व्यापारयुद्ध २० वर्षे चालेल

Jack-Ma
Jack-Ma

हाँगझू - अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधील व्यापारयुद्ध किमान २० वर्षे चालेल, असे भाकीत ‘अलिबाबा’चे संस्थापक जॅक मा यांनी केले आहे. या संघर्षात अमेरिका, चीन आणि युरोपमधील उद्योजक भरडले जातील, असे त्यांनी म्हटले आहे. 

अमेरिकेकडून चिनी उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क आकारण्यात आले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकी वस्तूंवर जादा शुल्क लावले आहे. अमेरिकेची नवी शुल्कवाढ चीनच्या जवळपास पाच हजार वस्तूंसाठी धोकादायक ठरणार आहे. ‘‘नजीकच्या काळात अमेरिका, चीन आणि युरोपातील उद्योजकांसाठी दोन आर्थिक महासत्तांमधील व्यापारसंघर्ष त्रासदायक ठरेल. अमेरिकेकडून आयात शुल्कवाढ व्यावसायिक दृष्टिकोनातून नाही, तर चीनची प्रगती खुंटवण्याच्या ईर्षेने करण्यात आली आहे. हे व्यापारयुद्ध २० दिवस किंवा २० महिने नाही, तर २० वर्षे चालेल,’’ असा इशारा मा यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे. 

अमेरिकेने जपानवर १९८० च्या दशकात व्यापारी निर्बंध लादले होते, तसाच प्रकार चीनसोबत केला जात असल्याची शंका मा यांनी व्यक्त केली. चीन जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असल्याने चीनला रोखण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे. दरम्यान, अमेरिकेच्या शुल्कवाढीबाबत मा यांनी चीन सरकारच्या धोरणांवरही टीका केली आहे. अमेरिकेच्या धोरणांमुळे चिनी नेत्यांनी स्वत:मध्ये सुधारणा करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

बिर्ला समूहाला फटका 
चीनमधून आयात होणाऱ्या धातू आणि इतर औद्योगिक उत्पादनांवर अमेरिकेने २५ टक्‍क्‍यांपर्यंत आयातशुल्क लादले आहे. यामुळे चिनी वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. अमेरिका आणि चीनमधील संघर्षाची झळ उद्योगाला बसेल, असे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटले आहे. बिर्ला समूहाचे अमेरिका, युरोप आणि दक्षिण अमेरिकेत उद्योग आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com