...तर बॅंक खाती होणार "ब्लॉक' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

जुलै 2015 मध्ये भारत आणि अमेरिकेने "एफएटीसीए' करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. "एफएटीसीए' हा अमेरिकेतील नवीन कायदा आहे. दोन्ही देशांमध्ये आर्थिक सूचनांबाबत देवाण-घेवाणची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्राप्तिकर विभागाच्या सूचना, नियम "एफएटीसीए' खात्यांनाच लागू 

नवी दिल्ली :  बॅंक अथवा आर्थिक व्यवहारांशी संबंधित खाती जुलै 2014 ते ऑगस्ट 2015 या कालावधीत उघडली असतील, तर अशा खातेधारकांनी 30 एप्रिलपर्यंत "केवायसी' आणि आधार कार्ड क्रमांक संबंधित बॅंक अथवा वित्त संस्थांना द्यावा लागणार आहे. जर खातेधारकांनी विहित मुदतीत तो बॅंकांकडे दिला नाही, तर त्यांची खाती 1 मेपासून बंद होण्याची शक्‍यता आहे. प्राप्तिकर विभागाकडून यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. 

परकी कर अनुपालन कायद्यानुसार (एफएटीसीए) 30 एप्रिलपर्यंत जमा करण्यात येणारी आवश्‍यक सर्व कागदपत्रे स्वतः साक्षांकित केलेली असावीत, असेही प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. खातेधारकांनी आवश्‍यक माहितीची साक्षांकित कागदपत्रे निर्धारित वेळेत बॅंक आणि वित्त संस्थांना सादर न केल्यास खाती ब्लॉक करण्याचे अधिकार बॅंकांना देण्यात आले आहेत; मात्र खाती ब्लॉक केल्यानंतर आवश्‍यक कागदपत्रे सादर केल्यास खाते पुन्हा सुरूही करण्यात येईल, असेही या वेळी सांगण्यात आले.

"एफएटीसीए'अंतर्गत असलेल्या खात्यांनाच हा नियम लागू होणार आहे. 
जुलै 2015 मध्ये भारत आणि अमेरिकेने "एफएटीसीए' करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. "एफएटीसीए' हा अमेरिकेतील नवीन कायदा आहे. दोन्ही देशांमध्ये आर्थिक सूचनांबाबत देवाण-घेवाणची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे करचोरी करणाऱ्यांबाबतची माहिती उभय देशांना देता येणार आहे. त्यामुळे 30 एप्रिल 2017 पर्यंत आवश्‍यक सर्व माहितीची स्वतः साक्षांकित केलेली कागदपत्रे संबंधित बॅंका आणि आर्थिक संस्थांना सादर करण्यासंबंधीची सूचना खातेधारकांना दिली गेली पाहिजे, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. 

Web Title: bank account america india tax