नोटा बदलून देण्याची जबाबदारी सर्व बॅंकांची

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

पुणे - खराब, फाटक्‍या नोटा बदलून देण्याची जबाबदारी सर्वच बॅंकांची आहे. त्यामुळे जवळच्या शाखांनी आपली जबाबदारी चोख पार पाडल्यास कोणत्याही बॅंकेवर ताण येणार नाही, असे सांगत अधिकाऱ्यांना ग्राहकांची अडवणूक न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असल्याची माहिती पुणे स्टेशन भारतीय स्टेट बॅंकेचे सहायक व्यवस्थापक उमाशंकर कोल्हे यांनी दिली. 

प्रत्येक वेळी सर्व ग्राहकांना संतुष्ट करता येणे शक्‍य होत नाही; पण जर संबंधित बॅंकांनी आपल्या ग्राहकांची सेवापूर्ती केल्यास अशा अडचणी टाळता येतील, असेही कोल्हे यांनी नमूद केले. विशेषत: जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न कोणत्याही बॅंकांनी करता कामा नये. मग ती भारतीय स्टेट बॅंकेची शाखा असेल, अथवा इतर कोणत्याही बॅंकेची. प्रत्येक बॅंकेने ग्राहकांना आश्‍वस्त करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

या वेळी रोकड विभागाचे उपव्यवस्थापक हर्षवर्धन संगवे यांनीही ग्राहकांना सुविधा पुरविण्यात बॅंकेकडून कोणतीही कसूर केली जात नसल्याचे सांगितले. मात्र, कामाचा ताण पाहता यावर आम्हालाही काही मर्यादा येत असतात; पण ग्राहकांना शक्‍य त्या सर्व सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न असतो, असेही संगवे यांनी नमूद केले.

रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार सर्वच बॅंकांना खराब अगर फाटक्‍या नोटा बदलून देण्याचे अधिकार आहेत. मात्र, काही जण जबाबदारी झटकत असतात. याचा फटका अर्थातच ग्राहकांना बसत असतो. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी सर्वच बॅंकांनी घ्यावी. कोणत्याही बॅंकेवर कामाचा तणाव येणार नाही, यासाठी सहयोगी बॅंकांनी सहकार्य करावे.
- उमाशंकर कोल्हे, सहायक व्यवस्थापक, भारतीय स्टेट बॅंक, पुणे मुख्य शाखा.