नोटाबंदीची कल्पना चांगली नव्हती - राजन

पीटीआय
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

न्यूयॉर्क - नोटाबंदी ही चांगली कल्पना नव्हती आणि तिची अंमलबजावणी योग्य नियोजनाविना करण्यात आली, अशी टीका रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी गुरुवारी केली. 

न्यूयॉर्क - नोटाबंदी ही चांगली कल्पना नव्हती आणि तिची अंमलबजावणी योग्य नियोजनाविना करण्यात आली, अशी टीका रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी गुरुवारी केली. 

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातून पाचशे व एक हजारच्या नोटा रद्द केल्या होत्या. या नोटांचे प्रमाण एकूण चलनात त्या वेळी ८७.५ टक्के होते. 
याविषयी केंब्रिजमधील हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये बोलताना राजन म्हणाले, नोटाबंदीबाबत रिझर्व्ह बॅंकेशी सल्लामसलत करण्यात आली नाही, असे मी कधीचे म्हटले नव्हते. सरकारने आमच्याशी सल्लामसलत केल्यानंतर ही चांगली कल्पना नसल्याचे सांगण्यात आले होते. नोटाबंदीची कल्पना प्रथम मांडण्यात आल्यानंतर यातील तोटे मी सरकारसमोर मांडले होते. नोटाबंदीही नियोजन अणि पुरेपूर विचार न करता करण्यात आली होती. 

वितरणातील चलनापैकी ८७.५ टक्के चलन रद्द करण्यात येणार असल्याने तेवढ्याच चलनाची छपाई करून ते वितरणात आणण्यासाठी तयार असायला हवे होते. भारताने मात्र, कोणत्याही तयारीशिवाय हे धाडस केले. यामुळे याचा नकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. रद्द चलनापैकी जवळपास सर्व चलन परत आल्याने या मोहिमेतून काहीच साध्य झाले नाही, असे त्यांनी 
नमूद केले.

नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार गमवावे लागले असतील. हे कामगार असंघटित क्षेत्रातील असल्याने त्यांची नोंद कोठेही घेण्यात आली नाही. नोटाबंदीमुळे विकासदर १.५ ते २ टक्के कमी झाला असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 
- रघुराम राजन, माजी गव्हर्नर, रिझर्व्ह बॅंक

Web Title: arthavishwa news currency ban raghuram rajan