नफा असावा, मृगजळ नको!

नफा असावा, मृगजळ नको!

मागील पंधरा दिवसांत शेअर बाजारात झालेली उलथापालथ पाहून गुंतवणूकदारांना काही प्रश्न नक्की पडले असतील. बाजार अजून खाली जाईल का?, नवीन खरेदी करावी का?, जवळ आहेत ते शेअर विकावेत का?, असे विचार नक्की मनात आले असतील. 

पण ‘मंदी हीच संधी’, या शीर्षकाने आम्ही फेब्रुवारी २०१६ मध्ये एक लेख लिहिला होता व तेथून बाजारात झालेली भरीव वाढ हा एक सुखद धक्का होता. त्याची आज प्रकर्षाने आठवण झाली. जे गुंतवणूकदार बाजार खाली येण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी नुकतीच झालेली पडझड ही एक संधी म्हणता येईल. बाजार सर्वोच्च पातळीपासून केवळ ४-४.५ टक्के खाली आला, पण अनेक शेअरचे भाव २५-३० टक्के खाली आले व एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की आपण थोडा तरी नफा पदरी पाडून घ्यायला हवा होता. त्यामुळेच आम्ही कायम सांगत आलो आहोत त्याप्रमाणे निदान काही अंशी तरी नफा हा वेळोवेळी काढून घेतला पाहिजे. उरलेल्या शेअरसाठी दीर्घकाळ थांबावे. त्यामुळे आपली दोन्ही उद्दिष्टे सफल होतात व नफा काढून घेतल्याने विकलेले शेअर अशा मंदीच्यावेळी पुन्हा कमी भावात घेता येतात.

मुद्दल सुरक्षित करणे महत्त्वाचे!
कोणतीही गुंतवणूक ही दीर्घकालीन दृष्टिकोनातूनच असावी, हे खरे आहे. परंतु ज्या ज्या वेळेस आपल्याला मिळणारा परतावा हा जर ४० टक्‍क्‍यांच्या (एक वर्षाच्या आत) घरात असेल तर आपली मुद्दल अशा गुंतवणुकीतून बाहेर काढावी. अशावेळी कर भरावा लागला तरी चालेल, पण मुद्दल सुरक्षित करणे महत्त्वाचे! जर तोच शेअर नंतर खालच्या भावात मिळाला तर पुन्हा घ्यायला हरकत नाही. अनेकांच्या बाबतीत बाजारातील नफा हा मृगजळ ठरलेला आहे व तो नफा काढून न घेतल्यामुळे पश्‍चात्तापदेखील होतो. अशा परिस्थितीत एक गोष्ट लक्षात ठेवावी व ती म्हणजे जर गुंतवणूक केलेल्या शेअरबद्दल सर्व काही ठीक असेल तर खाली आल्यावर त्यात ‘रि-एन्ट्री’ करावी व नंतर शेअर जसा वाढेल, तसतसे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये लक्ष ठेवून विकत राहावे. थोडक्‍यात, शेअर बाजारातील निर्णय हे वास्तवतेचे भान ठेवून व कोणत्याही लोभात न फसता घेणे इष्ट! 

नफा पदरात पाडून घ्यावा!
शेअर बाजारात कोणतीही घटना ठरवून होत नाही, हे लक्षात ठेवायला हवे. घटना घडत असतात व बाजार त्याला सामोरे जात असतो. जशी एखादी चांगली बातमी आली, की तो वाढतो; तसेच नकारात्मक संकेत दिसले, की तो पडतो अथवा काही वाईट घडामोडी घडल्या तर तो कोसळतोदेखील. भारतीय अर्थव्यवस्था कितीही चांगली असली तरी जागतिक घडामोडींपासून अलिप्त नाही. त्यामुळे जागतिक अस्थिरता, युद्धसदृश परिस्थिती व इतर काही घडामोडी घडल्या तर आपल्या बाजारावरही त्याचा मोठा परिणाम होणार. त्यामुळेच नफा हा फक्त कागदावर न ठेवता वेळोवेळी पदरात पाडून घ्यायला हवा व त्याद्वारे आपली जोखीम कमी करत राहिले पाहिजे.

नव्याने गुंतवणूक करताना एक छोटीशी गोष्ट नमूद करावीशी वाटते. ज्या शेअरमध्ये आपणास खरेदी करायची आहे, अशा शेअरची यादी बनवून ठेवावी व ते अपेक्षित भावात आल्यास त्यात ‘एंट्री’ करावी. उगाच एखादा शेअर रोज वाढत आहे म्हणून कोणत्याही भावात घेणे कटाक्षाने टाळावे. तसेच अशा कंपनीच्या व्यवसायाबद्दल थोडी माहिती करून घ्यावी, गुगल आपल्या मदतीला आहेच. 

आज एक शेअर आपल्या अभ्यासासाठी सुचवित आहोत, बघा तुमच्या पसंतीस उतरतोय का?

मुंजाल शोवा लिमिटेड (सध्याचा भाव - रु. २२५)
मुंजाल शोवा लि. ही हरियानास्थित, वाहन उद्योगांसाठी लागणारे स्पेअर पार्टस बनविणारी कंपनी आहे. तिचे मुख्य उत्पादन हे गाड्यांमध्ये लागणारे शॉक ॲब्सॉर्बर आहे. कंपनीमध्ये प्रवर्तकांचे ६५ टक्के शेअर्स असून, कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. कंपनीचे पुस्तकी मूल्य रु. ३० असून, ही कंपनी नियमितपणे लाभांश देत आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये कंपनीने रु. ५५ कोटी इतका नफा जाहीर केला असून, कंपनी नोटाबंदीच्या तडाख्यातून बाहेर पडत आहे, असे नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाही निकालांमुळे वाटते. तसेच चांगला पाऊस झाल्यामुळे वाहनांना मागणीदेखील चांगली राहील, असे वाटते. त्या अनुषंगाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये कंपनी रु. ६५ ते ७२ कोटींचा, तर २०१८-१९ मध्ये रु. ८० ते ९० कोटींचा नफा जाहीर करेल, असे वाटते. या क्षेत्रातील इतर कंपन्या पाहिल्यावर, या कंपनीचा शेअर आकर्षक भावावर उपलब्ध आहे, असे जाणवते. या क्षेत्रातील इतर कंपन्यांचे उत्पन्न व ‘मार्केट कॅप’ पाहिल्यास मुंजाल शोवा खूपच स्वस्त वाटतो. या कंपनीला तिच्या एकूण उत्पन्नाच्या एक पट जरी ‘व्हॅल्युएशन’ दिल्यास येथूनसुद्धा खूप मोठी वाढ अपेक्षित धरता येऊ शकते. त्याचमुळे आम्हाला या शेअरमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी निश्‍चित वाव आहे, असे वाटते.

(डिस्क्‍लेमर - लेखकद्वय ‘इक्विबुल्स’चे संचालक असून, त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्यांच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com