“एमआरपी’पेक्षा अधिक दराने बाटलीबंद पाण्याची विक्री

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

सरकारकडे 5 हजार 700 तक्रारी दाखल

सरकारकडे 5 हजार 700 तक्रारी दाखल

नवी दिल्ली : बाटलीबंद पाण्याची कमाल किरकोळ किमतीपेक्षा (एमआरपी) अधिक दराने विक्री होत असल्याच्या 5 हजार 700 तक्रारी आल्या आहेत. याबाबत राज्यांना पत्रे पाठवूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही, अशी माहिती केंद्रीय ग्राहक कामकाजमंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी दिली.
राज्यसभेत बोलताना पासवान म्हणाले, ""सरकार नवे ग्राहक संरक्षण विधेयक लवकरच आणत आहे. ते मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल आणि त्यानंतर संसदेत मांडण्यात येईल. बाटलीबंद पाण्याची "एमआरपी'पेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याच्या 5 हजार 698 तक्रारी आल्या आहेत. या प्रकरणी राज्यांना कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यांना याबाबत पत्रे पाठविण्यात आली असून, त्यांचे उत्तर अद्याप आलेले नाही.''
बाटलीबंद पाण्याची विक्री "एमआरपी'पेक्षा अधिक दराने होत असल्याची बाब अनेक सदस्यांनी आज उपस्थित केली. मॉल आणि विमानतळांवर हे प्रकार घडत असल्याचे सदस्यांनी लक्षात आणून दिले. यावर पासवान म्हटले, की ही ग्राहकांची फसवणूक असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाविरोधातही (बीसीसीआय) अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. मंडळाला या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.