‘नॅनो’च्या उत्पादनाला कात्री

‘नॅनो’च्या उत्पादनाला कात्री

मुंबई - गरिबाची मोटारकार म्हणून प्रसिद्ध झालेल्या नॅनोकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने टाटा मोटर्सच्या नॅनो उत्पादनाला कात्री लावावी लागली आहे. गुजरातेतील साणंद प्रकल्पात नॅनोचे उत्पादन झपाट्याने कमी झाले असून दिवसाकाठी केवळ दोनच नॅनो मोटारी तयार होत आहेत. वाढलेल्या किंमती आणि छोट्या मोटार श्रेणीतील तीव्र स्पर्धेने मागणी रोडावली असून नॅनो पडद्याआड जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

टाटा मोटर्सचे देशभरात ६३० वितरक आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नॅनोची मागणीमध्ये प्रचंड घसरण झाल्याचे दिसून आले आहे. परिणामी कंपनीला उत्पादन कमी करावे लागले आहे. गेल्या वर्षभरात दरमहा नॅनोचे उत्पादन कमी करण्यात आले असून, टाटा समूहाकडून नॅनो गुंडाळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मार्च महिन्यात साणंदमध्ये कंपनीने १७४ नॅनो तयार केल्या. एप्रिलमध्ये ३५० मोटारी आणि मे महिन्यात ३५५ मोटारी तयार झाल्या. जून महिन्यात उत्पादनात मोठी घसरण झाली. जूनमध्ये केवळ १६७ नॅनो मोटारींची निर्मिती झाली. सप्टेंबर आणि ऑक्‍टोबरमध्ये सणासुदीचा हंगाम असूनदेखील नॅनोची मागणी थंडावली. ऑक्‍टोबरमध्ये साणंदमध्ये केवळ ५७ मोटारींची निर्मिती झाली. नॅनोच्या इतिहासातील एका महिन्यातील हे नीचांकी उत्पादन आहे. त्यापूर्वी डिसेंबर २०१६ मध्ये १००४ मोटारी तयार करण्यात आल्या होत्या. वितरकांनी नॅनोची मागणी थांबवली असल्याने कंपनीने उत्पादन कमी केल्याचे बोलले जात आहे. 

टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेली नॅनो एक लाख रुपयांत देण्याचे कंपनीने म्हटले होते. मात्र काळाच्या ओघात मोटारीची किंमत तीन ते चार लाखांपर्यंत वाढली. त्यामुळे नॅनो इतर छोट्या मोटारींच्या पंक्तीत जाऊन बसली. किंमती वाढल्याने ग्राहकांना छोट्या मोटार श्रेणीतील अनेक पर्याय उपलब्ध झाले. ज्याचा फटका नॅनोच्या विक्रीला बसला. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी नॅनोबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. नॅनो नुकसानीचे मॉडेल असून टाटा समूहाला किमान एक हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागल्याचे मिस्त्री यांनी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com