वाहन, आरोग्य विमा 1 एप्रिलपासून महागणार 

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

या कायद्यात एजंटांना देण्यात येणाऱ्या कमिशनचा आढावा आणि त्यांना बक्षीस देण्याची तरतूद आहे. यामुळे विमा कंपन्यांना हप्त्यामध्ये वाढ करावी लागणार आहे.

नवी दिल्ली - मोटार, दुचाकी आणि आरोग्य विम्याचा हप्ता 1 एप्रिलपासून वाढणार आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) एजंटांचे कमिशन वाढविण्याचा निर्णय घेतल्याने हप्ता महागणार आहे. 

एजंटांचे कमिशन वाढल्यामुळे विमा हप्त्यात होणारा बदल अधिक अथवा उणे 5 टक्‍क्‍यांच्या आतमध्ये असेल. वाहनांच्या "थर्ड पार्टी' विमा हप्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. आता एजंटांचे कमिशन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने यामध्ये आणखी वाढ होणार आहे. "आयआरडीएआय' नियामक कायदा 2016 हा 1 एप्रिलपासून लागू होत आहे.

या कायद्यात एजंटांना देण्यात येणाऱ्या कमिशनचा आढावा आणि त्यांना बक्षीस देण्याची तरतूद आहे. यामुळे विमा कंपन्यांना हप्त्यामध्ये वाढ करावी लागणार आहे. आधी विक्री केलेल्या विमा पॉलिसींसाठी हप्त्यामध्ये बदल होणार नाही, असे "आयआरडीएआय'ने म्हटले आहे.