नफेखोरीने सेन्सेक्‍सच्या घोडदौडीला ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई - तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍सने २९० अंशांची आणि निफ्टीने ९० अंशांची उसळी घेतली. मात्र, त्यानंतर नफावसुली झाल्याने दोन्ही निर्देशांकांची घोडदौड थांबली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ०.८४ अंशांच्या किरकोळ वाढीसह ३२ हजार ३८३ अंशांवर स्थिरावला. निफ्टीवर लाल निशाण फडकले. निफ्टी ०.१० अंशांच्या घसरणीसह १० हजार २०.५५ अंशांवर बंद झाला. 

वित्तसंस्था, बॅंका, ऑटो, रियल्टी, आयटी, एफएमसीजी, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्सना मागणी होती. जुलैमधील वायदेपूर्ती असल्याने गुंतवणूकदारांनी नफावसुली करण्याला प्राधान्य दिले. सकाळच्या सत्रात खरेदीचा ओघ दिसून आला. मात्र, त्यानंतर विक्रीच्या सपाट्याने सेन्सेक्‍स आणि निफ्टीतील वाढ थांबली. दोन्ही निर्देशांक कालच्या पातळीवर स्थिरावले. डॉ. रेड्डी लॅब, रिलायन्स, आयटीसी, इन्फोसिस, टीसीएस, भारती एअरटेल आदी शेअर्समध्ये घसरण झाली. एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक, एसबीआय आदी शेअर वधारले.  जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि ब्लूचिप शेअर्समधील खरेदीने निफ्टीला १० हजार १०० अंशांपलीकडे नेले. मात्र, दुपारी दोन वाजल्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला, ज्यात नफावसुली मोठ्या प्रमाणात झाल्याचे अँजल ब्रोकिंगचे मुख्य विश्‍लेषक समीत चव्हाण यांनी सांगितले. निफ्टी उद्या १० हजार ५५ ते १० हजार ११५ अंशांच्या दरम्यान व्यवहार करेल, असा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.