भारताच्या परकी गंगाजळीच्या दोन तृतीयांश रोकड "ऍपल'कडे 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

मायक्रोसॉफ्ट, गुगललाही टाकले मागे 

नवी दिल्ली : तंत्रज्ञान उत्पादनांच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या "ऍपल' कंपनीकडे विक्रीयोग्य सुरक्षिततेसह तब्बल 256 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी रोकड असल्याची माहिती समोर आली आहे. रोकड क्षमतेच्या बाबतीत जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलसह मायक्रोसॉफ्ट आणि ऍमेझॉनसारख्या कंपन्यांनाही ऍपलने मागे टाकले आहे. विशेष म्हणजे ऍपलकडे असणारी रोकड ही भारतीय परकी गंगाजळीच्या दोनतृतीयांश अर्थात 66 टक्के असल्याचे आकडेवारी सांगते. 

गेल्या काही महिन्यांमध्ये विक्रीत घट झाल्याने ऍपलला नुकसान सहन करावे लागले होते. कंपनीच्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पहिल्या तिमाहीत आयपॅड, आयफोनच्या विक्रीत घट झाली आहे. कंपनीने या वर्षी 50.76 दशलक्ष आयफोनची विक्री केली. मात्र, ती गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्का कमी आहे. मात्र, "ऍपल'ची कमाई आणि महसूल आधीपेक्षा अधिक आहे. 

दरम्यान, सद्यःस्थितीत ऍपलला अनेक उत्पादनांतून चांगले उत्पन्न मिळत आहे. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ऍपल टीव्ही, ऍपल वॉच, एअरपॉड्‌स आदी उत्पादनांच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात 31 टक्‍क्‍यांची वाढ झालेली आहे. ऍपल केअर, ऍप स्टोअर आदी सुविधांमध्ये 18 टक्‍क्‍यांची वृद्धी झाल्याचे दिसून येते. 

"गीकवायर' या संशोधन संस्थेने ऍपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ऍमेझॉन या सध्याच्या आघाडीच्या चारही कंपन्यांचा चालू वर्षाच्या तिमाहीतील महसूल, नफा, शिलकी रक्कम याबाबत तुलनात्मक आढावा घेतला आहे. रोकडच्या बाबतीत "ऍपल' कंपनी 256 अब्ज अमेरिकन डॉलर रोकडसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्टकडे 126 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी रोकड आहे. गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेटकडे 92 अब्ज अमेरिकन डॉलर, तर ऍमेझॉनकडे 22 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी रोकड आहे. 

फेसबुकनेही नुकतेच पहिल्या तिमाहीतील उत्पन्न जाहीर केले. फेसबुककडे 29.45 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी रोकड असल्याची माहिती देण्यात आली आहे.