कृषी उत्पादनांवर कर लागू करणार नाही : जेटली 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

केंद्र सरकार कृषी उत्पादनांवर कर लावण्याचा कोणताही विचार नाही. राज्यघटनेने केंद्र सरकारला दिलेल्या अधिकारांमध्ये कृषी उत्पादनांवर कर लागू करण्याबाबत कोणताही उल्लेख नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

नवी दिल्ली - शेती उत्पादनांवर कर लागू करण्याची सूचना निती आयोगाने केली असली तरी केंद्र सरकारचा असा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. जेटली यांनी आपल्या ट्‌विटर अकाउंटवर यासंबंधी प्रतिक्रिया दिली. 

ट्‌विटर अकाउंटवर जेटली म्हणाले, की केंद्र सरकार कृषी उत्पादनांवर कर लावण्याचा कोणताही विचार नाही. राज्यघटनेने केंद्र सरकारला दिलेल्या अधिकारांमध्ये कृषी उत्पादनांवर कर लागू करण्याबाबत कोणताही उल्लेख नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
निती आयोगाचे सदस्य विवेक देब्रॉय यांनी मंगळवारी करांची व्याप्ती वाढवण्यासाठी ठराविक उत्पन्नापेक्षा अधिक शेती उत्पन्न मिळवणाऱ्यांवर कर लागू करण्याची सूचना केली होती. त्यावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्याने केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिले. 

शेती उत्पादनांवर कर लागू करणे, हा एक राजकीय संवेदनशील मुद्दा बनला आहे. ग्रामीण भागात शेतीतून मोठे उत्पन्न मिळवणाराही एक मोठा वर्ग आहे. हा सधन वर्ग असूनही त्याला शेतीसाठीच्या सर्व सोयीसुविधा व करमाफी सातत्याने मिळत असल्याने या वर्गावर कर लावणे क्रमप्राप्त ठरते, असे देब्रॉय यांचे म्हणणे होते; पण त्यावरून वातावरण तापत असतानाच जेटली यांनी या विषयाचे निराकरण केले. नुकतेच 22 मार्चला संसदेत बोलतानाही जेटली यांनी याविषयी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली होती.