फॉर्म १५ जी व १५ एच कोणासाठी ?

Form-15G-and-15H
Form-15G-and-15H

आपल्या ठेवी वा गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजातून उद्‌गम करकपात (टीडीएस) होऊ नये, यासाठी दरवर्षी साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात अनेक जण १५जी आणि १५एच फॉर्म भरत असतात; पण असे फॉर्म नेमके कोणी भरले पाहिजेत, कोणी भरले नाही पाहिजेत, या फॉर्मचा अर्थ काय असतो, याची माहिती न घेता सरसकट अनेक मंडळी असे फॉर्म बॅंका वा अन्य वित्तीय संस्थांत सादर करताना दिसतात. त्यामुळे हे फॉर्म नक्की कोण भरू शकतो, त्याचबरोबर कोणी भरणे अपेक्षित नाही, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

प्राप्तिकर कायद्याअंतर्गत ‘पॅन’ असणाऱ्या व भारतात रहिवासी असणाऱ्या (भागीदारी, कंपनी सोडून) ज्या सर्वसाधारण व्यक्ती वा हिंदू अविभक्त कुटुंब पद्धती वा ज्येष्ठ व्यक्तीचे विशद केलेल्या सर्व स्रोतातून मिळणारे अंदाजे वार्षिक उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर त्यांना १५जी किंवा १५एच फॉर्म भरता येतो. यासाठी करसवलतीचा लाभ विचारात घेतला जात नाही. 

थोडक्‍यात, दोन अटींची पूर्तता होणे आवश्‍यक आहे. पहिली अट म्हणजे वार्षिक अंदाजे उत्पन्न करपात्र नको; तर दुसरी अट कोणत्याही स्रोतातून येणारे उद्‌गम करकपातीस पात्र असणारे ढोबळ उत्पन्न किमान प्राप्तिकर कायद्याच्या मर्यादेपेक्षा जास्त असता कामा नये. या दोन्ही अटींची पूर्तता झाल्यास, ज्या करदात्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातून उद्‌गम करकपात होऊ द्यायची नसेल, तर असे पात्र सर्वसाधारण करदाते वैधरीत्या स्वयंघोषित प्रकटीकरण फॉर्म १५जी, तर ज्येष्ठ व अती ज्येष्ठ व्यक्ती फॉर्म १५एच भरू शकतात. हे फॉर्म दाखल केल्याने करदात्याला प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करून परताव्यासाठी (रिफंड) खटपट करावी लागत नाही. आपले उत्पन्न करपात्र असूनही काही मंडळी असे फॉर्म भरतात. ‘टीडीएस’ होऊ दिला नाही, याचा अर्थ ते उत्पन्न करमुक्त झाले, असा होत नाही, हे मात्र त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. 

यंदाच्या वर्षी कलम ८० टीटीबीअंतर्गत व्याजासाठी रु. ५० हजारांची वजावट ज्येष्ठ नागरिकांना दिलेली आहे. तथापी हे फॉर्म भरण्याचे निकष ढोबळ व्याजावर अवलंबून असल्याने करपात्र मर्यादेपेक्षा अधिक व्याजाचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना याचा उपयोग होणार नाही; परंतु पुढील वर्षी विवरणपत्र भरताना त्याचा उपयोग होईल. इतर ज्येष्ठांना ही वजावट झाल्यानंतर येणारे एकूण उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी झाल्यास हे फॉर्म लगेच भरता येतील. अनिवासी रहिवाशास करपात्र उत्पन्न नसतानादेखील १५जी किंवा १५एच फॉर्म भरता येत नाहीत. ‘पॅन’ नसणाऱ्या ज्येष्ठ वा कनिष्ठ व्यक्तींना हे फॉर्म भरता येत नाहीत. हिंदू अविभक्त कुटुंब पद्धतीस जरी कर्ता ज्येष्ठ नागरिक असला तरी त्याला फॉर्म १५एच भरता येत नाही. ‘पॅन’चा उल्लेख न करता असे फॉर्म भरल्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम २०६ एएअंतर्गत २० टक्‍क्‍यांनी उद्‌गम करकपात होईल.  

प्राप्तिकर कायद्याच्या कलम २७७ अंतर्गत जर असे फॉर्म दाखल करून कर चुकविला गेला, तर सश्रम कारावास व दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून या संदर्भात विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com