आंतरराष्ट्रीय बाजारात धुमाकूळ घातला आहे. रुपयात एका बिटकॉइनची किंमत सांगितल्यानंतर तुम्ही देखील बिटकॉइनकडे आकर्षित व्हाल. कारण सध्या एका बिटकॉइनची किंमत आहे 10 लाख 22 हजार रुपये. बिटकॉइनमध्ये इतक्‍या मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत की, त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने नागरिकांना बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात पुन्हा एकदा धोक्‍याचा इशारा दिला आहे. बिटकॉइन हे इंटरनेटवर वापरले जाणारे एक आभासी चलन आहे. हे चलन कुणी निर्माण केलं, का आणि कशासाठी निर्माण केलं, असे प्रश्‍न सर्वसामान्यांना पडतात. भरपूर पैसा मिळवून देणारे गुंतवणुकीचे साधन म्हणून याकडे बरेच जण आकर्षित होण्याची शक्‍यता असली तरी त्यातले धोके समजावून घ्यायला हवेत. 

बिटकॉइन हे पहिले अनियंत्रित, आभासी आणि अंकात्मक चलन आहे. जे संपूर्ण जगासाठी खुले आहे. कोणत्याही देशातील नागरिक ते त्या देशाच्या चलनाच्या साहाय्याने खरेदी करू शकतो. म्हणजेच हे चलन संपूर्ण जगभरात ज्या-त्या देशांच्या अधिकृत मान्य असलेल्या चलनामध्ये रूपांतरित करता येते. सध्या सारं जग बिटकॉइनचा जनक म्हणून साकोशी नाकातोमीला ओळखतात. मात्र हे व्यक्तिमत्त्व अजूनही जगासमोर आलेले नाही. 2009 मध्ये अस्तित्वात असलेल्या पहिल्या बिटकॉइनच्या निर्मितीपासून ते आजवरचा प्रवास बघण्यासारखा आहे. सात वर्षांपूर्वी 8 रुपयाला एक असा मिळणारा बिटकॉइन आता लाखोंच्या घरात पोचला आहे. बिटकॉइनमधील गुंतवणूक म्हणजे एक प्रकारचा सट्टाबाजारच आहे. जे वास्तवात दिसत नाही, मात्र त्याचे मूल्य सतत वाढते आहे. बिटकॉइनचे 'बार्टर'प्रणाली प्रमाणेच कार्य आहे. म्हणजे यातून होणाऱ्या मूल्यनिर्मितीवर कर भरावा लागत नाही. कर भरावा न लागणं हे सर्वांनाच आवडतं. हेच कारण बिटकॉइनला संपूर्ण जगाला प्रेमात पाडण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. मुळात एका डॉलरला किंवा रुपयाला अमुक इतके बिटकॉइन हे या चलनाचं मूल्य अधोरेखित करणारी व्यवस्था कोण? सारंच गूढ आहे. बिटकॉइनची किंमत कोण नियंत्रित करतं? तर माहिती नाही. मग याचे मूल्य ठरते तरी कसे? एका उदाहरणाने बघूया. आपण बातमी वाचतो की, पोलिसांनी 10 कोटींची ड्रग्स पकडली. मात्र ती बाजारात विकून आपल्याला बाजारातून पैसे मिळतात का? तर नाही. तसेच बिटकॉइनचे गणित आहे. त्याचे मूल्य संभाव्यतेवर ठरते. 

जगात मर्यादित म्हणजे 2.1 कोटी बिटकॉइन उपलब्ध असून सध्या 1.67 कोटी बिटकॉइन प्रणालीमध्ये खरेदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रणालीमध्ये दर 10 मिनिटाला 12.5 बिटकॉइन येतात. प्रणालीमध्ये बिटकॉइन येण्याच्या या पद्धतीला 'मायनिंग' म्हटले जाते. तर व्यवहार करणारांना 'मायनर्स' म्हणतात. बऱ्याचा देशांनी देखील बिटकॉइनला अधिकृत मान्यता दिली आहे. मुख्यत: जपानने अधिकृत मान्यता दिल्यानंतर बिटकॉइनच्या मूल्यात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट, एक्‍सपीडिआ आणि यांसारख्या काही मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देखील बिटकॉइन्सच्या माध्यमातून व्यवहार सुरू केले असून ग्राहकांकडून बिटकॉइन स्वीकारले जातात. गेल्या एक-दोन वर्षांत बिटकॉइनची लोकप्रियता प्रचंड वाढलेली असून जगभरातील अनेक वेगवेगळी संकेतस्थळे, काही विमान कंपन्या बिटकॉइन घेऊन ग्राहकांना सेवा पुरवतात. 

