चोक्‍सीशी निगडित कंपन्यांवर छापे

Nirav-Modi-mehul-Choksi
Nirav-Modi-mehul-Choksi

नवी दिल्ली - गीतांजली जेम्सचा प्रवर्तक मेहुल चोक्‍सी याच्याशी निगडित १३ कंपन्यांवर देशभरात वीस ठिकाणी प्राप्तिकर विभागाने मंगळवारी छापे घातले. करचुकवेगिरीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोक्‍सी आणि गीतांजली जेम्सशी निगडित १३ कंपन्यांच्या मुंबई, पुणे, सुरत, हैदराबाद, बंगळूर आणि अन्य काही शहरांतील कार्यालयांवर आज छापे घालण्यात आले. देशभरात ११० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांची पथकांनी वीस ठिकाणी हे छापे घातले. या छाप्यात कंपन्यांच्या व्यवहाराचे तपशील जप्त करण्यात आले आहेत. चोक्‍सी आणि गीतांजली जेम्सची बॅंक खाती गोठविण्याची कारवाई प्राप्तिकर विभागाने याआधीच केली आहे.

चोक्‍सीविरोधात तपासाचे निर्देश 
गीतांजली जेम्सचा प्रवर्तक मेहुल चोक्‍सी याच्याविरुद्ध २०१६ मध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी पोलिसांना दिला.  मेहुल चोक्‍सीविरुद्ध एका अभियांत्रिकी कंपनीने २०१६ मध्ये तक्रार दाखल केली होती. ही तक्रार रद्द करण्याची मागणी चोक्‍सी याने उच्च न्यायालयात केली  होती.

आणखी पाच जणांना अटक
मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारप्रकरणी ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये आणखी पाच जणांना मंगळवारी अटक करण्यात आली. 

फायर स्टार ग्रुपच्या वित्त विभागाचा अध्यक्ष विपुल अंबानी, या प्रकरणात आरोपी असलेल्या तीन कंपन्यांच्या सहायक कार्यकारी व अधिकृत स्वाक्षरी करणाऱ्या कविता माणकीकर; तसेच फायर स्टार ग्रुपचे वरिष्ठ कार्यकारी अर्जुन पाटील अशी त्यापैकी तिघांची नावे आहेत. नीरव मोदी व त्याच्याशी संबंधित कंपन्यांप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक झाली आहे. ‘गीतांजली’च्या मेहुल चोक्‍सीविरोधात दाखल गुन्ह्यात नक्षत्र ग्रुप व गीतांजली ग्रुपचे मुख्य वित्त अधिकारी कपिल खांडेलवाल व गीतांजली ग्रुपचे व्यवस्थापक नितेश शाही यांनाही अटक झाली आहे. 

पीएनबीत लेटर ऑफ अंडरटेकिंग (हमीपत्र) देऊन करण्यात आलेल्या ११ हजार ३६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी ‘सीबीआय’ने दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी पहिला गुन्हा २९ जानेवारीला नोंदवण्यात आला होता. त्यात नीरव मोदी व इतर आरोपींनी २८० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. प्रत्यक्षात या प्रकरणातील फसवणूक सहा हजार कोटींची असल्याचे ‘सीबीआय’च्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय मेहुल चोक्‍सी व इतर आरोपींवर ४ हजार ८८६ कोटींचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी ‘सीबीआय’ने दुसरा गुन्हा 
नोंदवला आहे.

जेटलींनी फोडले बॅंकांवर खापर
पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारानंतर प्रथमच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रकरणी मंगळवारी मौन सोडले. बॅंकेच्या अंतर्गत व बाह्य लेखापरीक्षात हा गैरव्यवहार उघड का झाला नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 

जेटली यांनी ‘पीएनबी’सह नीरव मोदी याचा थेट नामोल्लेख टाळला. ते म्हणाले, की मागील सात वर्षे हा गैरव्यवहार सुरू होता. बॅंकेच्या अंतर्गत आणि बाह्य लेखापरीक्षात ही बाब का उघड झाली नाही. सत्ताधारी म्हणून आमची या प्रकरणी जबाबदारी आहे. यातील दोषींना योग्य शिक्षा मिळावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. यामध्ये देशाची फसवणूक होणार नाही, याची खात्री सरकार देत आहे. सरकारी बॅंकांना सरकारने व्यवस्थापनमध्ये स्वायत्तता दिली आहे. त्यांच्या कामकाजात सरकारचा हस्तक्षेप होत नाही. आता बॅंकांच्या व्यवस्थापनानेच याची उत्तरे द्यायला हवीत. 

तीन अधिकाऱ्यांना पोलिस कोठडी
मुंबई - ‘पीएनबी’तील गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने अटक केलेल्या तीन बॅंक अधिकाऱ्यांना ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी  न्यायालयाने दिले.

या गैरव्यवहारप्रकरणी बेछू तिवारी, यशवंत जोशी आणि प्रफुल्ल सावंत यांना सोमवारी अटक झाली होती. यातील तिवारी हा फॉरेक्‍स विभागाचा मुख्य व्यवस्थापक आहे. याप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेला गोकुळनाथ शेट्टी हा त्याच विभागात कार्यरत होता. तिवारीने २०१६, २०१७ व २०१८ मध्ये परिपत्रक काढून ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ तपासणी करण्याबाबत सांगितले होते; परंतु प्रत्यक्षात त्याने शेट्टीच्या हमीपत्रांची तपासणी केली नव्हती. जोशी हा फॉरेक्‍स विभागाचा स्केल २ व्यवस्थापक होता. शेट्टीच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबादारी त्याच्यावर होती. सावंत हा निर्यात अधिकारी असून, दैनंदिन ‘स्विफ्ट’ संदेश तपासण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com