रिझर्व्ह बॅंकेचे बाँड आजपासून बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पुणे - सध्याच्या घसरत्या व्याजदराच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारे भारत सरकारचे (रिझर्व्ह बॅंक) ८ टक्के व्याजदराचे करपात्र सेव्हिंग्ज बाँड उद्यापासून (ता. २) नव्या गुंतवणुकीसाठी बंद करण्यात येत आहेत. या संदर्भातील परिपत्रक रिझर्व्ह बॅंकेने आज जारी केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठीचा भक्कम सुरक्षिततेचा गुंतवणूक पर्याय आता उपलब्ध राहणार नाही. 

सहा वर्षे मुदतीचे हे करपात्र बाँड्‌स २००३ पासून बाजारात उपलब्ध होते. त्यावर अनेक वर्षे आठ टक्के दराने व्याज दिले जात होते. असंचयी (नॉन-क्‍युम्युलेटिव्ह) पर्यायांतर्गत सहामाही व्याज आणि संचयी (क्‍युम्युलेटिव्ह) पर्यायांतर्गत मुदतीनंतर मुद्दल व व्याज एकत्र दिले जात होते. यातील गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा नव्हती; तसेच गुंतवणुकीसाठी रकमेची मर्यादाही नव्हती. अलीकडच्या काळात बॅंका आणि पोस्टातील ठेव योजनांचे व्याजदर घसरत जाऊन आठ टक्‍क्‍यांच्या खाली आले, तेव्हापासून या बाँडना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. सध्याच्या काळात हाच पर्याय आकर्षक असल्याने अनेक जण यात मोठ्या रकमेची गुंतवणूक करीत होते. 

बॅंकांतील ठेवी आणि अल्पबचत योजनांचे व्याजदर कमी झाल्याने आता या बाँडचे व्याजदर थोडे कमी केले जातील, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, सरकारने अचानक हे बाँड बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला.

स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, स्टेट बॅंक, एचडीएफसी बॅंक आदींच्या माध्यमातून हे बाँड घेता येत असत. उद्या म्हणजे दोन जानेवारीला संबंधित बॅंकांमधील खात्यांचे धनादेश असतील तर हे बाँड घेण्याची शेवटची संधी मिळू शकणार असल्याचे समजते.

Web Title: arthavishwa news reserve bank bond close