बॅंकेच्या संचालक मंडळावर आयटी तज्ज्ञांची गरज

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

मुंबई - सायबर हल्ल्यांनी वित्तीय सेवा क्षेत्रापुढे नवे आव्हान उभे केले आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी बॅंकेच्या संचालक मंडळावर माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञाची आवश्‍यकता आहे, असे मत रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यकारी संचालक मीना हेमचंद्रा यांनी व्यक्त केले आहे. भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) आयोजित केलेल्या सायबर सिक्‍युरिटी परिषदेत त्या बोलत होत्या. 

बॅंकिंग व्यवस्था अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. बॅंकांनी सायबर सुरक्षेला भक्कम करण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला पाहिजे. यासाठी आयटीतज्ज्ञ संचालक मंडळावर असणे ही बॅंकांसाठी काळाची गरज बनली असल्याचे हेमचंद्रा यांनी सांगितले. सायबर सुरक्षेबाबत जोपर्यंत संचालक मंडळाकडून गांभीर्याने पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत या प्रक्रियेला गती मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

अनेकदा हॅकर आणि सायबरतज्ज्ञ यंत्रणेतील दोष शोधून काढून बॅंक ग्राहकांची फसवणूक करतात. या सायबर हल्ल्यांना बॅंकादेखील सक्षम नसतात. बॅंकांनी संचालक मंडळावर आयटी पार्श्‍वभूमी असलेल्या तज्ज्ञांचा समावेश करण्याबरोबर माहिती तंत्रज्ञान विभागासाठी मुख्य सुरक्षा अधिकारी नियुक्‍त करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक बॅंकेने स्वत:चे सायबर सुरक्षा धोरण तयार करावे, असे आवाहन त्यांनी केले.