आपल्याला बिटकॉइन खरेदी करता येतात का?तर याचं उत्तर 'हो' आहे. मात्र भारताच्या रिझर्व्ह बॅंकेने बिटकॉइन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता दिलेली नाही. हे व्यवहार करण्यासाठी कोणतेही नियामक, पूर्वपरवानगी, नोंदणी अथवा प्रमाणीकरण नाही. अशा प्रसंगी अशा आभासी चलनातील व्यवहार हे धोकादायक ठरू शकतात. सध्या जगभरात बिटकॉइनच्या खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन एक्‍स्चेंज उघडण्यात आली आहेत. तेथे मागणी आणि पुरवठा या तत्त्वावर बिटकॉइनची किंमत ठरते. आता या सर्वातून एक वेगळीच अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामध्ये मोठ्या लोकांचे हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे एखाद्या देशाने बिटकॉइन बंद करायचं ठरविलं तरी शक्‍य होणार नाही. भारत सरकारच्या बिटकॉइन संदर्भातील एका समितीने देखील बिटकॉइनवर बंदी घालता येणार नसल्याचे सांगितले आहे. कारण ते शक्‍य नाही आणि बंद केल्यास काहींना मोठा फटका बसणार आहे. जगभरातील लोक विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून हजारो संगणकांवर ही प्रक्रिया करत आहते. त्यामुळे ही प्रक्रिया फक्त थांबेल ती केवळ त्या संगणकीय किचकट प्रोग्राममध्ये मांडलेल्या आज्ञेनुसार. हा प्रोग्राम ओपन सोर्स असला तरी, कोणालाही त्यामध्ये काडीचाही बदल करण्याचा अधिकार नाही, कारण असा बदल हा नेटवर्कमधील सर्व संगणकांकडून स्वीकारला जाणे गरजेचे आहे. मायनर्सचा विस्तार पाहता ते सोपे नाही. त्यामुळे हे चलन आभासी असले तरी वास्तवातील त्याचे अस्तित्व हे अपरिहार्यच राहणार आहे. 

बिटकॉइनमधील गुंतवणूक किती सुरक्षित? 

बिटकॉइनचा प्रोग्राम पारदर्शी आहे, त्याद्वारे फसवणूक होण्याचा संभव नाही, असा बिटकॉइन संबंधितांकडून दावा केला जातो. असे असले तरी आज जगातील कोणत्याही बिटकॉइन्सधारकाची प्रचलित व्यवस्थेतील अधिकृत ओळख पटवून देणारी सोय या यंत्रणेत नाही. लॉगइन आणि अत्यंत किचकट पण गुप्त अशा पासवर्डच्या आधारे बिटकॉइनचे सारे व्यवहार चालतात. त्यामुळे नेमकी कोणती व्यक्ती बिटकॉइन होल्डर आहे हे कळणे अवघड आहे. बिटकॉइन होल्डर हा जगाच्या पाठीवरून कोठूनही व्यवहार करीत असला तरी त्याचा 'आयपी ऍड्रेस' सोडला तर इतर कोणतीच माहिती कोणालाही उपलब्ध होत नाही. 

सध्या भारतात देखील बिटकॉइनची लोकप्रियता वाढते आहे. भारतात स्व-घोषित काही गुंतवणूक तज्ज्ञांकडून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात फुकटचा सल्ला दिला जातो आहे. मात्र त्याला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही. मात्र एक समांतर चलन म्हणून बिटकॉइनला भारतात पसंती मिळत असल्याने रिझर्व्ह बॅंकेच्या चिंतेत भर घातली आहे. वाढती लोकप्रियता पाहता, भारत सरकारने बिटकॉइनला मान्यता द्यावी अथवा नाही याबाबत एक समिती नेमली आहे. शिवाय रिझर्व्ह बॅंकही आभासी चलन आणण्याचा विचार करत आहे. तसेच गेल्या महिन्यात बिटकॉइनला मान्यता द्यावी किंवा नाही, याबाबत जनतेकडून अभिप्राय मागविले होते. यावरून या बिटकॉइनची घोडदौड लक्षात येईल. आज भारतात हजारो बिटकॉइनधारक आहेत. मात्र त्यांच्याकडे असलेल्या बिटकॉइनचे प्रमाण जगात वितरित झालेल्या बिटकॉइनच्या तुलनेत केवळ एक टक्का इतके आहे. भारतात यूनोकॉइन, झेबपे, कॉ÷नसिक्‍युअर, बीटीएक्‍स इंडिया यांसारख्या सुमारे वीस कंपन्या बिटकॉइन खरेदी-विक्री व्यवहारांत गुंतलेल्या आहेत. 

आरबीआयने बिटकॉइनला बेकायदेशीर म्हटलेलं नसले तरी, जेव्हा यामध्ये व्यवहार अथवा गुंतवणूक केली जाते तेव्हा ते प्रमाणित नसतील हे सांगून सावधगिरी बाळगायला सांगितली आहे. बिटकॉइनचा सध्या फुगा झालेला आहे. फुगा हवा भरलेला असताना वर जात असताना आपल्याला आनंद होतो. मात्र हा फुगा कधी फुटेल, कसा फुटेल हे मात्र आताच सांगता येणार नाही. बिटकॉइनची घौडदोड सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे सध्यातरी 'पैसा झाला छोटा; बिटकॉइन' झाला मोठा' म्हणण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com