शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’ 

शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’ 

मुंबई - चलन बाजारातील कमकुवत रुपया, इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता आणि अमेरिका-चीनमधील व्यापारीयुद्धामुळे शेअर बाजारात सोमवार गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. विक्रीच्या माऱ्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५०५ अंशांनी कोसळून ३७ हजार ५८५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १३७ अंशांच्या घसरणीसह ११ हजार ३७७ अंशांवर बंद झाला. 

शेअर बाजारातील आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांनी सुमारे दोन लाख कोटी रुपये गमावले. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्‍सने ६७७ अंशांची भरपाई केली होती. नकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळपासून विक्रीचा प्रभाव दिसून आला. वित्त सेवा क्षेत्रातील कंपन्या, बॅंका, ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्य सेवा, भांडवली वस्तू आदी क्षेत्रांत गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. 

आजच्या सत्रात सन फार्मा कंपनीच्या समभागाने सपाटून मार खाल्ला. सन फार्माचा समभाग २.८५ टक्‍क्‍यांनी घसरला. एचडीएफसी, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचयूएल, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, कोल इंडिया, एनटीपीसी, एल अँड टी आदी कंपन्यांचे समभाग घसरले. पॉवरग्रीड, अदानी पोर्ट, टीसीएस आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या समभागामध्ये किरकोळ वाढ झाली. 

गोल्डमॅन सॅशच्या अंदाजाचा परिणाम 
अमेरिका आणि चीनमधील संघर्ष मिटण्याऐवजी वाढण्याची शक्‍यता आहे. खनिज तेलाच्या वाढत्या किमतींनी देशांतर्गत इंधनदरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच गोल्डमन सॅश या जागतिक वित्तीय संस्थेने भारतीय शेअर बाजारातील तेजी सरली असल्याचे म्हटले आहे. गोल्डमन सॅशच्या या भाकिताने गुंतवणूकदार सावध झाले आहेत. 

बॅंकांचे समभाग गडगडले
बुडीत कर्जांचा भार आणि भांडवल पूर्ततेची टांगती तलवार असलेल्या बॅंकांच्या समभागामध्ये आज विक्रीचा जोर दिसून आला. एचडीएफसी बॅंक, एसबीआय, ॲक्‍सिस बॅंक, येस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, कोटक बॅंक आदी बॅंकांचे समभाग घसरणीसह बंद झाले. 

मिडकॅप समभाग होरपळले
आजच्या पडझडीत मुंबई शेअर बाजारातील मिडकॅप समभागांचे बाजार भांडवल १ लाख १४ हजार ६७६ कोटींनी कमी झाले. मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांमधील गुंतवणूकदारांना चांगलाच झटका बसला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com