‘डब्लूईएफ’च्या केंद्राचा मुंबईत विस्तार

‘डब्लूईएफ’च्या केंद्राचा मुंबईत विस्तार

दावोस - ‘जागतिक आर्थिक मंचा’ने (डब्लूईएफ) जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे मंगळवारी सांगितले.

जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस दावोसला गेले आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ‘डब्लूईएफ’चे अन्नसुरक्षा विषयक विभागाचे प्रमुख सीन डी क्‍लिन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘व्हॅल्यू चेन’, शेतीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, नवीन संशोधनांचा उपयोग आणि सकस अन्नाची गरज अशा अनेक विषयांवर या वेळी व्यापक चर्चा झाली. ‘डब्लूईएफ’च्या निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘विविध तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या फोरमच्या मुंबईतील केंद्रातून ज्ञानाचे आदानप्रदान करण्याबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाधारित धोरणांची अंमलबजावणी करणे अधिक सुकर होईल. या माध्यमातून रोबोटिक्‍स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, शेतीसाठी ड्रोनसारख्या तंत्राच्या वापरावर भर देण्यात येणार आहे.

क्‍लिन यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सार्वजनिक-खासगी भागीदारीतून ‘व्हॅल्यू चेन’ला अधिक चालना देऊन राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच बॅंकांसोबत व्यापक भागीदारी, प्रत्यक्ष पीकपद्धतीवर आधारित अर्थपुरवठा आणि सुयोग्य विम्याच्या सुविधा या विषयांवरही चर्चा झाली.’’ ही चर्चा अन्नसुरक्षा, शाश्वत पर्यावरण आणि आर्थिक संधीतून शाश्वत शेतीकडे अधिक चांगली वाटचाल करण्यासाठी निश्‍चितपणे उपयोगी ठरेल, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

दरम्यान, रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दावोस येथील मॅग्नेटिक महाराष्ट्र सेंटरला भेट दिली. गावांना डिजिटली जोडण्याची व्यापक योजना आणि ‘इंडस्ट्री ४.०’ अर्थात चौथ्या औद्योगिक क्रांतीसंदर्भातील अनेक मुद्द्यांसंदर्भात फडणवीस यांच्याशी त्यांनी या वेळी चर्चा केली. 

आव्हानांबाबत मोदींकडून चिंता व्यक्त
जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्लूईएफ) परिषदेमध्ये बोलताना मोदी यांनी दहशतवादासह जगासमोर असलेल्या आव्हानांबाबत चिंता व्यक्त केली. दहशतवादाचा एकत्रित मुकाबला करण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. ‘दहशतवाद आणि वातावरण बदल हे चिंतेचे विषय आहेतच. मात्र, चांगला दहशतवादी आणि वाईट दहशतवादी असा फरक केला जाणे, हेदेखील तितकेच घातक आहे. आपण स्वातंत्र्याचा असा स्वर्ग निर्माण करू, जेथे सहकार्य असेल, फूट नसेल,’ असे मोदी यांनी आवाहन केले. 

‘जेव्हा ॲमेझॉन म्हणजे केवळ जंगल’
पंतप्रधान मोदी यांनी जागतिक स्तरावर गेल्या वीस वर्षांत झालेल्या बदलांची नोंद घेताना, ‘जेव्हा केवळ पक्षीच चिवचिवाट (ट्‌विटिंग) करत असत आणि ॲमेझॉन म्हणजे फक्त जंगल होते, हॅरी पॉटर हे नाव कोणालाही माहीत नव्हते, तो काळ संपला,’ असे निरीक्षण नोंदविले. बुिद्धबळपटूंनाही त्या काळी संगणकाची भीती वाटत नव्हती, गुगललाही काही स्थान नव्हते, असेही मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com