बारामतीतील सर्व ग्रामपंचायती 3 महिन्यांत BSNL ब्रॉडबँडने जोडणार

मिलिंद संगई
बुधवार, 19 जुलै 2017

ग्रामीण भागातील कामकाजाचा वेग वाढणार
बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती बीएसएनएलच्या ब्रॉडबँड सेवेने परस्परांशी जोडल्यानंतर पंचायत समिती स्तरावर कामकाजाचा वेग वाढेल, अशी अपेक्षा आहे. अनेक प्रकारचा पत्रव्यवहार थेट ई मेलद्वारे करण्यासोबतच इतरही सेवा ग्रामस्थांना सहजतेने उपलब्ध होऊ शकतील. कामकाजात सुसूत्रता येण्यासोबतच कामाच्या वेगावरही त्याचा चांगला परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

बारामती : येत्या तीन महिन्यात बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती बीएसएनलच्या ब्रॉडबँड सेवेने जोडण्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती बीएसएनलचे महाप्रबंधक एस.एम. भांताब्रे यांनी दिली. आज बारामतीशी संबंधित काही महत्वाच्या विषयांवर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तालुक्यातील 99 ग्रामपंचायती या योजनेत परस्परांशी जोडल्या जाणार आहेत. 

बारामतीनजिक केंद्र शासनाने उभारलेल्या अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये इंटरनेट सेवेसह इतरही काही बाबींचे प्रश्न प्रलंबित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेवरुन भातांब्रे यांनी आज या संस्थेला भेट देत पुढील तीन महिन्यात सर्व अडचणी दूर करण्याची ग्वाही दिली. 
दरम्यान बारामती शहरातील इंटरनेट कनेक्टिव्हीटी देखील अधिक प्रभावी व्हावी या साठी शहरातील टॉवरची संख्या वाढविली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आज त्यांच्या समवेत मोबाईल सेवेचे काम पाहणारे वरिष्ठ अधिकारी एस. दिनकर हेही होते. बारामतीतील टॉवरची  संख्या वाढविण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश त्यांना भातांब्रे यांनी दिले. 

केंद्र सरकारच्या ग्रामपंचायत परस्परांशी जोडण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती येत्या तीन महिन्यात परस्परांशी इंटरनेटद्वारे जोडल्या जातील, त्यासाठीची ऑप्टीकल फायबर केबल टाकून झाली असून काही तांत्रिक बाबी पूर्ण करुन हे काम आम्ही तीन महिन्यात मार्गी लावू असे त्यांनी सांगितले. शहरात ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटीमध्ये काही अडचणी आहेत, त्या देखील लवकर सोडविण्याचा प्रयत्न करु असेही ते म्हणाले. 
दरम्यान या बैठकीसाठी सुप्रिया सुळे यांचे समन्वयक प्रवीण शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, स्वीय सहायक नितिन सातव, बारामतीचे बीएसएनएलचे अभियंता एस.डी. मोरे आदी उपस्थित होते. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :