धीर धरा, हडबडू, गडबडू नका..!

धीर धरा, हडबडू, गडबडू नका..!

अरविंद शं. परांजपे
मुंबई शेअर बाजाराचा ऑगस्ट महिन्यात ३८,८९० अंशांच्या शिखरावर असलेला ‘सेन्सेक्‍स’ सध्या ३५,००० अंशांच्या खाली (सुमारे ११ टक्के) आल्यामुळे काही गुंतवणूकदारांच्या मनात चलबिचल होत आहे, यात आश्‍चर्य नाही. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात झपाट्याने घट झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे भावही प्रति पिंप ८५ डॉलरच्या पुढे गेले आहेत. देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढते आहे आणि कच्या तेलाच्या वाढत्या भावामुळे त्यात भर पडत आहे. याचा परिणाम म्हणून महागाई दरात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा विपरित परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेअर बाजारात या सर्व घडामोडींचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. परंतु, इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 

१) इक्विटी या ॲसेट क्‍लासमध्ये असे चढ-उतार होणे हे गृहितच धरावे लागते. देशातील आणि परदेशातील अनेक घडामोडींवर (मॅक्रो फॅक्‍टर) आणि कंपन्यांच्या कामगिरीवर शेअर बाजार अवलंबून असतो. त्यामुळे अनुकूल-प्रतिकूल अशा सर्व घटकांचा परिणाम होत राहतो. 

२) जर अर्थव्यवस्था प्रगतिपथावर असेल, तर शेअर बाजारावर त्याचा अनुकूल परिणाम होतच असतो. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग पुढील काही वर्षांसाठी किमान ७ टक्के (वार्षिक वाढ) एवढा तरी राहील, याविषयी सर्व आर्थिक संस्थांमध्ये एकमत आहे. यात जर आपण ५ टक्के महागाई वाढीचा दर मिळविला तर सुमारे १२ टक्के या दराने शेअर बाजाराचा निर्देशांक वाढावा, अशी अपेक्षा ठेवता येईल.

३) ब्लुमबर्ग, आयसीआयसीआय सिक्‍युरिटीजच्या अभ्यासानुसार, यापूर्वी जेव्हा जेव्हा शेअर बाजारात १४ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट झाली, तेव्हा पुढील (सरासरी) ६६ दिवसांत ती घट भरून निघाली, असे दिसून आले आहे. २००६ मध्ये झालेली ३० टक्के घट पुढील चार महिन्यांत भरून निघाली होती. २००४ मध्ये झालेली २७ टक्के घट पुढील सहा महिन्यांत भरून निघाली होती. 

४) म्युच्युअल फंडांच्या अनेक प्रकारच्या इक्विटी योजना असतात. यातील कंपन्यांची निवड करताना अनेक चाळण्या लावून केली जात असल्याने आणि एका योजनेत अनेक कंपन्यांचा समावेश असल्याने चांगल्या म्युच्युअल फंड योजनेतील पैसे कमी होऊ शकतात; पण बुडण्याची शक्‍यता नसते.

५) इक्विटी प्रकारात लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि मल्टी कॅप असे वैविध्य असते. लार्ज कॅप प्रकारातील योजनांची जोखीम मिड कॅप योजनेपेक्षा आणि मिड कॅप कंपन्यांची जोखीम स्मॉल कॅप योजनेपेक्षा तुलनेने कमी असते. अर्थात, त्यांच्या परताव्यातही तसा फरक पडतो. त्यामुळे जोखीम कमी करायची असेल तर लार्ज कॅप योजनेतील गुंतवणूक वाढवायला हरकत नाही. 

६) जोखीम अजून कमी करायची असेल, तर ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त इक्विटी असलेल्या हायब्रीड योजनांचा विचार करावा. यातही ‘एसआयपी’ करता येते.

७) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चालू ‘एसआयपी’ अजिबात बंद करू नयेत. असे करण्याने कमी ‘एनएव्ही’ला मिळू शकणारी युनिट्‌स आपल्याला मिळणार नाहीत. लक्षात ठेवा, की ‘बाय लो, सेल हाय’ या तत्त्वानेच फायदा होतो अणि त्यासाठी ‘एसआयपी’ हे आदर्श साधन आहे.

८) ‘एसआयपी’ करणाऱ्या तरुण गुंतवणूकदारांना तर शेअर बाजारातील पडझड ही पर्वणी वाटली पाहिजे. ज्यांची आर्थिक उद्दिष्टे १० वर्षे किंवा अधिक काळाची आहेत, त्यांनी मिड कॅप आणि स्मॉल कॅप योजनेत जरूर ‘एसआयपी’ करावे आणि ते चालूच ठेवावे.

९) ज्यांना आता एकरकमी गुंतवणूक करायची आहे, त्यांनी ती ‘सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन’चा (एसटीपी) उपयोग करून पुढील ६ ते १२ महिन्यांत लिक्विड फंडातून इक्विटी योजनेत करायला हरकत नाही. 

कोणतेही सरकार आले तरीसुद्धा भारतीय आर्थिक व्यवस्थेची पुढील अनेक वर्षे ही प्रगतिपथावरील आहेत, असा विश्‍वास बाळगावा. दीर्घकाळाचे उद्दिष्ट ठेऊन पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्यात आपले हित आहे. शेअर बाजारातील सध्यासारखी ‘करेक्‍शन’ ही संधी समजायला हरकत नाही. ‘जेव्हा इतर लोक घाबरलेले असतात, तेव्हा तुम्ही लोभी बना...’ प्रसिद्ध गुंतवणूक गुरू वॉरन बफे यांचे हे विधान काय लक्षात ठेवा. शेवटी, ‘धीर धरा, हडबडू, गडबडू नका,’ या वचनाची आठवण करून देतो, कारण संयम ठेवल्यानेच आपल्या गुंतवणुकीची मधूर फळे दीर्घकाळात चाखता येतात.

----------------------------------------------------------------------------------------------
(भरत फाटक)
गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ऑगस्टअखेर ३८,९८९ वरून आज ३४,३७६ वर आला आहे, म्हणजेच ११.८४ टक्के खाली आहे. मिड कॅप निर्देशांक जानेवारी २०१८ च्या पातळीपासून २३.५६ टक्के, तर स्मॉप कॅप ३१.४३ टक्के खाली आहे. घसरणारा रुपया, वाढणारे व्याजदर आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती; याबरोबरच काही राज्ये आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या सर्वांच्याच बातम्यांमुळे साशंकता आणि काळजी वाढते. गेल्या ३ ते ४ वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. दरमहा रिकरिंग डिपॉझिटप्रमाणे करायचा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) घराघरांत पोचला. दरमहा ७५०० कोटींची गुंतवणूक या मार्गातून होऊ लागली. दीर्घ मुदतीसाठी बाजारात गुंतवणूक करण्याचा हा योग्य मार्ग अनेकांनी अंगिकारला. म्युच्युअल फंडात खासगी क्षेत्राच्या प्रवेशाला २५ वर्षे पूर्ण होत असताना त्यांची मालमत्ता २५ लाख कोटींच्या उच्चांकी पातळीवर पोचली.

पडझडीकडे काणाडोळा करा!
इतर क्षेत्रातील ग्राहकांच्या वागणुकीपेक्षा गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील वर्तणूक पराकोटीची वेगळी असते. कपडे, वाहने, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू यांमध्ये ‘सेल’ लागला, तर खरेदीची झुंबड उडते. कमी भावामध्ये खरेदी करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. शेअर बाजारामध्ये मात्र चढ्या भावातच खरेदी करावीशी वाटते. मनाच्या या प्रलोभनापासून सुटका मिळविण्यासाठीच ‘एसआयपी’सारखी गुंतवणूकपद्धत उपयुक्त असते. मुलांचे शिक्षण, लग्न आणि स्वतःची निवृत्ती, अशा प्रकारच्या ५-१०-१५-२० वर्षांच्या उद्दिष्टांसाठी शिस्तबद्ध पद्धतीने आणि खंड न पडता तरतूद करण्यासाठी हा मार्ग योग्य असतो. अनेक वर्षांच्या सरासरी भावाने गुंतवणूक झाली, तर बाजारातील चढ-उतारांपासून आपण भावनिकदृष्ट्या अलिप्त राहू शकतो. आपण अशी उद्दिष्टकेंद्रित गुंतवणूक करण्याची सुरवात केली असेल, तर बाजारातील पडझडीकडे काणाडोळा केला पाहिजे. कारण शेअर बाजार खाली-वर होणारच, हे गृहीत धरले पाहिजे. बाजारातील पडझडीचा फायदा घ्यायचा असेल, तर या दिवाळीच्या बोनसपोटी म्हणून चालू ‘एसआयपी’मध्ये एक किंवा दोन हप्त्यांइतकी जादा किंवा अतिरिक्त रकमेची भर घाला, पण बचतीची व गुंतवणुकीची चांगली सवय मोडू नका. अनेक वर्षे ‘एसआयपी’ केल्यानंतर गुंतवणुकीची रक्कम मोठी होते. त्यात होणारी घट फक्त दरमहाच्या हप्त्यांमधून भरून निघू शकत नाही. तसेच निवृत्तीनंतर केलेल्या गुंतवणुकीमध्ये दरमहा भर तर पडत नाहीच, पण खर्चासाठी त्यातून पैसे काढले जात असतात. 

चढ-उतार हे लाभदायक मित्रच
या दोन्ही परिस्थितीमध्ये किंवा जेथे मोठ्या पोर्टफोलिओची गुंतवणूक असते, तेथे संतुलित दृष्टिकोन घ्यावा लागतो. ‘ॲसेट ॲलोकेशन’ची शिस्त उपयुक्त ठरते. आपल्या वयाएवढे प्रतिशत प्रमाण सुरक्षित गुंतवणुकीत, तर उरलेले मूल्यवृद्धी होणाऱ्या शेअर किंवा इक्विटी फंडात ठेवणे, असा ठोकताळा उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ, वयाच्या ६५ व्या वर्षी ६५ टक्के रक्कम ही सुरक्षित आणि नियमित व्याज मिळणाऱ्या पर्यायात असली पाहिजे. बाजार खाली किंवा वर गेल्यावर हे संतुलन पुन्हा जागेवर आणले पाहिजे. बाजार वाढल्यावर शेअर ३५ टक्‍क्‍यांवरून ४५ टक्‍क्‍यांवर गेले तर त्यातील काही भाग विकून हे प्रमाण पुन्हा ३५ टक्‍क्‍यांवर आणले पाहिजे. आतासारखी बाजारात घसरण झाल्यावर शेअर किंवा इक्विटी फंडाचे प्रमाण वाढवून ३५ टक्‍क्‍यांवर नेण्यास हीच रक्कम उपयोगी पडेल आणि बाजारातील चढ-उतार आपले लाभदायक मित्र होतील!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com