‘चीत भी मेरी और पट भी मेरा’

‘चीत भी मेरी और पट भी मेरा’

राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ हा निर्देशांक आता १० हजार अंशांच्या टप्प्याजवळ येऊन पोचला आहे आणि लवकरच १० हजारांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला जाण्याची शक्‍यता आहे. असे एकीकडे होण्याची शक्‍यता असतानाच, दुसरीकडे बाजारात घसरण (‘करेक्‍शन’ होण्याची भीतीही व्यक्त होऊ लागली आहे. अशावेळी शेअर बाजाराशी निगडित गुंतवणूकदारांपुढे आज शेक्‍सपियरच्या नाटकाप्रमाणे ‘टू बी ऑर नॉट टू बी’ अर्थात ‘नफा काढून घेऊ का नको,’ असा प्रश्न पडला आहे. तसेच, नवीन गुंतवणूकदारांना, ‘आता गुंतवणूक करू का बाजार खाली येईपर्यंत थांबू,’ असा प्रश्न पडला आहे.

थोडक्‍यात काय, तर गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला दिसतो.  ‘निफ्टी’ निर्देशांक जसा १० हजार अंशांच्या दिशेने जायला लागला, तसतसे बहुतेक शेअर बाजारतज्ज्ञांनी सावध पवित्रा घेत गुंतवणूक थांबवा किंवा कमी करा, असा सल्ला द्यायला सुरवात केली. परंतु, काही तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, बाजार फारसा खाली येणार नाही व तो अजून वर जाऊ शकतो. या दोन्हीच्या कारणांमध्ये न पडता गुंतवणूकदारांनी काय करणे योग्य ठरेल ते पाहूया. यासाठी दोन विभाग करूया- अ) नवीन गुंतवणूकदार आणि ब) जुने गुंतवणूकदार
 

अ) नव्या गुंतवणूकदारांसाठी -
दीर्घ काळासाठी (पाच वर्षे व अधिक) गुंतवणूक करणार असाल, तर शेअर बाजार खाली येईल म्हणून गुंतवणूक पुढे ढकलू नका. थोडक्‍यात, बाजाराचे ‘टायमिंग’ करू नका.

तुम्ही म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमध्ये ‘एसआयपी’ केव्हाही सुरू करू शकता. त्यासाठी बाजार वर जाईल का खाली, ते तपासायची गरज नाही.   
तुम्हाला जर बाजार खाली जाईल असे वाटत असेल आणि तुमच्याकडे एकरकमी पैसे असतील तर लिक्विड योजनांमधून ‘सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन’ म्हणजेच ‘एसटीपी’द्वारे पुढील ८ ते १२ महिन्यांत इक्विटी योजनांमध्ये या.

ब) जुन्या गुंतवणूकदारांसाठी -
तुमचे मालमत्ता विभाजन म्हणजेच ‘ॲसेट अलोकेशन’ पक्के ठेवा. 
आपली गुंतवणूक परत तपासा, कारण काही खराब कामगिरी करणारे शेअर किंवा म्युच्युअल फंड योजना असतील, तर त्यातून बाहेर पडायला ही योग्य संधी आहे.

दीर्घकालीन उद्देशासाठी सुरू केलेली ‘एसआयपी’ थांबवू नका.
म्युच्युअल फंड इक्विटी योजनांमध्ये जी रक्कम जमलेली असेल, त्या रकमेला त्याच म्युच्युअल फंडाच्या लिक्विड योजनेमध्ये बदली करून लगेचच तेथून पहिल्या इक्विटी योजनेमध्ये १२ महिन्यांसाठी ‘एसटीपी’ करा. तुमची गुंतवणूक दीर्घकालीन आहे, हे येथे गृहीत धरले आहे.

(डिस्क्‍लेमर - लेखक ए३एस फायनान्शियल सोल्यूशन्सचे संचालक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व्यक्त केले आहे. मात्र, शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com