रिअल इस्टेटच्या भरभराटीसोबत मूलभूत विकास आवश्यक

रिअल इस्टेटच्या भरभराटीसोबत मूलभूत विकास आवश्यक

विविध स्तरातील ग्राहकांच्या वाढत्या मागणीसह पुणे शहर रिअल इस्टेट क्षेत्रातील डेस्टिनेशन कसे ठरले यावर सध्याच्या परिस्थितीच्या संदर्भाने बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक शैलेश पुराणिक यांनी प्रकाश टाकला आहे. त्यांची थोडक्यात मुलाखत...

पुणे शहराची वाढ आणि झालेला विकास यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यापारवृद्धीच्या अनेक उपक्रमांतही लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्यातील शांत आणि हवेशीर वातावरणामुळे एके काळी पुणे हे `निवृत्त लोकांचे` ठिकाण म्हणून ओळखले जात होते. आता मात्र पुणे ही भारतातली सर्वांधिक वेगाने वाढत चाललेली महत्वाची बाजारपेठे आहे.

माहिती तंत्रज्ञानविषयक कंपन्या आणि आयटीईएसमुळे गेल्या काही वर्षांत पुणे शहराची आर्थिक भरभराट व विकास झाला आहे. पुण्यात बंगळुरू (२०८) व हैद्राबाद (९७) नंतर सर्वाधिक आयटी व सॉफ्टवेअर कंपन्यांचे (२१२) बस्तान बसलेले आहे. पुणे शहराच्या वाढीमध्ये या शहराचे देशाच्या आर्थिक राजधानीपासून, मुंबईपासून जवळच असलेले अंतर हाही महत्त्वाचा घटक आहे.

पूर्वेकडील ऑक्सफर्ड आणि भारतातील सर्वांत महत्वाचे शहर म्हणून नावाजलेल्या पुण्यात शिक्षण आणि ऑटोमोबाईल क्षेत्रही तेजीत आहे. शिक्षणक्षेत्रात पुणे शहराचा प्रथम क्रमांक लागत असून येथे सर्वाधिक ३५ महाविद्यालये कार्यरत आहेत. जगातील सर्व विद्यापिठांपैकी पुणे विद्यापिठांतर्गत नोंदणीकृत असलेली सर्वाधिक संख्येची ५७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.

या शहरातील रिअल इस्टेट क्षेत्राच्या भरभराटीमुळे पुण्यातील बाह्य रिंग रोड (ओआरआर), मेट्रो रेल, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्र (पीआयईसीसी) तसेच, स्थानिक रस्ते व उड्डाणपुलांचा विकास आदी शहरविकासाशी संबंधित कामे करण्यास सरकार बांधील झाले आहे.

मुंबई किंवा एनसीआरसारख्या मोठ्या शहरांशी तुलना केल्यास, पुण्यातील रिअल इस्टेट बाजारपेठ सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी अशी किफायतशीर आहे. पुण्यातील निवासी रिअल इस्टेट क्षेत्राला एनआरआय लोकांकडूनही लक्षणीय प्रतिसाद मिळत असून गुंतवणूकीतील स्थीर परतावा आणि आकर्षक घरभाड्यामुळे हे शक्य झाले आहे.

रिअल इस्टेट क्षेत्राची कमान चढती राहण्यासाठी ज्या अडथळ्यांशी या शहराला सामना करावा लागतोत्याबद्दल सांगा.
रिअल इस्टेट क्षेत्राच्या बाबतीत पुणे शहरात काही महत्वाच्या समस्या किंवा अडथळे दिसून येतात.

  • वेळेवर जागांचा ताबा मिळवणे आणि बांधकामाचा दर्जा
  • किंमती व त्यांतील सुधारणेच्या प्रमाणावर भक्कम ताबा ठेवणे.
  • सार्वजनिक वाहतूक, पाण्याची उपलब्धता आणि सोयीस्कर बाजारपेठ आदी शहरविकास कामांमधील अडथळे.
  • ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुयोग्य किंमती आणि पारदर्शक करारनामे
  • उत्पादन ग्राहकाभिमुख बनवण्यासाठी बाजारपेठ व ग्राहकांच्या गरजा समजून घेणे

