फ्युचर सप्लाय चेन सोल्युशन्सचा आयपीओ

फ्युचर सप्लाय चेन सोल्युशन्सचा आयपीओ

प्रश्‍न - ‘फ्युचर सप्लाय चेन सोल्युशन्स’चा आयपीओ कधीपासून सुरू झाला आहे व त्याचा किंमतपट्टा किती आहे?
- ‘फ्युचर सप्लाय चेन’चा आयपीओ सहा डिसेंबरपासून सुरू झाला असून, आठ डिसेंबरपर्यंत प्राथमिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ‘ऑफर फॉर सेल’ पद्धतीने ही विक्री होत असून, त्याद्वारे रु. ६४९ कोटी उभे केले जाणार आहेत. या इश्‍यूसाठीचा किंमतपट्टा रु. ६६० ते रु. ६६४ प्रति शेअर असा आहे. १८ डिसेंबरच्या आसपास या शेअरची नोंदणी होणार आहे. कमीत कमी २२ शेअर व त्या पटीत (जास्तीत जास्त २८६ शेअरसाठी) किरकोळ (छोटे) गुंतवणूकदार अर्ज करू शकतील. 

प्रश्‍न - ही कंपनी करते काय? 
- किशोर बियानींच्या फ्युचर एंटरप्रायझेसची ही उपकंपनी असून, थर्ड पार्टी लॉजिस्टिक सोल्युशन्स पुरविते. भारतात अशा प्रकारची संघटित सेवा देणाऱ्या महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये हिची गणना होते. ऑटोमेटेड आणि आयटी एनेबल्ड वेअरहाउसिंग- वितरण हे कंपनीचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये वेअरहाउसिंग- वितरण, पाँइट टू पाँइट व वातानुकूलित (थंड व नाशवंत पदार्थांची वाहतूक) अशा सेवा दिल्या जातात. फ्युचर ग्रुपसाठी तर ही कंपनी काम करतेच; पण त्याव्यतिरिक्त रिटेल, एफएमसीजी, ई-कॉमर्स, हेल्थ केअर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व टेक्‍नॉलॉजी आदी क्षेत्रांतील खूप मोठ्या कंपन्यांना सेवा पुरविली जाते. ॲसेट लाइट मॉडेलमध्ये कंपनी काम करते. थोडक्‍यात म्हणजे, व्यवसायासाठी वापरत असलेल्या ६८७ वाहनांपैकी फक्त १४४ वाहने कंपनीच्या मालकीची आहेत, त्यामुळे कमी भांडवलामध्ये अधिकाधिक काम करता येते. हब, शाखांमधून कंपनीचा व्यवसाय चालतो.

प्रश्‍न - कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?
- कंपनीची आर्थिक स्थिती उत्तम अशीच आहे. आर्थिक वर्ष २०१५ पासून ते २०१७ पर्यंत कंपनीच्या उत्पन्नात २१ टक्के सीएजीआर, तर निव्वळ नफ्यात ३७ टक्के सीएजीआर इतकी भरघोस वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१७ साठी ‘रिटर्न ऑन नेटवर्थ’ १५.६ टक्के आहे. 

प्रश्‍न - ‘फ्युचर सप्लाय चेन सोल्युशन्स’च्या शेअरसाठी देण्यात आलेली ऑफर कशी वाटते?
- रु. ६६४ ही ऑफर प्राइस गृहीत धरता २०१७ व २०१८ साठीचा पीई रेशो अनुक्रमे ५८ आणि ३७ येतो. पण, कंपनी आता मिळवत असलेला आणि भविष्यातील नफा बघता हे मूल्य देणे योग्य ठरेल. तसेच, ‘जीएसटी’मुळे लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आगामी काळ उत्तम असणार आहे. लॉजिस्टिक सेवा ही आता इन्फ्रास्ट्रक्‍चर क्षेत्रांतर्गत येणार असल्यामुळे यात खूप मोठ्या गुंतवणुका आणि व्यवसायवृद्धी होऊ शकणार आहे. आता बाजारामध्ये या क्षेत्रातील अल्कार्गो, गती, टीसीआय, व्हीआरएल, ब्लू डार्ट आणि महिंद्रा लॉजिस्टिक या नोंदणीकृत कंपन्या आहेत. या कंपन्यांशी तुलना करता, ‘फ्युचर सप्लाय चेन’चे ‘प्रॉफिट मार्जिन’ अधिक आहे. ताळेबंदामध्ये कर्जांची रक्कम खूप कमी आहे. आगामी काळात या व्यवसायाची होणारी वाढ बघता नोंदणीच्या वेळी होऊ शकणारा फायदा व दीर्घकाळासाठी देखील या आयपीओसाठी अर्ज करण्यास हरकत नाही.

(डिस्क्‍लेमर - लेखिका सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर असून, तिने तिच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. मात्र, शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर व तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com