औद्योगिक उत्पादनाला ओहोटी

पीटीआय
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - उत्पादन क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे जुलैमधील औद्योगिक उत्पादनात केवळ १.२ टक्‍क्‍याची वाढ झाली आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत औद्योगिक उत्पादनात केवळ १.७ टक्‍क्‍याची वाढ झाली असून, गतवर्षी याच कालावधीत हे प्रमाण ६.५ टक्के होते. औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर कमी करण्याची मागणी जोर धरत आहे. 

केंद्रीय सांख्यिकी विभागाने मंगळवारी औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची (आयआयपी) आकडेवारी जाहीर केली. यामध्ये जुलैमध्ये आयआयपी केवळ १.७ टक्‍क्‍यापर्यंत मर्यादित राहिला. यात कारखाना उत्पादनात ०.१ टक्‍क्‍याची घट झाली. त्याचबरोबर भांडवली वस्तूंच्या उत्पादनात १ टक्‍क्‍याची घट झाली. वीजनिर्मिती आणि खनिजनिर्मितीमध्ये अनुक्रमे ६.५ टक्के आणि ४.८ टक्‍क्‍यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. उत्पादन क्षेत्रातील २३ पैकी केवळ ८ क्षेत्रांची जुलै महिन्यात कामगिरी समाधानकारक झाली आहे. दरम्यान, जुलैमधील निराशाजनक कामगिरीमुळे औद्योगिक क्षेत्रावर मंदीचा प्रभाव कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आगामी पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर कमी करण्याची मागणी औद्योगिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

महागाई पाच महिन्यांच्या उच्चांकावर 
फळे, भाजीपाल्याच्या किमती वाढल्याने ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाईचा दर ३.३६ टक्‍क्‍यांपर्यंत गेला आहे. महागाई दर पाच महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. महागाईचा पारा चढू लागल्याने रिझर्व्ह बॅंकेवर व्याजदर कपातीचा दबाव वाढला आहे. बॅंकेने चलनवाढीचे ४ ते ६ टक्‍क्‍यांदरम्यान उद्दिष्ट ठेवले आहे. जुलैमध्ये किरकोळ चलनवाढ २.३६ टक्के होती. गेल्या महिन्यात बहुतांश अन्नधान्यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Web Title: arthavishwa news industrial production decrease