रिअल इस्टेट क्षेत्रातील उतरणीचा हा काळ असल्याने डेव्हलपमेंट कण्ट्रोल (डीसी)ची तत्वे बाजारपेठेला मदत करू शकतील का?
जुन्या किचकट भागांमध्ये (लक्ष्मी रोड, एसबी रोड, कर्वे रोड, पौंड रोड आणि एफ.सी. रोड आदी) वाढीव एफएसआय देणे आणि वाहतूकाच्या दृष्टीने विकसित भागांवर लक्ष केंद्रित करणे हे दोन महत्वाचे नवीन विकास नियंत्रण नियम पुणे शहरात राबवण्यात येत आहेत. वाहतुकीचा प्रश्न या नियमांमुळे सुटणार नसला, तरी या भागांतील घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होणार आहे. या भागातील बऱ्याचशा भागांत बंगले असल्यामुळे नवीन कायद्यानुसार, या बांधकामांची पुनर्बांधणी करून अपार्टमेंट व कॉम्प्लेक्स बनवण्यासाठी मदत होणार आहे.

पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रावर जीएसटी आणि रेराचा नेमका काय परिणाम झाला आहे?
आजवर अनियमित असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला रेरामुळे नियमित रूप प्राप्त होत आहे. रेरा अंमलबजावणीनंतर ग्राहक अधिक सुरक्षित होऊन या क्षेत्रात अधिक पारदर्शकता येणार आहे. सरकारकडून उचलल्या गेलेल्या या ठोस पावलांमुळे गृहखरेदीदारांचा आत्मविश्वास वृद्धींगत होण्यास मदत होत आहे.

सामान्य लोकांसाठी व समान्य लोकांना कोणत्याही प्रकल्पाची विस्तृत माहिती अचूकपणे देण्यासाठी आता बांधकाम व्यावसायिक बांधील राहणार आहेत. चुकीची माहिती पुरवल्यास त्याचा थेट परिणाम आर्थिक नुकसानीत किंवा दंडाच्या रुपाने समोर येणार असून या कायद्यान्वये, प्रकल्पाचे प्रत्येक टप्प्यावर सखोल निरीक्षण व परिक्षण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे, कोणत्याही विकसकासह खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी ग्राहकांना त्या-त्या प्रकल्पाची अचूक व वास्तविक माहिती यामुळे मिळू शकणार आहे.  

पुण्यात घरांसाठी मागणी गेल्या एका वर्षात वाढत चाललीय असं वाटतं का?
एका सांस्कृतिक शहरापासून ते ऑटोमोबाईल आणि उत्पादन बाजारपेठेपर्यंत, आयटी क्षेत्रापासून शैक्षणिक राजधानी बनण्यापर्यंतचा पुणे शहराचा प्रवास हा केवळ अतुलनीय आहे. गेल्या दोन दशकांची ही या शहराची यशोगाथा आहे. येत्या काही काळात, वाढीचे अनेक पर्याय आणि विकासाभिमुख शहरबांधणी यामुळे पुण्याची कामगिरी अधिक उजळण्याची चिन्हे दिसत आहेत. या शहराचा जगातील १०० स्मार्ट शहरांमध्ये समावेश झाल्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना या शहरात येऊन व्यापारवृद्धी करण्यासाठी रस निर्माण झाला आहे. यामुळे मनुष्यबळाची या शहराची गरज वाढत चालली असून परिणामी, किफायतशीर घरांची मागणीही शिगेला पोहोचली आहे.

पुण्याच्या रिअल्टी क्षेत्रावर निश्चलनीकरणाचा काय परिणाम झाला?
नोव्हेंबर २०१६ मध्ये निश्चलनीकरण झाल्यानंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, संपूर्ण भारतातील रिअल इस्टेट बाजारपेठेवर मंदीची झळ आली होती. नोव्हेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या तीन महिन्यांच्या कठीण कालावधीत, नवीन जागांचा ताबा मिळवण्यात फारच घट झाली तर, नवीन प्रकल्पांचे उद्घाटनसुद्धा मागे पडले होते. तरीही,आर्थिक उलाढाली मात्र मोठ्या प्रमाणात होत होत्या. जानेवारीनंतर मात्र परिस्थितीत खूप सुधारणा झाली. आता विक्रीदर पुन्हा सुरळीत झाले असून निश्चलनीकरणाचे परिणाम हे तात्पुरते असल्याचे सिद्ध झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com