म्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ

म्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ

नवी दिल्ली - म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला असून, गेल्या महिन्यात (ऑक्‍टोबर) गुंतवणूकदारांनी तब्बल ५१,००० कोटी रुपयांचा ओघ म्युच्युअल फंडांकडे वळविला आहे. 

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडियाने (ॲम्फी) दिलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड योजनांमधील चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांतील (एप्रिल-ऑक्‍टोबर) गुंतवणूक आता २.५ लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. अशा प्रकारे चालू आर्थिक वर्षांत म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये विक्रमी गुंतवणूक होऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. बहुतांश गुंतवणूकदारांनी इक्विटी आणि डेट योजनांना पसंती दिल्याचे समोर आले आहे. बॅंकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये दिवसेंदिवस कपात होत असल्याने गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाकडे ओढा वळविला आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना भौतिक मालमत्तांकडून आर्थिक मालमत्तांकडे वळण्यास मदत होऊ लागली आहे. 

‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये ५१,१४८ कोटी रुपयांची भर घातली आहे. नवी गुंतवणूक प्रामुख्याने इक्विटी, इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग स्कीम आणि इन्कम फंडांद्वारे करण्यात आली आहे. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये म्युच्युअल फंडाच्या योजनांमधून १६,६०४ कोटी रुपये काढून घेतले गेले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबरमध्ये झालेली गुंतवणूक लक्षणीय आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या या वाढत्या ओघामुळे म्युच्युअल फंडाच्या क्षेत्रातील ४२ कंपन्यांची ऑक्‍टोबरअखेरची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) २१.४१ लाख कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे. सप्टेंबरअखेरीस हा आकडा २०.४० लाख कोटी रुपये होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com