नव्या ‘आयपीओं’मध्ये उत्तम परताव्याची अपेक्षा

नव्या ‘आयपीओं’मध्ये उत्तम परताव्याची अपेक्षा

कपॅसीट इन्फ्राप्रोजेक्‍ट्‌सची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) १५ सप्टेंबरपर्यंत, तर आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सची प्राथमिक समभाग विक्री १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान होत आहे. या दोन्ही आयपीओंमध्ये गुंतवणुकीची चांगली संधी असून, त्यातून उत्तम परताव्याची अपेक्षा करता येऊ शकते. यापैकी कपॅसीट इन्फ्राप्रोजेक्‍ट्‌सच्या आयपीओला पहिल्या दोन दिवसात मोठा प्रतिसाद मिळाला असून, तो पूर्णतः ‘सबस्क्राईब’ झाला आहे.

कपॅसीट इन्फ्राप्रोजेक्‍ट्‌स
कपॅसीट इन्फ्राप्रोजेक्‍ट्‌सचा आयपीओ आजचाच दिवस खुला आहे. या शेअरची नोंदणी २५ सप्टेंबरच्या आसपास होण्याची शक्‍यता आहे. इश्‍यूसाठीचा किंमतपट्टा रु. २४५ ते २५० असा आहे. ६० व त्याच्या पटीतील शेअरसाठी छोटे गुंतवणूकदार अर्ज करू शकतील. ईपीसी (इंजिनिअरिंग, प्रोक्‍युरमेंट, कन्स्ट्रक्‍शन) क्षेत्रातील ही कंपनी असून, अगदी अलीकडेच पाच वर्षांपूर्वीच कंपनीने या व्यवसायात पदार्पण केले आहे. अति उंच इमारतींचे बांधकाम यावर कंपनीचा मुख्य भर आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील खूप मोठी नावे, जसे की कल्पतरू, लोढा, ओबेराय कन्स्ट्रक्‍शन, वधवा ग्रुप, गोदरेज प्रॉपर्टीज हे कंपनीचे ग्राहक आहे. २०१७ च्या उत्पन्नाच्या चौपट म्हणजे ४६०० कोटींच्या ऑर्डर आता कंपनीच्या हातात आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये कंपनीच्या उत्पन्नात दरवर्षी लक्षणीय ७६ टक्के (सीएजीआर) वाढ झाली.

२०१७ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ईपीएस रु. १४ होते. रु. २५० इतकी इश्‍यूची किंमत गृहीत धरता, २०१७ च्या ईपीएसनुसार पीई रेशो १८ इतका येतो. मुंबई आणि इतर महानगरांमधील उच्चभ्रू परिसरात असणारी उपस्थिती, हुशार, प्रवर्तक, नावाजलेले प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूकदार, उत्तम आर्थिक स्थिती, छोट्या कालावधीत केलेली लक्षणीय प्रगती हे घटक लक्षात घेता कंपनीचे भवितव्य निश्‍चितच आशादायी दिसत आहे.

याबरोबरच इश्‍यूसाठीचा किंमतपट्टा देखील आकर्षक असल्यामुळे शेअरची नोंदणी दणक्‍यात होऊ शकते; तसेच दीर्घ कालावधीसाठी देखील उत्तम फायदा मिळू शकेल, असे वाटते.

आयसीआयसीआय लोम्बार्ड
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सचा पब्लिक इश्‍यू १५ सप्टेंबरला खुला होऊन १९ सप्टेंबरपर्यंत प्राथमिक बाजारात उपलब्ध होत आहे. इश्‍युसाठीचा किंमतपट्टा रु. ६५१ ते ६६१ असा आहे. २२ व त्याच्या पटीतील शेअरसाठी छोटे गुंतवणूकदार अर्ज करू शकतील. २७ सप्टेंबरदरम्यान शेअरची नोंदणी होईल. कंपनी नॉन-लाईफ इन्शुरन्स व्यवसायातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी आहे.

आयसीआयसीआय बॅंक व फेयरफॅक्‍स यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीची स्थापना झाली. मागील पाच वर्षांमध्ये कंपनीच्या उत्पन्नात २५ टक्के (सीएजीआर), तर नफ्यात ६५ टक्के (सीएजीआर) इतकी प्रचंड वाढ झाली आहे. भारतातील नॉन-लाइफ इन्शुरन्सचा व्यवसाय २००१-२००७ च्या दरम्यान १७.४ टक्के सीएजीआर दराने वाढला आहे. ‘क्रिसील’च्या मते आगामी पाच वर्षांत एकूण व्यवसायत १७-२२ टक्के प्रतिवर्षी वाढू शकतो. वाढते शहरीकरण व समृद्धी, लोकसंख्या, जोखमीसंदर्भात वाढत असलेली सजगता बघता सर्वसाधारण विमा क्षेत्रासाठी भविष्य उत्तम असणार आहे.

३१ मार्च २०१८ रोजी संपणाऱ्या वर्षाचे अंदाजे ईपीएस बघता आणि रु. ६६१ ही किंमत गृहीत धरता, पीई रेशो ३५ येतो. त्यामुळे कंपनीने दिलेली ऑफर नक्कीच स्वस्त नाही; परंतु आज बाजारामध्ये ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’शी तुलना होतील, अशा नोंदणीकृत कंपन्या नाहीत. तसेच आयसीआयसीआय हे मोठे नाव कंपनीच्या मागे आहे. शेअर बाजारातदेखील सध्या तेजीचे वारे आहे. स्थानिक वित्तीय संस्था व म्युच्युअल फंड हे बाजारात खूप पैसा ओतत आहेत. चांगले शेअर कमी व त्यांच्या मागे असणारा पैसा जास्त, अशी थोडी परिस्थिती असल्यामुळे या इश्‍यूसाठी चांगला प्रतिसाद मिळू शकेल. त्यामुळे मध्यम ते दीर्घ कालावधीची विचार करून गुंतवणूकदारांनी इश्‍यूसाठी नोंदणी करण्यास हरकत नाही.

(डिस्क्‍लेमर - लेखिका इक्विटी रिसर्च ॲनालिस्ट आहे. तिने तिच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. मात्र, शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर व तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com