अमेरिकेच्या धोरणामुळे अॅल्युमिनियमच्या किंमतीत 50 टक्क्यांनी वाढ?

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

अमेरिकेने रशियन कंपन्यांच्या बाबतीत बदलेल्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर अॅल्युमिनियमच्या किंमतीत 50 टक्कयांनी वाढीची शक्यता आहे.

मुंबई : अमेरिकेने रशियन कंपन्यांच्या बाबतीत बदलेल्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर अॅल्युमिनियमच्या किंमतीत 50 टक्कयांनी वाढीची शक्यता आहे. अमेरिकेने रशियाच्या रुसाल या अॅल्युमिनियम उत्पादक कंपनीवर निर्बंध आणले आहेत.

रुसाल जगात दुसऱ्या क्रमांकावर
रशियाची युनायटेड कंपनी रुसाल ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची अॅल्युमिनियम उत्पादक कंपनी आहे. अॅल्युमिनियमच्या किंमती 2,000 ते 2,200 डॉलर्स प्रतिमेट्रिक टन इतक्या आहेत. जर रुसालवरचे अमेरिकेचे निर्बंध सुरूच राहिले तर अॅल्युमिनियमच्या किंमती 2,500 ते 3,000 डॉलर्स प्रतिमेट्रिक टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा भारताला मात्र प्रचंड फायदा होईल, असे मत वेदांता लिमिटेड या कंपनीचे अनिल अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे. वेदांता लिमिटेड ही वेगवेगळ्या धातूंच्या उत्पादनात कार्यरत असणारी भारतातली आघाडीची कंपनी आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अग्रवाल यांनी याबाबतची ही माहिती दिली. 

अमेरिका-रशिया वाद 
लंडनच्या शेअर बाजारातसुद्धा अॅल्युमिनियमच्या किंमतींमध्ये 8 टक्कयांची वाढ नोंदवण्यात आली. रशियाने क्रिमिया, युक्रेन आणि सिरियात केलेल्या हस्तक्षेपामुळे अमेरिका नाराज झाली आहे. या देशांमध्ये रशियाचा प्रभाव वाढू नये यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. अमेरिकेने रशियाच्या 12 कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. यात रुसाल या अॅल्युमिनियम उत्पादक कंपनीचाही समावेश आहे. रुसाल जगातल्या 13 टक्के अॅल्युमिनियमचे उत्पादन करते. अॅल्युमिनियमचे उत्पादनात चीनच्या कंपनीखालोखाल रुसालचा वाटा महत्वाचा आहे. यामुळेच जगभरात अॅल्युमिनियमच्या किंमती प्रचंड वाढ अपेक्षित आहे. 

भारतीय कंपन्यांना उत्तम संधी
भारत 15 लाख टन अॅल्युमिनियमची आयात करतो. वेदांताचा भारतातल्या अॅल्युमिनियमच्या उत्पादनातला वाटा 60-65 टक्के आहे. भारतात धातूंच्या खनिजांचा मोठा साठा आहे. जागतिक बाजारपेठेत भारताला त्याचा मोठा फायदा करून घेता येईल. भारतातल्या धातू उत्पादक कंपन्यांना भविष्यात उत्तम संधी आहे, असे निरिक्षण वेदांता लिमिटेडचे अनिल अग्रवाल यांनी नोंदविले केले आहे.

Web Title: Aluminium Prices To Jump 50% After U.S. Sanctions On Rusal